दादर, पनवेलसह या 6 रेल्वेस्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद

मुंबई, लोकल

फोटो स्रोत, Tim Graham

फोटो कॅप्शन,

मुंबईत लोकल रेल्वे

मुंबईतील काही रेल्वेस्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटं देणं बंद करण्यात आलं आहे.

लोकमान्य टिळक टर्मिनस, कल्याण, ठाणे, दादर, पनवेल, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या रेल्वेस्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद करण्यात आली आहे. मध्य रेल्वे जनसंपर्क कार्यालयानं ही माहिती दिली आहे.

फोटो स्रोत, Twitter

मुंबई लोकल बंद होणार नाही, पण निर्बंध लागतील - विजय वडेट्टीवार

"कोरोना व्हायरसबाधितांच्या संख्येत पुन्हा वाढ होत असल्याचं दिसून येत आहे. महाराष्ट्रात दररोज 35 ते 40 हजार नवे रुग्ण आढळून येत आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई लोकल बंद होणार नाही, पण निर्बंध लागतील," अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी 2 एप्रिल 2021 रोजी दिली.

"पुन्हा लॉकडाऊन लागल्यास लोकांना ते परवडणार नाही. तसंच मुंबई लोकलही बंद होणार नाही. गर्दी टाळण्यासाठी प्रवाशांची विभागणी व इतर निर्बंध लावण्यात येऊ शकतात," असं विजय वडेट्टीवार म्हणाले.

प्रवाशांची संख्या घटली

"लोकल रेल्वेत कोणतेही नवीन निर्बंध किंवा फेऱ्या कमी करण्यासंदर्भात राज्य किंवा केंद्र सरकारचे अद्याप कोणतेही निर्देश आलेले नाहीत. त्यांच्या निर्देशानुसार पुढील कार्यवाही करू," पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.

फेब्रुवारीत पश्चिम रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या साधारण 18 लाख एवढी होती. ती आता कमी होऊन 15-16 लाखांवर आली आहे.

तर मध्य आणि हार्बर रेल्वेने दर दिवशी जवळपास 40 लाख प्रवासी प्रवास करत असतात, पण कोरोना काळात 20 लाख प्रवासी प्रवास असल्याची माहिती रेल्वेच्या जनसंपर्क कार्यालयाने बीबीसी मराठीशी बोलताना दिली.

मध्य रेल्वेत 90 टक्के (1600) तर पश्चिम रेल्वेच्या 95% रेल्वे गाड्या सुरू आहेत.

सार्वजनिक वाहतूक बंद करणे हा आमचा शेवटचा पर्याय असेल, अशी माहिती मदत व पुनर्वसन सचिव असीम गुप्ता यांनी बीबीसी मराठीशी बोलताना दिली.

फोटो स्रोत, Getty Images

मुंबईत काही रेल्वे स्टेशन्सवर गर्दी टाळण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकीट 50 रुपये

दुसरीकडे, वाढत्या गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका टाळण्यासाठी मुंबईतल्या काही रेल्वेस्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट 50 रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबईत लोकल सर्वांसाठी सर्वसमावेशक पद्धतीने सुरू झालेली नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना लोकल प्रवासाकरता विशिष्ट वेळा देण्यात आल्या आहेत. आपात्कालीन सेवेतील कर्मचाऱ्यांना कोणत्याही वेळी लोकलप्रवासाची मुभा आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण, पनवेल आणि भिवंडीत प्लॅटफॉर्म तिकिटाची किंमत आता 50 रुपये असणार आहे.

सर्वसाधारणपणे प्लॅटफॉर्म तिकिटासाठी प्रवाशांना प्रत्येकी 10 रुपये मोजावे लागतात. नव्या निर्णयानंतर मुंबईतल्या महत्त्वाच्या रेल्वेस्थानकांवर प्रवाशांना प्लॅटफॉर्म तिकिटासाठी पाच पट पैसे खर्च करावे लागतील.

1 मार्चपासून लागू झालेल्या या निर्णयाची अंमलबजावणी 15 जूनपर्यंत लागू राहणार आहे. मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी यासंदर्भात माहिती दिली.

महत्त्वाच्या स्थानकांवर गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.

फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून मुंबईतले कोरोनाचे आकडे दररोज वाढत आहेत. मुंबई शहरात आतापर्यंत सव्वा तीन लाखांहून अधिक नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. कोरोना संसर्गामुळे मुंबई शहरात 11,400 लोकांचा मृत्यू झाला आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री 8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा )