शिवसेना-एमआयएम आणि बसपा-भाजप असं समीकरण तुम्हाला माहिती आहे का?

अमरावती पालिकेच्या स्थायी सभापती पदाची निवडणूक नुकतीच पार पडली.

फोटो स्रोत, MANJUNATH KIRAN

फोटो कॅप्शन,

प्रतीकात्मक फोटो

अमरावती महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतीच्या निवडणुकीत दोन वेगवेगळ्या विचारधारेचे पक्ष एकत्र आले आहेत. शिवसेनेने ऐन वेळी एमआयएम पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला, मात्र जिंकण्यासाठी पुरेशी मते न मिळाल्यामुळे एमआयएमच्या उमेदवाराचा पराभव झाला.

या निमित्ताने एकमेकांचे कट्टर हाडवैरी असलेले दोन पक्ष एकत्र आल्याची चर्चा जोरात सुरू झाली आहे. एमआयएमला पाठिंबा दिल्यामुळे शिवसेनेनं हिंदुत्व सोडल्याचा भाजपच्या टीकेला अजून धार येण्याची शक्यता आहे. तर ही केवळ स्थानिक पातळीवरची राजकीय तडजोड असल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.

दुसरीकडे याचं निवडणुकीत बसपाच्या नगरसेवकाने मतदानाला अनुपस्थित राहून अप्रत्यक्षपणे भाजपच्या उमेदवाराला बसपाने पाठिंबा दिला. अगोदरच बसपा भाजपची बी टीम असल्याच्या टीका होत आहे, त्यामुळे या चर्चेला या निमित्ताने अजून बळकटी येणार आहे. बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी भाजपबद्दल नरमाईची भूमिका घेतल्याची टीका त्यांच्यावर नेहमी होत आहे. मात्र बसपाने भाजपला पाठिंबा दिल्याची ही पहिलीच घटना नाही.

अमरावती पालिकेच्या स्थायी सभापती पदाची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत भाजपाचे शिरीष रासने यांची स्थायी समिती सभापती पदी निवड झाली. मात्र निवडणुकीत शिवसेनेने एमआयएमच्या उमेदवाराला पाठींबा दिल्याने ही निवडणूक गाजली आहे.

भाजपचे शिरीष रासने यांना 9 मते मिळाली तर विरोधी पक्षाचे संयुक्त उमेदवार ठरलेले एमआयएमचे अफजल हुसेन मुबारक हुसेन यांना 6 मते मिळाली. तीन मताने त्यांचा पराभव झाला, मात्र प्रभावापेक्षा हे दोन वेगवेगळ्या विचारधारेचे पक्ष एकत्र आले याची चर्चा आहे.

फोटो स्रोत, Nitesh Raut

भाजपच्या वतीने स्थायी समिती सभापती साठी शिरीष रासने यांचे नाव जाहीर झाल्यानंतर भाजपचे दोन सदस्य नाराज झाले होते. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवावं यासाठी काँग्रेस, शिवसेना, एमआयएम व बीएसपी यांनी एकत्र येण्याचं ठरवलं मात्र ऐनवेळी बसपाचे गटनेते चेतन पवार हे निवडणुकीत गैरहजर राहिले यामुळे विरोधकांचे संख्याबळ कमी झालं. बीएसपीचे गटनेते चेतन पवार जर काँग्रेस शिवसेना एमआयएमच्या बाजूने उभे राहिले असते तर भाजपाचे 2 नाराज सदस्य गैरहजर राहणार होते. अशा परिस्थितीत ईश्वर चिठ्ठीने ही निवडणूक पार पडले गेली असती.

मात्र ऐन वेळी बीएसपी चे चेतन पवार गैरहजर राहिल्याने एमआयएम च्या वतीने अफजल हुसेन मुबारक हुसेन यांना स्थायी समिती सभापती पदासाठी उभे करण्यात आले. भाजपला रोखण्यासाठी एमआयएम च्या सदस्याला हिंदुत्ववादी समजल्या जाणाऱ्या शिवसेनेने पाठिंबा दिला तर धर्मनिरपेक्ष समजल्या जाणाऱ्या बहुजन समाज पक्षाने निवडणुकीत गैरहजर राहून अप्रत्यक्षपणे भाजपला मदत केली. आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या एका सदस्याने भाजपच्या रासने यांना पाठिंबा दिला.

अमरावती पालिका स्थायी समितीत शिवसेनेचे केवळ एक मत आहे. मात्र भाजपच्या ताब्यात असलेली पालिका विकासाच्या आघाडीवर अपयशी ठरली आहे, त्यामुळे शहराच्या विकासासाठी सर्व पक्ष एकत्र आले होते. याचा अर्थ आम्ही एमआयएम सोबत युती करणार असा होत नाही, दुसरीकडे काही पालिकेत सत्तेसाठी भाजपने एमआयएमची मदत घेतली,त्याचे उत्तर त्यांनी द्यावे, मेहबुबा मुफ्तीसोबत तीन वर्षांचा संसार भाजपने केला हे विसरू नये. असा टोला शिवसेनेच्या जिल्हाध्यक्ष सुनिल खराटे यांनी लावला आहे.

फोटो स्रोत, Nitesh Raut

फोटो कॅप्शन,

अमरावती महापालिका स्थायी समिती निवड

तर हा स्थानिक पातळीवर भाजपला सत्तेतून हटवण्यासाठी सर्वच विरोधी पक्ष एकत्र आले आणि त्यातून हा निर्णय झाला, कॉग्रेसने उमेदवार देण्यात विलंब लावला त्यामुळे ऐनवेळी एमआयएमने आपला उमेदवार दिला. याचा अर्थ आम्ही शिवसेनेसोबत युती केल्याचा होत नाही, कुणी काढू नये अशी प्रतिक्रिया महानगर पालिका गट नेता एमआयएम, अब्दुल नाजीम यांनी दिली.

स्थायी समितीच्या अध्यक्षपदावरून भाजपला दूर हटवण्यासाठी, सर्व पक्ष एकत्र आले, त्यामध्ये एमआयएमचा समावेश होता. उमेदवारी न मिळाल्यामुळे भाजपचे दोन नगरसेवक नाराज होते, याचा फायदा घेण्यासाठी ही खेळी विरोधी पक्षाने खेळली होती. याचा फार मोठा राजकीय अर्थ काढणे चुकीचे ठरेल. केवळ स्थानिक पातळीवरची तडजोड म्हणून या घटनेकडे बघायला हवे. असं विश्लेषण ज्येष्ठ पत्रकार मोहन अटाळकर यांनी केले.

फोटो स्रोत, Nitesh Raut

फोटो कॅप्शन,

अमरावती महापालिकेत भाजपाचे शिरीष रासने यांची स्थायी समिती सभापती पदी निवड झाली.

अमरावती महानगरपालिका स्थायी समिती सभापती निवडणुकीत शिवसेनेची एमआयएम सोबत युती केली असून शिवसेनेने हिंदुत्व सोडल्याचा प्रत्यय दिला असल्याचा भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी आरोप केलाय.

ते म्हणाले "शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर जोपासलेलं हिंदुत्व शिवसेनेनी राज्यात सत्तेच्या लाचारीसाठी सोडली याची प्रचिती अमरावतीमध्ये आली. शिवसेना हिंदुत्व विसरले की जाणीवपूर्वक त्यांना विसर पडलाय असा वाटायला लागलंय. अमरावतीच्या स्थायी समिती सभापती निवडणुकीत सेनेला तटस्थ राहता आले असते. मात्र सत्तेसाठी त्यांनी एमआयएमला पाठिंबा दिला" अशी प्रतिक्रिया शिवराय कुलकर्णी यांनी दिली.

अमरावती महानगरपालिकेत स्थायी समितीतील पक्षीय समीकरण कसे आहे ते पाहूया,

एकूण सदस्य -09

भाजपा- 08

युवा स्वाभिमान- 01

काँग्रेस - 03

एम आय एम -02

शिवसेना -01

बीएसपी -01

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)