मंदिरात पाणी पिण्यावरून मुस्लीम मुलाला मारहाण, विदेशी प्रसारमाध्यमांनी काय म्हटलं?

मंदिर, दिल्ली, हिंदू, मुस्लीम

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

प्रतीकात्मक फोटो

उत्तर प्रदेशातील गाझियाबाद शहरात एका मंदिरात पाणी पिण्यावरून मुस्लीम युवकाला मारहाण करण्यात आली. ही बातमी विदेशातील प्रसारमाध्यमांनी खासकरून मुस्लीमबहुल देशांनी प्रामुख्याने छापली आहे.

पाकिस्तानातील डॉन या इंग्रजी वर्तमानपत्राने म्हटलं आहे की, "मुसलमान युवकाला मंदिरात प्रवेश करण्यावरून आणि पाणी प्यायला म्हणून बेदम मारहाण करण्यात आली."

गुरुवारी गाझियाबादमधल्या डासना या ठिकाणी मंदिराची देखभाल करणाऱ्या श्रृंगी नंदन यादव यांनी मंदिरात पाणी पिणाऱ्या 14 वर्षीय मुस्लीम मुलाला मारहाण केली.

डॉन या वर्तमानपत्राने त्या मुलाच्या वडिलांचं वक्तव्यही छापलं आहे. त्या मुलाचे वडील म्हणतात, "माझ्या मुलाला तहान लागली होती. त्यामुळे तो मंदिरात असलेल्या पाणपोईच्या इथे पाणी प्यायला गेला. त्याला त्याची ओळख विचारण्यात आली आणि नंतर मारहाण करण्यात आली."

"त्याला बरंच लागलं आहे. त्याच्या डोक्याला जखम झाली आहे. हे वागणं चुकीचं आहे. पाणी पिण्यात कसला आलाय धर्म? मला वाटत नाही कोणत्याही धर्माने अन्य धर्मीयांना पाणी पिण्यासंदर्भात काही म्हटलं आहे. या मंदिरातही आधी अशी कुठल्याही स्वरुपाची बंदी नव्हती. मात्र आता काही नियम बदलले आहेत," असं त्या मुलाच्या वडिलांनी म्हटलं आहे.

गाझियाबाद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, "शुक्रवारी रात्रीच पोलिसांनी आरोपी श्रृंगी नंदन यादवला अटक केली आहे. तो बिहारचा राहणारा आहे. नरसिंहानंद सरस्वती यांचा शिष्य असल्याचं त्याचं म्हणणं आहे. सहा महिन्यांपूर्वीच तो गाझियाबादला स्थलांतरित झाला आहे".

पोलिसांनी सांगितलं की, "या प्रकरणी सहआरोपी शिवानंदच्या मुलाने मारहाणीचा व्हीडिओ चित्रित केला होता. यासाठी दोघांविरोधात भारतीय दंड संहितेच्या 504 (शांतता भंग करण्याच्या उद्देशाने जाणीवपूर्वक केलेला अपमान), 505(सार्वजनिक पद्धतीने त्रास देण्यासाठी केलेलं वक्तव्य), 352(हल्ला करणं) या कलमांखाली अटक करण्यात आली आहे".

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

या घटनेची चर्चा देशभरापुरती मर्यादित राहिली नाही तर विदेशातील प्रसारमाध्यमांनी या बातमीची दखल घेतली.

बांगलादेशमधील इंग्रजी वर्तमानपत्र ढाका ट्रिब्यूनने म्हटलं की, "सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने श्रृंगी नंदन याचं कृत्य जगासमोर आलं. व्हायरल व्हीडिओत हे दिसतं आहे की त्या मुलाला त्याचं नाव विचारण्यात येतं आहे. मंदिरात काय करतो आहेस? असं विचारलं जातं. तो मुलगा म्हणतो, पाणी प्यायला आलो."

त्यानंतर आरोपी त्या मुलाचा हात पकडून त्याला मारू लागतो. तो मुलगा जमिनीवर पडतो तरी मारणं थांबत नाही. आरोपीचा सहकारी व्हीडिओ चित्रण करत राहतो.

ढाका ट्रिब्यूनने म्हटलं आहे की, "सगळ्यांत आधी हा व्हीडिओ हिंदू एकता मंच नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आला होता. त्यानंतर तो तिथून डिलिट करण्यात आला."

पाकिस्तानमध्ये जंग मीडिया समूहाचं इंग्रजी वर्तमानपत्र द न्यूज इंटरनॅशनलने ही बातमी प्रकाशित केली आहे.

त्यांनी पोलीस अधिकाऱ्याचं म्हणणं छापलं आहे. पोलिसांच्या सांगण्यानुसार "दोन्ही आरोप गेल्या तीन महिन्यांपासून मंदिरातच राहत होते. दोघांनीच हा व्हीडिओ व्हायरल करण्याचा प्रयत्न केला. दोघं मंदिरात सेवेचं काम करतात."

पाकिस्तानमधील इंग्रजी वृत्तपत्र द एक्स्प्रेस ट्रिब्यूनने संपूर्ण घटनेची माहिती दिली आहे. याबरोबरच त्यांनी नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाईल्ड राईट्स संस्थेच्या चेअरमन प्रियांक कानुंगो यांचं वक्तव्य छापलं आहे. त्या म्हणतात, एनसीपीआर मुलाच्या हक्कांचं रक्षण करेल.

ब्रिटनमधील वृत्तपत्र द मुस्लिम न्यूज यांनीही ही बातमी छापली होती. त्यांच्या बातमीत म्हटलं आहे की, "भारताची राजधानी दिल्लीपासून केवळ 30 किलोमीटर अंतरावरच्या एका ठिकाणी अशा पद्धतीने मारहाण करण्यात आली. कारण काय तर त्याने मंदिरात जाऊन पाणी प्यायलं."

या बातमीनुसार, पोलीस याप्रकरणाचा मागचं कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

या वर्तमानपत्राने म्हटलं आहे की, "2014मध्ये नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर मुसलमानांसह अल्पसंख्याक समाजावरील हल्ल्यांची संख्या वाढली आहे. गेल्या वर्षी राजधानी दिल्लीत धार्मिक दंगे झाले होते. या दंगलीत 53 लोकांचा मृत्यू झाला होता. वर्तमानपत्राने ह्यूमन राईट्स वॉच आणि दिल्ली अल्पसंख्याक आयोगाच्या अहवालाचा उल्लेख केला आहे."

टर्कीस्थित वर्तमानपत्र डेली सबाहनेही अशाच स्वरुपाची बातमी छापली आहे. ब्रिटनमधील वर्तमानपत्र द मुस्लीम न्यूजही ही बातमी केली आहे. वर्तमानपत्राने अमेरिकेतील संस्था फ्रीडम हाऊसच्या अहवालाचा उल्लेख केला आहे. यामध्ये भारताला मुक्त ऐवजी आंशिकदृष्ट्या मुक्त असं म्हटलं आहे.

इंडियन अमेरिकन मुस्लीम काऊन्सिलने अधिकृत ट्वीटर हँडलवरून ट्वीट केलं आहे. काऊन्सिलने लिहिलं आहे की, "गाझियाबादच्या व्हायरल व्हीडिओत स्वत:ला हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्या श्रृंगी नंदन यादवने अल्पवयीन मुस्लीम मुलाला बेदम मारहाण करताना दिसतो आहे. श्रृंगीला डासना देवी मंदिर परिसरात अटक करण्यात आली आहे."

पत्रकार सीजे वेर्लेमन यांनी घटनेचा व्हीडिओ शेअर करताना म्हटलं आहे की, "घृणास्पद. गाझियाबाद हिंदू कट्टरतावादी जमावाला मुसलमान मुलाला मारहाण करताना दिसतो आहे. कारण तर मंदिरात जाऊन पाणी प्यायला. मारहाण करणाऱ्यांना माहिती आहे की त्यांना असं वागल्यानंतरही अभय आहे. त्यामुळेच त्यांनी या घटनेचा व्हीडिओ बनवून सोशल मीडियावर टाकला आहे."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)