कोरोना व्हायरस लस : भारतातील लोक रांगेत, आधी त्यांना लस द्या, मग जगभर वाटा - इम्तियाज जलील #5मोठ्याबातम्या

लसीकरण

फोटो स्रोत, Getty Images

आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा

1. भारतातील लोक रांगेत, आधी त्यांना लस द्या, मग जगभर वाटा - इम्तियाज जलील

"आपण जगभरात 72 देशांना कोरोना लस वाटत असल्याचा दावा करत आहात. पण सध्या भारतीयांना लशीची सर्वात जास्त गरज आहे. लोक रांगेत उभे आहे. त्यामुळे आधी भारतातील लोकांना कोरोना लस द्या, त्यानंतरच जगभरात वाटा," असं वक्तव्य MIM खासदार इम्तियाज जलील यांनी केलं आहे.

नुकतेच लोकसभेत बोलताना इम्तियाज जलील यांनी केंद्र सरकारकडे ही मागणी केली.

"हा कसला देश आहे? आपले लोक मरत आहेत. लोक लसीकरणासाठी रांगेत उभे आहेत. पण त्यांना वेळेवर लसीकरण मिळत नाही," याबाबत जलील यांनी खंत व्यक्त केली.

जलील पुढे म्हणाले, "आपण इतरांचीही मदत केली पाहिजे. तुम्ही 72 देशांना लस पोहोचवत असल्याचा दावा करत आहात. हे केलंच पाहिजे, ही भारताची संस्कृतीच आहे. पण त्याआधी सगळ्या भारतीयांचं लसीकरण झालं पाहिजे. प्रत्येक भारतीयाचं लसीकरण जेव्हा पूर्ण होईल, तेव्हाच जगभरात त्याचं वाटत करावं."

सध्याच्या स्थितीत आपल्याला लसीकरणाची सर्वात जास्त गरज आहे. पण आपल्याकडे लस उपलब्ध होत नाही. तरीही तुम्ही जगभरात लस वाटल्याचा दावा का करत आहात, असा प्रश्न इम्तियाज जलील यांनी विचारला. ही बातमी एबीपी माझाने दिली.

2. नागपुरात जन्मलेली संघटना देशाला नियंत्रित करण्याच्या प्रयत्नात - राहुल गांधी

नागपुरात जन्मलेली एक संघटना संपूर्ण देश नियंत्रित करण्याच्या प्रयत्नात आहे, अशा शब्दात काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी टीका केली आहे.

फोटो स्रोत, Getty Images

राहुल गांधी यांच्या टीकेचा रोख अप्रत्यक्षपणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे होता. आसाममध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभेत ते बोलत होते.

"देशात लोकशाहीचं पतन होत आहे. तरुण बेरोजगार आहेत. शेतकरी आंदोलन करत आहेत," असं राहुल गांधी म्हणाले.

त्याशिवाय त्यांनी CAA चा उल्लेखही यावेळी केला. "आसामची जनता दिल्लीत आल्यानंतर त्यांनी त्यांची संस्कृती, भाषा बदलावी, अशी अपेक्षा आपण करू शकत नाही," असं राहुल गांधी म्हणाले. ही बातमी लोकसत्ताने दिली आहे.

3. मध्यान्ह भोजनात गुरांचा खुराक, मनसेची तक्रार

शालेय विद्यार्थ्यांना दिला जाणाऱ्या मध्यान्ह भोजनात चक्क गुरांचा खुराक देण्यात आल्याचा प्रकार पुणे येथे समोर आला आहे.

याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तक्रार दाखल केली असून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

फोटो स्रोत, Getty Images

राज्यातील विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराच्या दर्जासंदर्भात किशोर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मनसे नेत्यांनी शुक्रवारी (19 मार्च) शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची भेट घेतली. तसंच कारवाई न झाल्यास राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

हा सगळा प्रकार उघडकीस आणल्यानंतर एफडीएने संबंधित धान्याचे गोडाऊन सील केलं आहे. मंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबत चौकशीचे आदेश दिले आहेत. ही बातमी टीव्ही 9 मराठीने दिली आहे.

4. कार्यालयात 100 पेक्षा जास्त कर्मचारी असल्यास कार्यालयात कँटीन आवश्यक

100 पेक्षा जास्त कर्मचारी संख्या असलेल्या कोणत्याही आस्थापनांमध्ये यापुढे कँटीन ठेवणं आवश्यक असणार आहे. केंद्र सरकारने कामगार कायद्यांचा आधार घेत कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी काही नवीन नियम तयार केले आहेत. कँटीनसंबंधित हा निर्णय घेण्यात आला.

फोटो स्रोत, Getty Images

वरील नियम येत्या 1 एप्रिलपासून लागू करावा, अशी सूचना केंद्र सरकारने दिली आहे.

कामगारांना सरकारी नियम, कायदे आणि योजना यांची माहिती देण्यासाठी प्रत्येक कंपनीत एक वेलफेअर ऑफिसरची नियुक्ती करावी. कर्मचाऱ्यांना इतर ठिकाणी कामास पाठवण्यात येणार असेल तर त्यांना प्रवास भत्ता देणंही आवश्यक आहे. शिवाय ओव्हरटाईमची वेळ घटवून 15 मिनिटांवर आणली आहे. म्हणजेच 15 मिनिटांपेक्षा जास्त वेळ थांबल्यास ओव्हरटाईम लागू करण्यात यावा, अशी तरतूद नव्या नियमात आहे. ही बातमी न्यूज 18 लोकमतने दिली आहे.

5. मुकेश अंबानींसारख्या व्यक्ती मुंबईत असुरक्षित - नारायण राणे

मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडल्याच्या प्रकरणानंतर महाराष्ट्र ढवळून निघालेला आहे. या प्रकरणाचे धागेदोरे थेट पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यापर्यंत जाऊन पोहोचल्याने प्रचंड खळबळ माजली आहे.

या पार्श्वभूमीवर राज्यसभा खासदार नारायण राणे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

"उद्धव ठाकरे यांनी राजीमाना द्यावा, तसंच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी," अशी मागणी नारायण राणे यांनी केली. याबाबत राणे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून काही मुद्दे उपस्थित केले.

"महाराष्ट्र सरकार योग्य रितीने काम करत नाही. अधिकाऱ्यांच्या इच्छेनुसार सगळं काही केलं जातं. मुकेश अंबानी यांच्यासारख्या मोठ्या व्यक्तीही मुंबईत असुरक्षित आहेत. राज्यातील कायदा व सुव्यवस्था परिस्थिती कमकुवत झाली आहे," असा आरोप राणे यांनी यावेळी केला. ही बातमी लोकमतने दिली आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)