सचिन वाझेंना PPE किट घालून NIA नं अंबानींच्या घराबाहेर चालायला लावलं

सचिन वाझे

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ गाडी प्रकरणात निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे हे सध्या NIA च्या अटकेत आहेत.

या प्रकरणात NIA सचिन वाझे यांची कसून चौकशी करत असून घटनेचा सखोल तपास करण्यात येत आहे. याअंतर्गत शुक्रवारी (19 मार्च) रात्री उशिरा सचिन वाझे यांना घटनास्थळी नेऊन गुन्ह्याचं रिक्रिएशन करण्यात आलं.

मुकेश अंबानी यांच्या घरासमोर 25 फेब्रुवारी रोजी स्फोटकांनी (जिलेटीनच्या कांड्या) भरलेली गाडी आढळून आली होती. त्यादिवशी अंबानी यांच्या घरासमोर एक स्कॉर्पिओ आणि त्याच्या मागे एक इनोव्हा ही वाहनं आली.

काही वेळाने इनोव्हा गाडी निघून गेली. पण स्कॉर्पिओ दोन-अडीच तास तशीच उभी राहिली. त्यानंतर स्कॉर्पिओमधील एक व्यक्ती पीपीई किट घालून मागच्या बाजूने निघून गेली.

सकाळी अंबानी यांच्या सुरक्षारक्षकांना ही गाडी आढळून आल्यानंतर त्यांनी याबाबत पोलिसांना कळवलं आणि त्यानंतर स्फोटक प्रकरण समोर आलं होतं. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झालेली आहे.

या माहितीच्या आधारे NIA च्या पथकाने सचिन वाझे यांना घेऊन या घटनेचं रिक्रिएशन केलं. सुमारे अर्धा तास हे नाट्य रुपांतर चालू होतं.

यामध्ये पीपीई किट घातलेली व्यक्ती हे सचिन वाझेच होते किंवा नाही याची पडताळणी NIA कडून केली जात आहे. त्यासाठी वाझे यांची चालण्याची पद्धत आणि पीपीई किटमधील व्यक्तीची चालण्याची पद्धत या गोष्टी जुळवून पाहिल्या जात आहेत.

घटनेचं रिक्रिएशन

NIA ने वाझे यांना नेण्याआधी संपूर्ण परिसरात मार्किंग केलं होतं. संबंधित घटना रात्री घडलेली असल्यामुळे रिक्रिएशनची वेळ ही रात्रीचीच निवडण्यात आली.

यासाठी पोलिसांनी एक सीसीटीव्हीसारखाच एक कॅमेरा त्याच उंचीवर आणि त्याच ठिकाणी लावला.

फोटो कॅप्शन,

सचिन वाझे

त्यानंतर वाझे यांना विशिष्ठ ठिकाणावरून अनेकवेळा चालण्यास सांगण्यात आलं.

सुरुवातीला त्यांना पँट-शर्टमध्ये, कुर्ता घालून तसंच पीपीई किट घालून दोन-तीन वेळा चालायला लावले. त्यांच्या डोक्याला रुमालही बांधलेला होता. या सर्व गोष्टी पुण्याच्या फॉरेन्सिक पथकाने नोंद करून घेतल्या आहेत.

काय आहे प्रकरण?

मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली गाडी आढळली होती. त्याप्रकरणी API सचिन वाझेंना अटक करण्यात आली आहे.

फोटो स्रोत, Ani

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

केंद्रीय तपास यंत्रणेने (NIA) अटक केली आहे. त्यापूर्वी जवळपास 12 तास त्यांची NIA ने चौकशी केली. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटेलिया निवासस्थानाबाहेर स्कॉर्पिओ गाडीत जिलेटीन स्फोटकाच्या कांड्या आढळल्या होत्या. या प्रकरणात सचिन वाझे यांना अटक करण्यात आली आहे.

जिलेटीन च्या कांड्या असलेली स्कॉर्पिओ गाडी 25 फेब्रुवारी रोजी पोलिसांना आढळली होती. ही स्कॉर्पिओ गाडी ज्यांच्या ताब्यात होती ते मनसुख हिरेन यांचा मृतदेह ठाण्यातील रेती बंदर इथे आढळला होता.

त्यानंतर हिरेन यांच्या पत्नी विमला हिरेन यांनी NIA ला दिलेल्या जबाबात सचिन वाझे यांच्यावर हत्येचा आरोप केला होता. त्यानंतर सचिन वाझे यांच्या भोवतीचे संशयाचे वर्तुळ आणखी गडद झाले होते. आता त्यांना अटक झाल्याने या प्रकरणाला आणखी गंभीर वळण लागले आहे.

सचिन वाझे कोण आहेत?

महाराष्ट्र पोलीस दलात सचिन वाझे सहाय्यक पोलीस निरीक्षक, म्हणजेच असिस्टंट पोलीस इंनस्पेक्टर (API) पदावर कार्यरत होते.

मुंबई क्राइम ब्रांचच्या 'क्राइम इंटेलिजन्स युनिट' चे प्रमुख म्हणून सेवा बजावत आहेत. मुंबईत घडणाऱ्या गुन्हेगारी कारवायांची गोपनीय माहिती मिळवून, त्या रोखण्याचं काम क्राइम ब्रांचच्या या युनिटकडे आहे.

फोटो स्रोत, Mumbai police

जून 2020 मध्ये मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अध्यक्षतेखालील समितीने सचिन वाझेंच निलंबन मागे घेण्याचा निर्णय घेतला. निलंबन मागे घेतल्याने तब्बल 16 वर्षांनी वाझे यांचा पुन्हा महाराष्ट्र पोलिसांच्या सेवेत येण्याचा मार्ग खुला झाला.

पोलीस दलात परतल्यानंतर वाझे यांची आयुक्तांनी प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या मुंबई क्राइम ब्रांचमध्ये नियुक्ती केली.

सचिन वाझे यांचं पूर्ण नाव, सचिन हिंदूराव वाझे. सचिन वाझे मुळचे कोल्हापूरचे. सचिन वाझे यांची 1990 मध्ये महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदावर निवड झाली. तेव्हापासून वाझे यांचा पोलीस दलातील प्रवास सुरू झाला.

वाझे यांना ओळखणारे वरिष्ठ क्राइम रिपोर्टर सांगतात, "पोलीस दलात वाझे यांना पहिली पोस्टिंग मिळाली नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात. त्यानंतर 1992 च्या आसपास त्यांची बदली ठाण्यात झाली."

फोटो स्रोत, Getty Images

मुंबईत अंडरवर्ल्डने 1990 च्या दशकात डोकं वर काढण्यास सुरूवात केली. दाऊद, छोटा राजन आणि अरूण गवळी सारखे डॉन मुंबईच्या रस्त्यांवर रक्तपात करत होते. मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड विरोधात मोहीम उघडली.

मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्डच्या शार्प शूटर्सचं एक-एक करून एन्काउंटर करण्यास सुरूवात केली होती. सचिन वाझे त्याचसुमारास मुंबईत बदलीवर रुजू झाले होते.

सब इन्स्पेक्टर ते 'एन्काउंट स्पेशालिस्ट'

वाझे यांची मुंबईत क्राइम ब्रांचमध्ये पोस्टिंग झाली.

सचिन वाझेंची कारकिर्द जवळून पाहणारे पत्रकार नाव न सांगण्याच्या अटीवर माहिती देतात की, "मुंबईत पोस्टिंग झाल्यानंतर वाझेंनी एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळखले जाणारे प्रदीप शर्मा यांच्या हाताखाली काम केलं. त्यावेळी शर्मा अंधेरी क्राइम इंटेलिजन्स युनिटचे (CIU) प्रमुख होते."

क्राइम ब्रांचमधूनच त्यांचा सबइन्स्पेक्टर ते एन्काउंटर स्पेशालिस्ट असा प्रवास सुरू झाला.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)