देवेंद्र फडणवीस: 'अनिल देशमुख गृहमंत्री पदावर असताना चौकशी कशी करता येईल?'

देवेंद्र फडणवीस, अनिल देशमुख, उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

शरद पवार हे महाविकास आघाडीचे निर्माते आहेत. त्यामुळे त्यांना सरकारचा बचाव करावा लागतो असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनामाच्या मागणीनिमित्ताने ते बोलत होते.

फडणवीस म्हणाले, "रॅकेट, खंडणीसंदर्भात आरोप करणारे परमबीर सिंह पहिले नाहीत. सुबोध जयस्वाल यांनी मुख्यमंत्र्यांना अहवाल सादर केला आहे. पोलिसांच्या बदल्यासंदर्भात रॅकेट, दलाली यासंदर्भातील ट्रान्स्क्रिप्ट सहित अहवाल तत्कालीन पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांनी सादर केला होता. कमिशनर इंटेलिजन्समार्फत हा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे गेला होता. गृहमंत्र्यांकडे गेला. त्यावर कुठलीही कारवाई झाली नाही.

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, "सुबोध यांच्यासारखा प्रामाणिक अधिकारी हा अहवाल सादर करतो. ते केंद्रीय सेवेत दाखल झाले. डीजी लेव्हलचं पद सोडून दिलं. शिस्तबद्ध प्रकरण सादर करूनही त्याची साधी चौकशी लावली नाही. महाराष्ट्राच्या गुप्तचर यंत्रणेला बदल्यांचं रॅकेट, दलाल पैसे खात आहेत. वारंवार गृहमंत्र्यांचं नाव येतं आहे. त्यांच्या कार्यालयाचं नाव येतं आहे. तेव्हाच्या रश्मी शुक्ला यांनी डीजींना रिपोर्ट सादर केला".

फोटो स्रोत, Hindustan Times

फोटो कॅप्शन,

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह

"सर्वोच्च न्यायालयाची परवानगी घेऊन त्यांनी काही फोन टॅप केले. जे बाहेर आलं ते धक्कादायक होतं. कमिशनर इंटेलिजन्स यांना पदावरून दूर करण्यात आलं. त्या केरळला सेवेत जात आहेत. त्या रिपोर्टमध्ये नावं आली होती, त्यांना त्या त्या ठिकाणी पदस्थापना मिळाली. परमबीर यांनी लावलेला आरोप पहिला आरोप नाही".

पवार साहेब म्हणाले, परमबीर सिंह यांची बदली झाली म्हणून आरोप केले असं ते म्हणाले. सुबोध जयस्वाल, रश्मी शुक्ला यांची बदली नव्हती. त्यांनी मेहनत करून अहवाल केला.

पवारांची पत्रकार परिषद ऐकल्यावर आश्चर्य वाटलं. सरकारचे निर्माते ते आहेत. निर्मात्यांना आपलं सरकार कसंही वागलं तरी बचाव करावा लागतो. वाझे यांना परमबीर सिंह यांनीच सेवेत दाखल करून घेतलं. सरकार झोपलं होतं का? मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांना नियम माहिती नाहीत का? असा सवाल फडणवीस यांनी केला.

फोटो स्रोत, Facebook

फोटो कॅप्शन,

गृहमंत्री अनिल देशमुख

"निलंबनाची कारवाई झालेल्या व्यक्तीला एक्झ्क्युटिव्ह दर्जाची पोस्ट देता येत नाही. सरकारच्या आशिर्वादाशिवाय झालं का? पवार साहेब म्हणतात ते अर्धसत्य आहे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांच्या आशिर्वादाने, परमबीर सिंह यांनी वाझे यांना सेवेत रुजू करून घेतलं.

पवार साहेब म्हणाले, घटनेची चौकशी ज्युलियो रिबेरो यांनी करावी. त्यांच्याबद्दल सगळ्यांनाच आदर. परमबीर सिंह यांची चौकशी करणार का गृहमंत्र्यांची देखील चौकशी करणार. पदावर असलेल्या गृहमंत्र्यांची चौकशी अनेक वर्षांपूर्वी निवृत्त झालेली डीजी करू शकतात?

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

सचिन वाझे

फडणवीस म्हणाले, परमबीर सिंह यांनी लिहिलं की मुख्यमंत्र्यांना, गृहमंत्र्यांना सांगितलं, पवार साहेबांना सांगितलं असं स्पष्ट लिहिलं आहे. त्यांनी चॅट जोडलं आहे. त्याकडे दुर्लक्ष करणं म्हणजे पापावर पांघरुण घालण्यासारखं आहे. याप्रकरणाची चौकशी गृहमंत्री पदावर असताना होऊ शकत नाहीत. गृहमंत्र्यांचा राजीनामा घेऊन चौकशी झाली पाहिजे. गृहखातं कोण चालवतं याविषयी शंका आहे.

गृहविभागाच्या चर्चेवर शिवसेनेचे नेते आमदार अनिल परब बोलत होते. शिवसेनेचा हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात आहे. यात भूमिका कोणाची हे स्पष्ट व्हायला हवं असं फडणवीस यांनी विचारलं.

गाड्या वाझेंकडे मिळाल्या. या गाड्या कोणी मोठे लोक वापरत होते का हेही तपासलं पाहिजे. गृहमंत्री राजीनामा देत नाहीत तोवर भाजपचं आंदोलन सुरू राहील असंही त्यांनी सांगितलं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)