'अनिल देशमुखांच्या राजीनाम्याचा प्रश्नच येत नाही' - जयंत पाटील

अनिल देशमुख

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर थेट आरोप केल्यानंतर अनिल देशमुखांना गृहमंत्रिपद सोडावे लागेल अशी भूमिका विरोधकांनी वारंवार मांडली. पण अनिल देशमुखांच्या राजीनाम्याचा प्रश्नच येत नाही असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत शरद पवार, प्रफुल्ल पटेल, अजित पवार आणि जयंत पाटील होते. त्यांच्यात तब्बल अडीच तास चर्चा झाली. ही चर्चा झाल्यानंतर जयंत पाटलांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटले की "आमची चर्चा पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीबाबतच झाली. अनिल देशमुखांच्या राजीनाम्याचा प्रश्नच येत नाही."

याआधी, शरद पवारांनी पत्रकार परिषदेत म्हटले होते की अनिल देशमुख यांच्याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आहे. पूर्ण चौकशीअंती त्यांनी योग्य तो निर्णय घ्यावा.

'अनिल देशमुखांबद्दल दोन दिवसांमध्ये निर्णय होईल' - शरद पवार

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी पाठवलेल्या पत्रावर बोलताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले, "मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या प्रकरणाची चौकशी करण्याचा अधिकार आहे. त्यांनी चौकशी करून पुढील निर्णय घ्यावा."

याप्रकरणी कोणती पावलं उचलावी, हेही मुख्यमंत्र्यांनी ठरवावं, असंही शरद पवार म्हणाले.

"सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न होऊ शकतात, पण त्यामुळे काहीही होणार नाही. महाविकास आघाडी सरकारला या प्रकरणाचा धोका नाही," असा दावाही शरद पवार यांनी केला आहे.

सचिन वाझे प्रकरणावरही शरद पवार यांनी वक्तव्य केलं. पवार म्हणाले, "सचिन वाझेंच्या पुनर्नियुक्तीचा निर्णय गृहमंत्र्यांचा नाही. वाझेंना परमबीर सिंह यांनीच पुन्हा सेवेत घेतलं होतं."

तर "परमबीर सिंह यांनी केलेले 100 कोटींच्या वसुलीचे आरोप गंभीर आहेत. पण त्या पत्रावर परमबीर सिंह यांचे हस्ताक्षर नाहीत. तसंच, 100 कोटी कुणाकडे गेले याचा उल्लेख पत्रात नाही," असं पवार म्हणाले.

गृहमंत्री अनिल देशमुखांनी सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझेंना महिन्याला 100 कोटी रुपये वसूल करण्याचे लक्ष्य दिले होते असा आरोप माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केल्यानंतर विरोधी पक्षाने गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी परमबीर सिंहांचे आरोप फेटाळून लावले आहेत.

अनिल देशमुख यांचा राजीनामा घेतला जाईल की नाही याबाबत विचारले असता शरद पवार म्हणाले, 'अनिल देशमुख यांच्याबाबतचा निर्णय दोन दिवसांत होईल.'

राजवट उत्तम, पण काहीतरी दुरुस्त करावं लागेल - संजय राऊत

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

"सध्याची ही राजवट उत्तम चालली आहे, पण काहीतरी दुरूस्त करावं लागेल. गेल्या 72 तासात सरकारवर शिंतोडे उडाले आहेत आणि मी हे मान्य करतो," असं वक्तव्य शिवसेना प्रवक्ते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.

"जगभरात सत्तेवर बसलेल्यांना वाटतं आपण शहाणे आहोत. मात्र सत्तेपुढे शहाणपण नसतं," असंही राऊत म्हणाले.

परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रावर प्रतिक्रिया देताना राऊत बोलत होते.

या पत्रामध्ये सचिन वाझे यांच्या संदर्भात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. याप्रकरणी आता अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे.

याबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले, "जगभरात सत्तेवर बसलेल्यांना वाटतं आपण शहाणे आहोत. मात्र सत्तेपुढे शहाणपण नसतं, हे या प्रकरणी कळलं असेल."

ते पुढे म्हणाले, "हे सरकार स्थापन होऊन आता दीड वर्ष झालं आहे. सध्या सरकारमधील प्रत्येक घटकाने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. आपले पाय तपासायला हवे, जमिनीवर आहेत का, हे सर्वांनी तपासावं."

शरद पवारांनी अजित पवार, जयंत पाटलांना दिल्लीत बोलावलं

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील या दोघांना तातडीने दिल्लीत बोलावलं आहे. आज संध्याकाळी 5 वाजता दिल्लीत या तिघांमध्ये बैठक होईल.

फोटो स्रोत, Getty Images

अजित पवार आणि जयंत पाटील हे पंढरपूरमध्ये आहेत. भारत भालके यांच्या निधाननंतर रिक्त झालेल्या जागेवर उमेदवार निश्चितीसाठी ते पंढरपुरात आहेत. मात्र, दुपारनंतर ते दिल्लीत पवारांना भेटण्यासाठी जातील.

अजित पवार आणि जयंत पाटील हे दोघेही महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते आहेत. परमबीर सिंह यांच्या पत्रानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना, शरद पवारांनी अजित पवार, जयंत पाटील यांना दिल्लीत बैठकीसाठी बोलावल्यानं तर्क-वितर्क लढवले जात आहेत.

दिल्लीत शरद पवारांसोबत राष्ट्रवादीच्या या दोन वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत काय होतंय, याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. अनिल देशमुख यांच्या गृहमंत्री म्हणून भवितव्यावर या बैठकीत चर्चेची शक्यता वर्तवली जात आहे.

संजय राऊत म्हणतात, 'हमको तो बस तलाश नए रास्तों की है..'

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यानंतर राज्याचं अवघं राजकारण ढवळून निघालं असताना, शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी सूचक ट्वीट केलं आहे. या ट्वीटची राजकीय वर्तुळात जोदार चर्चा सुरू झाली आहे.

संजय राऊत यांनी ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांच्या दोन ओळी ट्वीट केल्या आहेत. "हमको तो बस तलाश नए रास्तों की है, हम हैं मुसाफिर ऐसे जो मंजिल से आए हैं," अशा त्या ओळी आहेत.

फोटो स्रोत, Twitter

आता या ओळींमुळे अनेक राजकीय तर्क-वितर्क लढवले जात आहेत. महाराष्ट्रात एखादी मोठी राजकीय घडामोड घडल्यानंतर सहसा संजय राऊत अशाप्रकारे सूचक ट्वीट करत असतात. त्यामुळे त्यांच्या या ट्वीटवरूनही तर्क-वितर्क लढवले जात आहेत. आता स्वत: संजय राऊतच पुढे येऊन याबाबत काही सांगतात का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

परमबीर सिंह यांच्या 'लेटरबॉम्ब'नंतर आज काय होणार?

गृहमंत्री अनिल देशमुखांनी सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझेंना महिन्याला 100 कोटी रुपये वसूल करण्याचे लक्ष्य दिले होते असा आरोप माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केल्यानंतर विरोधी पक्षाने गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी परमबीर सिंहांचे आरोप फेटाळून लावले आहेत

फोटो स्रोत, Getty Images

विरोधक आक्रमक

भाजपकडून आज (21 मार्च) महाराष्ट्रभर गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यासाठी निदर्शनं केली जाणार आहेत. भाजपचे महाराष्ट्रातील मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी याबाबत ट्विटरवरून माहिती दिली. दुसरीकडे, भाजपचे महाराष्ट्रातील सर्वच नेते महाविकास आघाडीवर निशाणा साधताना दिसत आहेत.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे की "हे सरकार भ्रष्ट आहे, हे अगदी स्पष्ट आहे. पोलीस आयुक्तच सांगत आहेत की गृहमंत्र्यांनीच वसुलीचे टार्गेट दिले होते तर आणखी पुरावा काय हवा त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अनिल देशमुखांचा तत्काळ राजीनामा घ्यावा."

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे, की ज्या परमबीर सिंहांची अनिल देशमुख विधिमंडळात पाठराखण करत होते आता तेच परमबीर सिंहांविरोधात बोलत आहेत. याचा काय अर्थ आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी केली राजीनाम्याची मागणी

एखादा विद्यमान अधिकारी थेट राज्याच्या गृहमंत्र्यांबद्दल अशाप्रकारचे पत्र लिहिण्याची ही महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिलीच वेळ आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाचा केंद्रीय यंत्रणांमार्फत वा न्यायालयाच्या देखरेखीखाली तपास व्हावा आणि अनिल देशमुखांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरात केली.

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त आणि विद्यमान महासंचालक, होमगार्ड-परमबीर सिंग यांनी लिहिलेले हे पत्र केवळ खळबळजनक नाही, तर अतिशय धक्कादायक आहे, असं फडणवीस म्हणाले.

माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, "परमबीर सिंग यांनी या पत्रात त्यांनी जो संवाद जोडला आहे, त्यातून स्पष्ट होते की, पैशाची थेट मागणी झालेली आहे. ज्याप्रकारे पोस्टिंग, विशिष्ट अधिकार देणे यासाठी आर्थिक व्यवहार होतात, यातून पोलीस दलाचे मोठ्या प्रमाणात खच्चीकरण होताना दिसते आहे. इतके गंभीर आरोप झाल्यानंतर गृहमंत्री आपल्या पदावर राहूच शकत नाही. त्यांनी तत्काळ राजीनामा दिला पाहिजे किंवा मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे.

मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील अनिल देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. अनिल देशमुखांवर लागलेले आरोप गंभीर आहेत. यामुळे महाराष्ट्राच्या प्रतिमेला तडा गेला आहे. अनिल देशमुखांनी आपला राजीनामा देऊन चौकशीला सामोरे जावे असं ट्वीट राज ठाकरे यांनी केले आहे.

'परमबीर सिंहांचा लेटरबाँब'

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दरमहा 100 कोटी रुपयांची मागणी केली असं पत्र मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. हे पत्र त्यांनीच लिहिलं आहे का याची खातरजमा करण्यासाठी बीबीसीने परमबीर सिंह यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

'मुकेश अंबानी प्रकरणी तसेच मनसुख हिरेन हत्याप्रकरणी यांचा सहभाग स्पष्ट हेत असताना त्याचे धागेदोरे परमबीर सिंग यांच्यापर्यंत पोहचणार असल्याचं तपासातून स्पष्ट होत असताना परमबीर सिंग यांनी स्वतःला वाचवण्यासाठी आणि कारवाईपासून वाचण्यासाठी खोटा आरोप केला आहे', अशी अनिल देशमुख यांनी आपली बाजू ट्वीटरवर मांडली आहे.

फोटो स्रोत, Twitter/Anil Deshmukh

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. काही दिवसांपूर्वीच सचिन वाझे प्रकरणी परमबीर सिंह यांची मुंबई पोलीस आयुक्त पदावरून बदली करण्यात आली होती.

या बदलीनंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एबीपी माझा आणि लोकमतला मुलाखत दिली होती. त्या मुलाखतीच्या संदर्भात परमबीर सिंह यांनी पत्र लिहून आपली बाजू मांडली आहे.

परमबीर सिंह यांची बदली करण्यात आल्यानंतर अस्वस्थ असलेल्या सिंह यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून अनिल देशमुख यांची तक्रार केली आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)