योगी आदित्यनाथ : 'यूपीत कायदा सुव्यवस्थेत सुधारणा, 4 वर्षात एकही दंगल नाही' #5मोठ्याबातम्या

योगी आदित्यनाथ

फोटो स्रोत, Ani

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाईट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.

1. यूपीच्या कायदा सुव्यवस्थेत सुधारणा, 4 वर्षांत एकही दंगल नाही - योगी आदित्यनाथ

"उत्तर प्रदेश सरकारने देशीविदेशी गुंतवणूकदारांसाठी राज्याला सर्वात चांगलं ठिकाण बनवलं आहे. गेल्या चार वर्षांपासून सगळे सण-उत्सव शांततापूर्ण पद्धतीने साजरे केले जातात. यूपीच्या कायदा सुव्यवस्थेत सुधारणा पाहायला मिळत असून गेल्या चार वर्षांत एकही दंगल झाली नाही," असा दावा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला आहे.

उत्तर प्रदेशमधील भाजपच्या सरकार स्थापनेला चार वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने योगी आदित्यनाथ बोलत होते.

पोलिसांकडून गुन्हेगारांवर योग्य कारवाई करण्यात आल्यामुळेच उत्तर प्रदेशातील परिस्थिती बदलल्याचा दावा योगींनी केला.

"राज्यातील पोलीस यंत्रणेत आम्ही अनेक बदल केले. लखनौ आणि नोएडामध्ये पोलीस आयुक्त यंत्रणा लागू केली. आधीच्या सरकारांनी हे केलं नव्हतं," असं योगी म्हणाले. ही बातमी NDTV ने दिली आहे.

2. राज्यात कोरोना रुग्णसंख्येचा विस्फोट, शनिवारी आढळले 27 हजार रुग्ण

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. गेल्या तीन दिवसांपासून सलग 25 हजारांपेक्षा जास्त रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले.

फोटो स्रोत, Getty Images

तर शनिवारी (20 मार्च) या संख्येत आणखी वाढ होऊन तब्बल 27 हजार 126 नवीन कोरोना रुग्ण राज्यात आढळून आले.

शनिवारी 13 हजार 588 रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण 22,03,553 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. यानुसार राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 89.97% इतका आहे.

दरम्यान, आज 92 रुग्णांना आपला जीव कोरोनामुळे गमवावा लागला. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.18% इतका झाला आहे.

सध्या राज्यात 9,18,408 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 7,953 व्यक्ती संस्थात्मक क्वारांटाईनमध्ये आहेत. ही बातमी एबीपी माझाने दिली.

3. प्रताप भानू मेहता यांच्या राजीनाम्यानंतर जगभरातील शिक्षणतज्ज्ञांचं विद्यापीठाला पत्र

राजकीय विश्लेषक प्रताम भानू मेहता यांनी अशोका विद्यापीठातील प्राध्यापकपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यावर तीव्र प्रतिक्रिया येताना दिसत आहे.

अर्थतज्ज्ञ रघुराम राजन यांच्यासह जगभरातील अनेक शिक्षणतज्ज्ञांनी मेहता यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया दिली. तब्बल 150 हून अधिक तज्ज्ञांनी विद्यापीठाच्या विश्वस्तांना पत्र लिहिलं.

फोटो स्रोत, facebook

फोटो कॅप्शन,

प्रताप भानू मेहता

यामध्ये हार्वर्ड, येल, कोलंबिया, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि एमआयटी यासारख्या नामांकित शिक्षणसंस्थांमधील तज्ज्ञांचा समावेश आहे.

मेहता आणि सुब्रमणियन यांनी दिलेले राजीनामे म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरचा हल्ला आहे. विद्यापीठाच्या संस्थापकांनी आत्मा गहाण ठेवण्याचा प्रकार आहे, अशी टीका रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी केली आहे. ही बातमी लोकसत्ताने दिली आहे.

4. भाजप हा लुटारूंचा पक्ष - ममता बॅनर्जी

"भारतीय जनता पक्ष हाच जगातील सर्वात मोठा लुटारू पक्ष आहे. त्यांनी नोटबंदीपासून बँकबंदीपर्यंत देशातील सामान्य नागरिकांना लुटण्याचे काम केलं," अशी टीका पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली आहे.

हल्दिया येथे आयोजित एका प्रचारसभेत ममता बॅनर्जी बोलत होत्या.

फोटो स्रोत, Getty Images

"पश्चिम बंगालची सत्ता भाजपला मिळता कामा नये. दंगल, हत्या, लैंगिक शोषण अशा प्रकरणांमध्ये भाजपचं नाव वारंवार येत आहे. बंगाली लोकांना दंगलमुक्त राज्य हवं आहे," असं म्हणत ममता बॅनर्जी यांनी आपल्या तृणमूल काँग्रेस पक्षाला निवडून देण्याचं आवाहन लोकांना केलं. ही बातमी लोकमतने दिली आहे.

5. काँग्रेस नेते भाजपशीही हातमिळवणी करू शकतात - पी. सी. चाको

"केरळ काँग्रेसमध्ये काहीही होऊ शकतं, केरळचे काँग्रेस नेते भाजप आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघाशीही हातमिळवणी करू शकतात," अशी टीका नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले केरळ येथील माजी खासदार पी. सी. चाको यांनी केली आहे.

पी. सी. चाको यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत हा दावा केला. "केरळमध्ये काँग्रेस अंतर्गत कलहाने पछाडलेली आहे. काँग्रेस सोडल्यानंतर पक्षाने माझ्याशी काहीच संपर्क केला नाही. मलाही हायकमांडसोबत कोणतीही बार्गेनिंग करायची नव्हती," असं चाको म्हणाले.

"ओमेन चंडी असोत की रमेश चेन्निथला हे काँग्रेस नेते केरळात भाजप आणि संघाशी गुप्त समझोता करणार करण्यात मागेपुढे पाहणार नाहीत, असा दावा चाको यांनी केला. ही बातमी टीव्ही 9 मराठीने दिली.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)