राज ठाकरे : 'स्फोटक प्रकरणाचा तपास करा, कल्पनेबाहेरील चेहरे समोर येतील'

फोटो स्रोत, Getty Images
महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची कसून चौकशी व्हायला हवी, अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. कालच राज ठाकरे यांनी याआधीच गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे.
मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरील स्फोटकं ठेवलेल्या गाडीचा केंद्री यंत्रणेकडून कसून चौकशी केल्यास, कल्पनेबाहेरील चेहरे समोर येतील, असा दावा राज ठाकरे यांनी केला आहे.
"परमबीर सिंह यांचाही या प्रकरणात सहभाग आहे, हे लक्षात आलं होतं तर चौकशी का नाही केली, बदली का करण्यात आली?" असा सवाल करत राज ठाकरे यांनी अनिल देशमुख यांच्यावर निशाणा साधला आहे.
वाझे-परमबीर सिंह यांच्यापुरता हा विषय मर्यादित नाही. याची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे, असंही राज ठाकरे म्हणाले.
फोटो स्रोत, ANI
तसंच, केंद्र सरकारने गृहमंत्रालयाने याकडे गांभीर्याने लक्ष घातलं पाहिजे, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली.
राज ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे -
- बॉम्ब अतिरेकी ठेवतात हे माहिती होतं, पण बॉम्ब पोलीस ठेवतात हे पहिल्यांदाच ऐकलं, पाहिलं
- परमबीर सिंह यांची बदली का केली, हे अजूनही सरकारने सांगितलेलं नाही
- परमबीर सिंह यांचाही या प्रकरणात सहभाग आहे, हे लक्षात आलं होतं तर चौकशी का नाही केली, बदली का करण्यात आली?
- तुमच्यावरचं बालंट तुम्ही दुसऱ्याच्या अंगावर टाकून मोकळे झालात का?
- आपल्या देशात प्रश्न निर्माण होतात, पण त्याची उत्तरं सापडत नाहीत
- जिलेटीनचा सोर्स नेमका काय? हे जिलेटीन नेमके आले कुठून?
- या प्रकरणात इतक्या गाड्यांचा सहभाग की आता वाझेची गाडी कोणती तेच कळेनासं झालं आहे.
- वाझे ख्वाजा युनूस प्रकरणात 17 वर्षे निलंबित होता. 58 दिवस तुरुंगात होता. दरम्यान त्याने शिवसेनेत प्रवेश केला होता. त्याला शिवसेनेत प्रवेश मिळवून देण्यासाठी कोण घेऊन गेलं होतं?
- देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात वाझेला पुन्हा पोलीस सेवेत घ्यावं, अशी मागणी शिवसेनेने केली होती.
- उद्धव ठाकरे आणि मुकेश अंबानी यांच्यात अत्यंत मधुर संबंध आहेत. शपथविधी कार्यक्रमाला ते उपस्थित होते, हे आपण पाहिलं असेल.
- वाझे-परमबीर सिंह यांच्यापुरता हा विषय मर्यादित नाही. याची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे.
- केंद्र सरकारने गृहमंत्रालयाने याकडे गांभीर्याने लक्ष घातलं पाहिजे.
- धमकीचं पत्रातला मजकूर पाहिला. धमकी देणारा माणूस 'नीता भाभी'. 'मुकेश भैय्या' असं आदराने कसं बोलू शकतो?
- अंबानींकडून कुणी पैसे काढू शकतो का? ज्या मुख्यमंत्र्यांचे अंबानींशी इतके मधुर संबंध आहेत, तिथं पोलीस पैसे काढायला जातील का?
- कुणाच्या सांगण्यावरून ही गाडी ठेवण्यात आली, याची कसून चौकशी होणं आवश्यक आहे. या विषयात केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा.
- बारमध्ये जाऊन पैसे गोळा करा, असं गृहमंत्री सांगतो, हे ऐकून लाज वाटली
- केंद्राने याचा गांभीर्याने तपास केला नाही, तर हा देश अराजकतेकडे चालला आहे, असं म्हणावं लागेल.
- अनिल देशमुखांना तत्काळ पदावरून हटवलं पाहिजे
- या प्रकरणाची कसून चौकशी केल्यास, कल्पनेबाहेरील चेहरे समोर येतील
- एका उद्योगपतीच्या घरासमोर पोलिसांकडून बॉम्ब ठेवला जातो ही क्षुल्लक गोष्ट नाही.
- चौकशी करण्याची मागणी मी राज्य सरकारकडे नव्हे तर केंद्र सरकारकडे केली आहे.
- जो विचार अतिरेकी करतात, तो विचार पोलिसांना करायला यांनी भाग पाडलं आहे.
- फक्त पैसे काढण्यासाठी बॉम्ब ठेवलेला नाही, यामागचं कारण वेगळंच आहे.
फोटो स्रोत, Twitter
सध्या राज्यातील राजकीय वातावरण प्रचंड ढवळून निघालेलं आहे. आधीच मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडल्याच्या प्रकरणात सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (NIA) अटकेत आहेत.
दरम्यान, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून थेट गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केल्याने सर्वांना धक्का बसला आहे.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना दर महिन्याला 100 कोटींची वसुली करण्याचं टार्गेट दिलं होतं, या आरोपानंतर अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)