अरुणाचल प्रदेशात भारताच्या युरेनियम शोधाला चीनचा आक्षेप का?

  • दिलीप कुमार शर्मा
  • गुवाहाटीहून बीबीसी हिंदी डॉट कॉमसाठी
चीन, अरुणाचल प्रदेश, युरेनियम

फोटो स्रोत, DILIP SHARMA

फोटो कॅप्शन,

चीन, अरुणाचल प्रदेश, युरेनियम

अरुणाचल प्रदेशमध्ये युरेनियमचे साठे आहेत हे लक्षात आल्यानंतर या भागात अनेक शोधप्रकल्प सुरू झाले आहेत. चीनने याप्रती आक्षेप नोंदवला आहे. सत्ताधारी भाजपने मात्र भारत आपल्या अधिकारक्षेत्रात, भूभागात शोधप्रकल्प आणत असेल तर चीनला त्यावर बोलण्याचा अधिकार नाही असं म्हटलं आहे.

अरुणाचल प्रदेश भाजपचे प्रवक्ते डॉमॅनिक तादार यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, "आम्ही आमच्या राज्यात आपल्या जमिनीवर काम करत आहोत. यावर चीनने बोलणं चुकीचं आहे. अशा प्रतिसादाला आम्ही थारा देत नाही. अरुणाचल प्रदेशातल्या शिऱ्योमी जिल्ह्यात युरेनियमचे साठे असल्याचं स्पष्ट झालं आहे. हा आमच्या राज्याच्या जिल्ह्याचा भाग आहे. शिऱ्योमी भारत आणि अरुणाचल प्रदेशचा अविभाज्य भाग आहे".

ते पुढे सांगतात, "शिऱ्योमी जिल्हा अरुणाचल प्रदेश राज्यात येतो. चीन नेहमीच अशा पद्धतीचे आक्षेप नोंदवत असतो. जेव्हाही आम्ही अरुणाचल प्रदेशात काही काम हात घेतो, पंतप्रधान-राष्ट्रपती या भागाला भेट देतात तेव्हा चीनला आक्षेप असतो. चीनचं सरकार आणि तिथली माणसं हे सहन करू शकत नाहीत. आक्षेप घेण्याची ही चुकीची पद्धत चीनने सोडून द्यायला हवी".

चीनला आक्षेप काय आहे?

चीनमधलं सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सने बुधवारी यासंदर्भात बातमी दिली. अरुणाचल प्रदेशात युरेनियमच्या साठ्यांसंदर्भात भारताने काम हाती घेतलं आहे, यावर चीनच्या अधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. भारताचा युरेनियम कार्यक्रम बेकायदेशीर असल्याचं चीनच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.

ग्लोबल टाईम्सने 17 मार्च रोजी छापलेल्या बातमीत म्हटलं, चीनच्या विशेषज्ञांनी दक्षिण तिबेटमध्ये भारताने बेकायदेशीर पद्धतीने युरेनियमचे साठे शोधून काढणं आणि त्याच्या सनसनाटी वृत्तांकनासाठी भारतीय प्रसारमाध्यमांना दोषी ठरवलं आहे. चीनच्या प्रदेश बळकावण्याची भारताची वृत्ती यातून दिसते असं ग्लोबल टाईम्सने म्हटलं आहे.

अशा पद्धतीचं वागणं भारत-चीन संबंध आणखी जटिल करू शकतं असं चीनच्या विशेषज्ञांचं म्हणणं आहे.

फोटो स्रोत, DILIP SHARMA

फोटो कॅप्शन,

भारत-चीन संघर्ष जुना आहे.

अरुणाचल प्रदेश हा वादग्रस्त भाग असल्याचा चीनचा दावा आहे. चीन या भागाला दक्षिण तिबेट असं संबोधतो. अरुणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य भाग आहे हे चीनला मान्य नाही.

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

ग्लोबल टाईम्सनुसार, गेल्या शतकात, तथाकथित अरुणाचल प्रदेशची निर्मिती बेकायदेशीर पद्धतीने करण्यात आली. चीनच्या जवळजवळ 90,000 किलोमीटर प्रदेशावर भारताचा ताबा आहे असं ग्लोबल टाईम्सने म्हटलं आहे.

दोन दिवसांपूर्वी भारतातल्या प्रमुख वर्तमानपत्रांमध्ये एक बातमी प्रसिद्ध झाली होती. बातमीत असं म्हटलं होतं की, भारत-चीन सीमेपासून केवळ तीन किलोमीटरवर असलेल्या अरुणाचल प्रदेशातील एका ठिकाणी युरेनियमचे साठे शोधण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे.

खनिज अन्वेषण आणि अनुसंधान निदेशालयाचे संचालक डीके सिन्हा यांनी सोमवारी हैदराबादमध्ये सांगितलं की, केंद्र सरकारकडून आम्हाला प्रोत्साहन मिळालं आहे. म्हणूनच आम्ही या भागात युरेनियमचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.

पर्वतराजीचा प्रदेश असल्याने हवाई पद्धतीने युरेनियमचा शोध घेणं शक्य नव्हतं. शोध घेण्यासाठी आम्ही पर्वतांच्या शिखरावर पोहोचलो असं सिन्हा यांनी सांगितलं.

इंडियन न्यूक्लिअर सोसायटीद्वारा आयोजित रेडिएशन अँड एन्व्हॉनर्मेंट या विषयावर आधारित एकदिवसीय परिसंवादात बोलताना सिन्हा म्हणाले की, भारतातल्या सगळ्यात दूरच्या गावात मेचूका घाटीपर्यंत आम्ही पोहोचलो आहोत.

युरेनियम शोधण्याचं काम सुरू

टाईम्स ऑफ इंडियाने डीके सिन्हा यांच्या हवाल्याने यासंदर्भातील बातमी 16 मार्चला छापली होती. युरेनियम साठ्यांचा शोध अरुणाचल प्रदेशातल्या सियांग जिल्ह्यातल्या आलो या ठिकाणी करण्यात आलं. हे ठिकाण जमिनीपासून 619 मीटर उंचीवर आहे.

पश्चिम सियांग जिल्ह्याचे उपायुक्त राजीव ताकुक यांनी बीबीसीशी फोनवर बोलताना सांगितलं की, "युरेनियम शोधासंदर्भात ज्या भागाचा उल्लेख करण्यात येतो आहे तो आधी पश्चिम सियांग जिल्ह्यातच येत असे. मात्र आता हा भाग शिऱ्योमी जिल्ह्याअंतर्गत येतो. हा अरुणाचल प्रदेशचा नवा जिल्हा आहे. चीनच्या सीमेच्या अगदी जवळ असा हा भाग आहे. हा भाग माझ्या जिल्ह्याअंतर्गत येत नाही. मात्र तिथे युरेनियमचा शोध घेण्याचं काम सुरू झालं आहे याची मला माहिती आहे".

फोटो स्रोत, DILIP SHARMA

फोटो कॅप्शन,

सीमेनजीकच्या भागात युरेनियमचा शोध सुरू आहे.

ग्लोबल टाईम्सने लडाखमध्ये सुरू असलेल्या घडामोडींचा उल्लेख करताना लिहिलं आहे की, विशेषज्ञांनी इशारा दिला आहे की भारताचा आक्रमक पवित्रा भारत-चीन संबंधांमध्ये बाधा आणू शकतो. सीमा भागातील तणाव कमी करणं हा संबंधामधील महत्त्वाचा मुद्दा आहे. एकतर्फी समस्या दोन्ही देशांना चर्चेच्या टेबलावर एकत्र आणू शकत नाही.

ग्लोबल टाईम्सच्या सिंघुआ विद्यापीठाच्या राष्ट्रीय रणनीती संस्थानचे अनुसंधान विभागाचे संचालक कियान फेंग यांच्या हवाल्याने म्हटलं आहे की, तिबेटच्या दक्षिण भागात भारताने अवैध पद्धतीने शिरकाव केला आहे. आपला दावा योग्य ठरवण्यासाठी वादग्रस्त भागावर कब्जा करण्याच्या भारतीय मानसिकतेचं हे प्रतीक आहे.

चीनवर कारवाई करण्याचं आव्हान

ग्लोबल टाईम्सने दिलेल्या बातमीनुसार, सिंघुआ विद्यापीठात भारतासंदर्भात अभ्यास करणारे प्राध्यापक शी चाओ यांनी भारताच्या इशाराविरोधात कारवाईचं आव्हान केलं आहे.

भारत-चीन सीमा विवादांचे जाणकार तसंच लष्करी सुरक्षा विश्लेषक रुपक भट्टाचार्य यांनी बीबीसीला सांगितलं की, "अरुणाचल प्रदेशात खनिज मंत्रालयांच्या निर्देशानुसार अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी युरेनियमच्या साठ्यांसंदर्भात संशोधन केलं आहे.

"राज्याच्या पश्चिम सियांग, पश्चिम कामेंग, लोअर सुबनसिरी तसंच अपर सुबनसिरी जिल्ह्यांमध्ये 1969पासून युरेनियमच्या साठ्यांचा शोध सुरू आहे. या जिल्ह्यांमध्ये युरेनियमचा एक वेगळा प्रकार आढळल्याचं स्पष्ट झालं होतं".

फोटो स्रोत, DILIP SHARMA

फोटो कॅप्शन,

अरुणाचल प्रदेश

युरेनियम साठ्यांचा शोध आणि त्याची खाण या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत. युरेनियमचे साठे शोधताना रेडियोमॅट्रिक सर्वेक्षण, भूवैज्ञानिक मानचित्रण आणि ड्रिलिंग केलं जातं.

पूर्वांचलाकडच्या राज्यांपैकी मेघालयात खाणकाम करण्यात आलं आहे. मात्र स्थानिक आदिवासींच्या विरोधामुळे खाणप्रकल्पाचं काम थांबवण्यात आलं होतं.

युरेनियम हा रेडिओअॅक्टिव्ह पदार्थ आहे. याला लष्करी खनिज असं म्हटलं जातं. कारण अणूऊर्जा निर्मितीत आणि हत्यारं बनवण्यात याचा वापर केला जातो.

अर्थात हत्यारं बनवण्यासाठी युरेनियमला घडवावं लागतं. ही जटील अशी प्रक्रिया आहे.

याआधीही अशा प्रक्षोभक बातम्या प्रसिद्ध

युरेनियम साठे शोधण्यासंदर्भात रुपक म्हणतात, ज्या जिल्ह्यांमध्ये युरेनियमचा शोध घेतला गेला आहे ते नियंत्रण रेषेपासून अगदी जवळ आहेत. चीन नेहमीच अशा पद्धतीने व्यक्त होत असतं.

ग्लोबल टाईम्स हे तिथल्या सरकारचं मुखपत्र आहे. चीनच्या सरकारतर्फे चालवण्यात येणाऱ्या विद्यापीठातील लोकांची वक्तव्यं घेतली जातात. त्यामुळे ग्लोबल टाईम्समध्ये अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या म्हणून त्याला मोठं समजू नये. डोकलाम वादावेळीही अशाच स्वरुपाच्या प्रक्षोभक बातम्या प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

भारत-चीन

यंदा जानेवारीत काही भारतीय वृत्तवाहिन्यांनी उपग्रहाच्या आधारे दावा केला होती की चीनने अरुणाचल प्रदेशाचा भाग असलेल्या आणि भारताचं नियंत्रण असलेल्या भागात पक्क्या घरांचं गाव वसवलं आहे.

चीनचा स्वायत्त भाग असलेल्या तिबेटची 1,129 किलोमीटरची सीमा अरुणाचल प्रदेशाला संलग्न आहे.

भारताच्या ताब्यातील या भागावर चीनच्या नियंत्रणावर रुपक म्हणाले, चीनने 31 डिसेंबर 2020 रोजीच सिचुआनची राजधानी असलेल्या चेंगडूहून तिबेटची राजधानी असलेल्या ल्हासा तसंच न्यिंग-ची रेल्वे मार्गाचं काम पूर्ण केलं आहे.

न्यिंग-ची हे अरुणाचल प्रदेशच्या सीमेपासून अगदी जवळ असलेलं चीनचं शहर आहे. भारतासाठी हा चिंतेचा मुद्दा आहे कारण जून महिन्यापासून या ठिकाणहून रेल्वे वाहतुकीला सुरुवात होईल. चेंगडूहून ल्हासाला येण्यासाठी 48तास लागत असत, आता हा प्रवास 13 तासात करता येणार आहे. सुरक्षा हा खासकरून संवेदनशील मुद्दा आहे, अरुणाचल प्रदेशाकरता.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)