कोरोना: डबल म्युटंट म्हणजे काय? त्याच्यामुळेच महाराष्ट्रात संसर्ग वाढतोय का?

  • मयांक भागवत
  • बीबीसी मराठी
कोरोना, म्युटेशन, शास्त्र

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

कोरोनाचं म्युटेशन झालं आहे.

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोना संसर्ग झपाट्याने पसरतो आहे. कोव्हिड-19 चा प्रसार मुंबई, पुणे आणि नागपूरसारख्या शहरी भागापुरता मर्यादित राहिलेला नाही. ग्रामीण भागात कोरोनाचा धोका वाढू लागलाय.

महाराष्ट्रात कोव्हिड-19 ची दुसरी लाट आल्याचं केंद्र सरकारने स्पष्ट केलंय. मुंबईत 24 मार्चला कोरोनाग्रस्तांची संख्या 5 हजारापार पोहोचली तर पुणे शहरात 23 मार्चला 3145 तर ग्रामीण भागात 1108 रुग्णांची नोंद झाली आहे.

या वाढीमागे नुकताच आलेला 'डबल म्युटंट' आहे का? याचा शोध घेण्याचा प्रयत्न बीबीसी मराठीने केला.

फेब्रुवारी महिन्यात राज्यात कोव्हिड-19 संसर्ग वाढण्यास सुरुवात झाली. कोरोनाग्रस्तांच्या संख्येत अचानक वाढ कशी झाली? हे शोधण्यासाठी 'जिनोम सिक्वेंन्सिंग' करण्यात आलं.

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण दिल्लीत माहिती देताना म्हणाले, "महाराष्ट्र आणि पंजाबमध्ये वाढणारी संख्या चिंतेचा विषय आहे."

महाराष्ट्रात 'डबल म्युटंट'

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, महाराष्ट्रात कोव्हिड-19 व्हायरसमध्ये 'डबल म्युटेशन' आढळून आलंय. त्या व्हायरसला डबल म्युटंट म्हणतात.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती,

  • कोरोना व्हायरसमध्ये E484Q आणि L452R अशी दोन म्युटेशन आढळून आली
  • 'जिनोम सिक्वेंन्सिंग' साठी महाराष्ट्रातून गोळा केलेल्या नमुन्यांपैकी 15 ते 20 टक्के नमुन्यात म्युटेशन आढळून आलं
  • म्युटेशनमुळे कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असं ठोसपणे सांगता येणार नाही
  • खूप कमी नमुन्यांमध्ये हा नवीन प्रकार आढळून आला आहे

कोव्हिड-19 चा हा नवीन प्रकार किती धोकादायक आहे, याबाबत अजूनही स्पष्टता नाहीये.

महाराष्ट्राने नॅशनल इंस्टिट्युट ऑफ व्हायरोलॉजी आणि नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्सेसला 1200 नमुने जिनोस सिक्वेंसिंगसाठी पाठवले होते.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, राज्यात E484Q आणि L452R हे दोन म्युटेशन 206 कोरोना रुग्णांमध्ये आढळून आले.

'डबल म्युटेशन' म्हणजे काय?

म्युटेशन किंवा उत्परिवर्तन म्हणजे विषाणूच्या रचनेत म्हणजे गुणसुत्रांत थोडासा बदल होणं. लाखो लोकांच्या शरीरातून उड्या मारत विषाणू पसरत असतो, तेव्हा असे बदल घडतात. अशा बदल झालेल्या विषाणूंना नवीन स्ट्रेन्स किंवा व्हेरियंट्स म्हणतात.

डबल म्युटेशन विषयी बीबीसीच्या हेल्थ रिपोर्टर स्मिता मुंडसाद माहिती देतात, की "भारतात शास्त्रज्ञांना कोव्हिडच्या एकाच प्रकारच्या कोरोना विषाणूच्या रचनेमध्ये दोन महत्त्वाचे बदल आढळून आले आहेत."

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

कोरोनाचा नवा प्रकार अनेक राज्यात सापडला आहे.

यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही, असंही त्या सांगतात. "विषाणूंमध्ये असं उत्परिवर्तन होतच असतं. पण प्रश्न पडतात, की या दुहेरी म्युटेशनमुळे विषाणूचं वर्तन कसं बदलतं? हा नवा व्हेरियंट जास्त वेगानं पसरतो आहे, की जास्त तीव्र स्वरुपाचा आजार त्यामुळे होतो आहे? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सध्याच्या लशी विषाणूच्या या व्हेरियंटला रोखू शकतील का?"

संशोधक आता याच प्रश्नांची उत्तरं शोधायचा प्रयत्न करतायत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सध्या फारच थोड्या नमुन्यांमध्ये हे म्युटेशन आढळून आल्याचं म्हटलं आहे.

लशीचा विचार केला, तर सध्या उपलब्ध असलेल्या लशी जगातील बहुतांश कोरोना व्हेरियंट्सचा सामना करू शकत असल्याचं दिसतंय, असं स्मिता सांगतात. "एखाद्या व्हेरियंटसमोर एखादी लस थोडीफार कमी प्रभावी ठरू शकते. पण शास्त्रज्ञांना विश्वास वाटतो, की गरज पडल्यास सध्या उपलब्ध असलेल्या लशींमध्ये त्या नवीन म्युटेशन्सचा सामना करू शकतील असे बदल करणं शक्य आहे."

म्युटेशनवर अभ्यास सुरू आहे?

बीबीसी न्यूजशी बोलताना व्हायरोलॉजिस्ट डॉ. शाहीद जमील यांनी सांगितलं, "एकाच व्हायरसमध्ये दोन म्युटेशन होणं," या प्रक्रियेला 'डबल म्युटेशन' आणि तशा व्हायरसला डबल म्युटंट म्हणतात.

ते पुढे सांगतात, "व्हायरसच्या स्पाईक प्रोटीनमधील काही महत्त्वाच्या भागात दोन म्युटेशन झाल्याने हा व्हायरसची संसर्ग करण्याची क्षमता वाढते."

"हा व्हायरस जास्तकाळ शरीरात राहातो. त्यामुळे जास्त लोकांना याचा संसर्ग होण्याची शक्यता असते," असं विषाणूतज्ज्ञ सांगतात.

सीएसआयआरचे संचालक डॉ. शेखर मांडे बीबीसी मराठीशी बोलताना सांगतात, "या म्युटेशनवर अधिक अभ्यास सुरू आहे. याची संसर्ग क्षमता जास्त आहे का यावर संशोधन सुरू आहे. देशभरात विविध म्युटेशन आढळून आले आहेत. महाराष्ट्रात वाढणाऱ्या रुग्णसंख्येबद्दल जिनोम सिक्वेंसिंगसाठी राज्य सरकारसोबत चर्चा सुरू आहे."

E484Q ला एस्केप म्युटेशन का म्हणतात?

फेब्रुवारी महिन्यात अमरावती जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा कहर पाहायला मिळाला. रुग्णवाढीचं कारण शोधण्यासाठी काही नमुने पुण्याच्या बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये 'जिनोम सिक्वेंन्सिंग' साठी पाठवण्यात आले.

तज्ज्ञांच्या मते, "E484Q एक एस्केप म्युटेशन आहे. स्पाईक प्रोटीनमध्ये म्युटेशन झाल्याने शरीरातील अॅंटीबॉडी या बदललेल्या विषाणूला कमी प्रमाणात ओळखतात."

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

जगभरात कोरोना व्हायरसचे विविध स्ट्रेन म्हणजेच प्रकार आढळले आहेत.

संशोधकांना अमरावतीत कोरोना व्हायरसमध्ये E484Q म्युटेशन आढळून आलं होतं.

इंडियन कॉलेज ऑफ फिजिशीअनचे डीन आणि महाराष्ट्राच्या कोव्हिड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी सांगतात, "हा नवीन व्हायरस जास्त तीव्र वेगाने पसरणारा आहे. म्युटेशन झालेल्या व्हायरसचा पॅटर्न वेगळा आहे. गेल्या काही दिवसांपासून हा पॅटर्न आपण पाहात आहोत."

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, रोगप्रतिकारक शक्ती या व्हायरसला ओळखत नसल्याने याची संसर्ग क्षमता अधिक जास्त आहे.

L452R म्युटेशन काय आहे?

तज्ज्ञांच्या माहितीनुसार, L452R म्युटेशन हे फास्ट स्प्रेडिंग म्हणजे तीव्र वेगाने पसरणारं म्युटेशन आहे.

आयसीएमआरचे माजी विषाणूतज्ज्ञ डॉ. रमण गंगाखेडकर बीबीसीशी बोलताना म्हणतात, "L452R म्युटेशन पहिल्यांदा अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये आढळून आलं. त्यानंतर पूर्ण जगभरात हे म्युटेशन पसरलं. कॅलिफोर्नियामध्ये याचा प्रसार संपुष्ठात येताना पाहायला मिळतोय."

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, राज्यात L452R हे दोन म्युटेशन 118 कोरोना रुग्णांमध्ये आढळून आले.

म्युटेशन वाढण्याचं कारण?

महाराष्ट्रात सलग काही दिवस कोरोनाग्रस्तांची संख्या 25 हजारापार पोहोचल्याचं दिसून आलंय. तज्ज्ञांच्या मते, याचं प्रमुख कारण म्युटेशन (रूप बदललेला) झालेला व्हायरस आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने असं म्हटलं आहे की वाढणारी रुग्णसंख्या आणि डबल म्युटंटचा संबंध आत्ताच लावता येणार नाही पण डॉ. शशांक जोशींना वाटतं या वाढणाऱ्या संसर्गामागे डबल म्युटेशन हे देखील एक कारण असू शकतं.

डॉ. शशांक जोशी म्हणतात, "राज्यात वाढणाऱ्या संसर्गाचं प्रमुख कारण म्युटेशन झालेला व्हायरस आहे. अमरावती, विदर्भ आणि नागपूरमध्ये पसरणारे स्ट्रेन वेगळे होते. हा होम ग्रोन स्ट्रेन आहे."

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

भारतातल्या 10 प्रयोगशाळा मिळून कोरोनाचं सिक्वेन्सिंग करतायत.

राज्यात 'डबल म्युटेशन' आढळून आल्याने तज्ज्ञांची चिंता जास्त वाढलीये.

"आम्हाला भीती आहे. जर डबल म्युटेशनचं ट्रिपल म्युटेशन झालं तर, मृत्यूचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिवसेंदिवस वाढणाऱ्या संसर्गाला वेळीच आळा घालणं गरजेचं आहे," असं डॉ. जोशी पुढे सांगतात.

पण, विषाणूचा हा नवीन प्रकार किती धोकादायक आहे हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही.

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी मृत्यूदर वाढलेला नाही, यामुळे चिंता करण्याचे कारण नाही असं देखील डॉ. शशांक जोशी आवर्जून सांगतात.

जिनोम सिक्वेंसिंग म्हणजे काय?

सोप्या शब्दात सांगायचं झालं तर, 'प्रत्येक व्हायरसची जनुकीय संरचना वेगळी असते. व्हायरसची जनुकीय संरचना कशी आहे याचा शोध घेणं म्हणजे 'जिनोम सिक्वेंसिंग'.

व्हायरसला स्वत:चा DNA किंवा RNA कोड असतो. A, T, G आणि C या न्यूक्लिओ टाइड्सने व्हायरसची संरचना ओळखली जाते. व्हायरसच्या या संरचनेत मोठा बदल झाला. तर, व्हायरसचा नवीन 'स्ट्रेन' तयार झाला असं वैद्यकीय भाषेत म्हटलं जातं.

केंद्रीय आरोग्यसचिव राजेश भूषण यांच्या माहितीनुसार, देशात जिनोम सिक्वेंसिंग मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आलं आहे. येत्या काळात याची संख्या आणखी वाढवली जाईल.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)