म्यानमार : पोलिसांनी 7 वर्षांच्या चिमुकलीवर झाडली गोळी

म्यानमार, मानवाधिकारी, लहान मुलगी

फोटो स्रोत, KHIN MYO CHIT'S FAMILY

फोटो कॅप्शन,

म्यानमारमध्ये लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी आंदोलन सुरू आहे.

म्यानमारमध्ये 7 वर्षांच्या एका चिमुकलीचा पोलिसांच्या गोळीने मृत्यू झालाय. म्यानमारमध्ये गेल्या महिन्याच्या सुरुवातीला लष्कराने उठाव केला तेव्हापासून संपूर्ण म्यानमारमध्ये लोकशाहीच्या पुनर्स्थापनेसाठी निदर्शनं सुरू आहेत.

हे आंदोलन मोडून काढण्यासाठी लष्कराने पोलिसांच्या मदतीने निदर्शकांवर कारवाई सुरू केली आहे. या कारवाईची ही सर्वांत लहान बळी ठरली आहे.

खिन मायो चिट असं या चिमुकलीचं नाव आहे. खिन आपल्या कुटुंबासोबत मंडाले शहरात रहायची. तिच्या घरी पोलिसांनी धाड टाकली. त्यावेळी ही चिमुकली वडिलांकडे पळत गेली आणि ती पळत असतानाच पोलिसांनी तिच्यावर गोळी झाडली. त्यात तिचा मृत्यू झाला.

जनतेची निदर्शनं कमी होत नाही, हे बघितल्यावर लष्करानेही बळाचा वापर वाढवला आहे. लष्कराने केलेल्या कारवाईत आतापर्यंत 20 हून जास्त चिमुकल्यांनी प्राण गमावल्याचं 'Save the Children' या बालहक्कांसाठी लढणाऱ्या गटाचं म्हणणं आहे.

आतापर्यंत निदर्शनांमध्ये 164 जण ठार झाल्याचं लष्कराचं म्हणणं आहे. मात्र, आतापर्यंतच्या निदर्शनांमध्ये 261 जणांना ठार करण्यात आल्याचं 'Assistance Association for Political Prisoners' (AAPP) या सामाजिक कार्यकर्त्यांच्या गटाचं म्हणणं आहे.

मंगळवारी लष्कराने निदर्शकांच्या मृत्यूवर दुःख व्यक्त केलं. मात्र, आंदोलक देशात अराजकता माजवत असल्याचा आणि हिंसाचार घडवून आणत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

मात्र, सुरक्षा दलांनी निदर्शकांवर जिवंत काडतुसांच्या फैरी झाडल्या आहेत. इतकंच नाही तर लोकशाहीवादी कार्यकर्ते आणि आंदोलकांची धरपकड करण्यासाठी लष्कराकडून धाडी टाकण्यात येत आहेत आणि यावेळी अनेकांना मारहाण होत असल्याचं आणि काहीवेळा गोळीबारही करण्यात येत असल्याचं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे.

'आणि त्यांनी तिच्यावर गोळी झाडली'

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

मंगळवारी दुपारी पोलीस अधिकारी आमच्या शेजारच्या घरांमध्ये झडती घेत होते. त्यावेळी ते आमच्या घरातही आल्याचं खिन मायो चिटच्या थोरल्या बहिणीने बीबीसीला सांगितलं.

25 वर्षांच्या मे थू सुमाया म्हणाल्या, "त्यांनी लाथ मारून दार उघडलं. दार उघडल्यावर त्यांनी माझ्या वडिलांना घरात आणखी कुणी आहे का विचारलं."

त्यांनी नाही म्हणताच पोलिसांनी तुम्ही खोटं बोलत आहात असं म्हणत घरभर शोधायला सुरुवात केली.

याचवेळी 7 वर्षांची खिन मायो चिट वडिलांच्या मांडीत बसायला त्यांच्याकडे धावत गेली. मे थू सुमाया म्हणाल्या, "त्याचवेळी पोलिसांनी तिच्यावर गोळी झाडली आणि ती तिला लागली."

म्यानमार मुस्लीम मीडिया या कम्युनिटी मीडिया आउटलेला मुलाखत देताना खिनचे वडील उ माउंग को हाशीन बाई म्हणाले, "तिचे शेवटचे शब्द होते - खूप दुखतंय बाबा."

तिला कारमध्ये टाकून हॉस्पिटलला नेण्यात आलं. मात्र, अर्ध्या तासातच तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी त्यांच्या 19 वर्षांच्या मुलालाही मारहाण करत अटक केली आहे.

या मृत्यूवर लष्कराने अजून कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

मात्र, या घटनेवर 'Save The Children' या स्वयंसेवी गटाने एक पत्रक प्रसिद्ध केलं आहे. मंडालेमध्ये 14 वर्षांच्या एका मुलाला गोळी घालून ठार करण्यात आलं आणि दुसऱ्याच दिवशी या चिमुकलीचा झालेला मृत्यू 'धक्कादायक' असल्याचं या पत्रकात म्हटलं आहे.

फोटो स्रोत, AUNG KYAW OO

फोटो कॅप्शन,

शोकाकुल कुटुंबीय

या गटाचं म्हणणं आहे, "मुलं आपल्या घरात सर्वाधिक सुरक्षित असतात. मात्र, या मुलांना त्यांच्या घरातच ठार करण्यात आलं, ही चिंतेची बाब आहे. हल्ली दररोज मुलांना ठार केलं जातंय. यावरून लष्कराला मानवी जीवनाची काडीचीही किंमत नसल्याचं दिसून येतं."

दरम्यान, बुधवारी रंगून या म्यानमारमधल्या सर्वांत मोठ्या शहरात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या 600 जणांची सुटका केली. यात बहुतांश महाविद्यालयीन विद्यार्थी होते. यात थेईन झॉ या असोसिएट प्रेस या वृत्तसंस्थेचे प्रतिनिधीही होते. गेल्या महिन्यात एका निदर्शनाचं वार्तांकन करत असताना त्यांना आणि इतर काही पत्रकारांना अटक करण्यात आली होती.

आतापर्यंत किमान 2000 नागरिकांना ताब्यात घेण्यात आल्याचं AAPPचं म्हणणं आहे.

यानंतर आंदोलकांनी मूक संपाची योजना आखली आहे. यावेळी अनेक दुकानं आणि व्यवसाय बंद ठेवण्यात येतील. तसंच रंगून आणि इतर शहरात रात्री मेणबत्ती पेटवून गस्त घालण्याची योजनाही आखण्यात आली आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)