उद्धव ठाकरे: अधिकाऱ्यांना ओळखण्यात आपण कमी पडलो का? #5मोठ्याबातम्या

उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, Twitter

आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...

1. अधिकाऱ्यांना ओळखण्यात आपण कमी पडलो का? - उद्धव ठाकरे

फोन टॅप होत असतील, तर कामं कशी करायची, अधिकाऱ्यांवर विश्वास कसा ठेवायचा, अधिकाऱ्यांना ओळखण्यात आपण कमी पडलो का, असे प्रश्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहेत.

बुधवारी (24 मार्च) आयोजित मंत्रिमंडळ बैठकीत उद्धव ठाकरे बोलत होते. यामध्ये भारतीय जनता पक्षाकडून होत असलेल्या गंभीर आरोपांवर मंत्रिमंडळाने चर्चा केली.

परमबीर सिंह-अनिल देशमुख प्रकरणासह बदली घोटाळा प्रकरणावरही यावेळी चर्चा झाली.

यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना उघडं पाडलं पाहिजे. त्यासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे लढण्याच गरज आहे, असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. ही बातमी झी 24 तासने दिली.

2. 'देवेंद्र फडणवीस पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार नाहीत'

भारतीय जनता पक्षावर सातत्याने टीका करणाऱ्या स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी आता देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.

फोटो स्रोत, Twitter

मला उद्याच्या भविष्याविषयी कल्पना नाही, पण देवेंद्र फडणवीस पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत, असा अंदाज कुणाल कामरा यांनी व्यक्त करत त्यांच्यावर टीका केली आहे.

कुणालने ट्विट करत फडणवीस यांच्याबाबत हे वक्तव्य केलं. "मृत्यूनंतर आपल्यासोबत काय होतं, माहीत नाही. भविष्यात वेळ ही संकल्पना कशा पद्धतीने वापरल जाईल, याची मला खात्री नाही. उद्याचा दिवस खरंच उजाडेल किंवा नाही, याबाबतही माहिती नाही. पण देवेंद्र फडणवीस पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कधीच होणार नाहीत, याची मला खात्री वाटते," असं कामरा यांनी म्हटलंय. ही बातमी ई-सकाळने दिली आहे.

3. 'त्यांनी साडी नेसण्याऐवजी बर्मुडा घालावा'

"प्लास्टर काढलेला असतानाही त्या आता बँडेज लावलेला पाय दाखवत आहेत. त्यांनी साडी नेसली आहे. तरी एक पाय झाकलेला आहे, दुसरा नाही. अशी साडी नेसलेलं मी आजपर्यंत पाहिलं नाही. त्यांना पाय दाखवायचाच असेल तर त्यांनी बर्मुडा घालावा, त्यामुळे पाय व्यवस्थित दिसू शकेल," असं वक्तव्य पश्चिम बंगालचे भाजप प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी केलं.

दिलीप घोष यांनी वरील वक्तव्य करतानाचा एक व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे. यावेळी दिलीप घोष कोणत्याही व्यक्तीचं नाव घेताना दिसत नाहीत. पण त्यांनी ही टीका मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर केल्याचं म्हटलं जात आहे.

आता यावरून राजकीय वर्तुळात वाद निर्माण झाला आहे. भाजप आणि तृणमूल काँग्रेसचे नेते यावरून आमनेसामने आल्याचं सध्या चित्र आहे. ही बातमी लोकसत्ताने दिली.

4. 'माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम जिहादी होते'

उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमधील एका मंदिरात एका मुस्लीम तरुणाला पाणी पिण्यावरून धक्काबुक्की, मारहाण झाल्याची घटना समोर आली होती. आता त्याच मंदिरातील एका महंतांच्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला आहे.

फोटो स्रोत, Getty Images

दसना देवी मंदिरातील यती नरसिंहानंद सरस्वती असं या महंतांचं नाव आहे.

उच्च पातळीवर पोहोचलेलेला कोणताही मुस्लीम व्यक्ती देशप्रेमी असू शकत नाही. अब्दुल कलाम हेसुद्धा जिहादीच होते, असं नरसिंहानंद सरस्वती पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

यावेळी नहसिहांनंद यांनी अनेक गंभीर आरोप केलेत. कलाम DRDO प्रमुख असताना त्यांनीच अणुबॉम्बचा फॉर्म्युला पाकिस्तानला दिला होता, असा आरोपही सरस्वती यांनी केला. ही बातमी न्यूज 18 लोकमतने दिली आहे.

5. धर्मांतराचा आरोप करत दोन महिला ख्रिश्चन साध्वींना रेल्वेतून खाली उतरवलं

धर्मांतराचा आरोप करत दोन महिला ख्रिश्चन साध्वींना (नन) रेल्वेतून खाली उतरवण्याचा प्रकार झांशी येथे समोर आला आहे.

या दोन नन्सना खाली उतरवणारा व्यक्ती ABVP चा कार्यकर्ता असून त्याचं नाव अजय शंकर तिवारी असल्याची माहिती समोर येत आहे.

अजय आणि दोन्ही नन एकाच रेल्वेतून प्रवास करत होते. दरम्यान दोघी एका तरूण मुलीशी बोलत असल्याचं अजयने पाहिलं. दोघी नन त्या मुलीला धर्मांतरासाठी प्रोत्साहित करत असल्याचा संशय अजयला आला. त्यावरून त्याने आपल्या ABVP च्या सहकाऱ्यांना तसंच हिंदू जागरण मंचच्या सदस्यांना झाशी स्थानकावर बोलावलं. तिथं येताच दोन्ही नन्सना रेल्वेतून खाली उतरण्यास भाग पाडण्यात आलं. ही बातमी इंडिया टुडेने दिली आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)