अरुण नारंग: भाजप आमदार शेतकऱ्यांकडून मारहाण, कपडे फाडून तोंडाला काळंही फासलं #5मोठ्याबातम्या

आमदाराला मारहाण

फोटो स्रोत, BBC Punjabi

आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...

1. भाजप आमदाराला शेतकऱ्यांकडून मारहाण, कपडे फाडून तोंडाला काळंही फासलं

केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर गेल्या चार महिन्यांपासून आंदोलन सुरुच आहे.

तरीही सरकारने अद्याप मागण्या न केल्यानं शेतकरी संतप्त झाले आहेत. याचे पडसाद पंजाबमधील मलोट शहरात एका पत्रकार परिषदेत दिसले.

याठिकाणी शेतकऱ्यांनी भाजप आमदार अरुण नारंग यांना मारहाण करत त्यांचे कपडे फाडले. शिवाय त्यांच्या तोंडाला काळंही फासलं. अरुण नारंग हे पंजाबच्या अबोहर येथील आमदार आहेत.

फोटो स्रोत, facebook

फोटो कॅप्शन,

अरुण नारंग

मिळालेल्या माहितीनुसार, आमदार नारंग हे राज्य सरकार विरोधात पत्रकार परिषद घेण्यासाठी शनिवारी मलोट येथे आले होते. पण ते येण्याच्या आधीपासूनच शेतकरी तिथे त्यांची वाट पाहत बसले होते.

नारंग पोहोचताच शेतकऱ्यांनी त्यांच्याभोवती जमा झाले. त्यांनी नारंग यांना मारहाण करत त्यांचे कपडे फाडले. तसंच त्यांच्या तोंडाला काळं फासलं.

अखेर पोलिसांनी यामध्ये हस्तक्षेप करत आमदार नारंग यांची सुटका केली. यावेळी भाजपच्या इतर दोन नेत्यांनाही मारहाण झाली. ही बातमी ट्रिब्यून इंडियाने दिली आहे.

2. रश्मी शुक्ला यांचं फोन टॅपिंग चुकीचं होतं तर सरकार इतके दिवस गप्प का? - चंद्रकांत पाटील

IPS अधिकारी रश्मी शुक्ला या गुप्तवार्ता आयुक्त असताना त्यांनी राज्य सरकारची परवानगी घेऊनच फोन टॅपिंग केलं होतं. त्यांनी त्यावेळी केलेलं टॅपिंग चुकीचं होतं तर राज्य सरकार इतके दिवस गप्प का होतं, असा प्रश्न भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विचारला आहे.

फोटो स्रोत, Getty Images

शुक्ला यांनी बदल्यांच्या भ्रष्टाचाराचा अहवाल जून-जुलैमध्ये दिला होता. ते चुकीचं होतं तर आधीच कारवाई का करण्यात आली नाही. त्यावेळी कारवाईची शिफारस न करणारे अतिरिक्त मुख्य सचिव फोन मुख्य सचिव बनले. तेच आता ही फोन टॅपिंग चुकीची असल्याचं सांगत आहेत, अशी टीका पाटील यांनी केली. ही बातमी टीव्ही 9 मराठीने दिली आहे.

3. महावितरणच्या कर्मचाऱ्यांवर भाजपकडून हल्ले - उर्जामंत्री नितीन राऊत

महावितरण कंपनी थकबाकीमुळे सध्या प्रचंड संकटा सापडली आहे. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी कायदा हातात घेऊन महावितरणचे कर्मचारी, अधिकारी यांच्यावर हल्ले करण्यात येत आहेत.

महावितरण वीजबिल वसुलीच्या कामात भाजपकडून अडथळे निर्माण केले जात आहे. पण सर्वसामान्य ग्राहकांनी त्यांच्या बोलण्यात न येता वीज बिल भरून महावितरण कंपनीला संकटातून बाहेर काढावं, असं आवाहन उर्जामंत्री नितीन राऊत यांनी केलं आहे.

भाजपची सत्ता असताना त्यांनी हेतूपुरस्सरपणे केलेल्या गैरव्यवस्थापनामुळे आज महावितरणवर थकबाकीचा डोंगर उभा राहिला. महावितरणचं खासगीकरण करण्याचा डाव भाजपने आखला होता. पण आम्ही ते टाळण्याचा प्रयत्न करत आहोत, अशी टीका राऊत यांनी यावेळी केली. ही बातमी महाराष्ट्र टाईम्सने दिली आहे.

4. काँग्रेसच्या आगामी सर्व निवडणुका स्वबळावर - नाना पटोले

राज्यात काँग्रेस पक्ष महाविकास आघाडी सरकारमध्ये असला तरी स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभेसह आगामी सर्व निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार आहे, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.

फोटो स्रोत, facebook

नागपूरमध्ये आयोजित एका पत्रकार परिषदेत नाना पटोले बोलत होते. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या खोट्या आरोपांमुळे सरकार पडणार नाही, असा विश्वास पटोले यांनी यावेळी व्यक्त केला.

तसंच अधिकाऱ्यांनी कोणत्याही पक्षाला समर्पित होऊन काम करू नये. लोकशाहीसाठी ते घातक ठरू शकतं, असी टीकाही पटोले यांनी केली. ही बातमी ई-सकाळने दिली आहे.

5. महाराष्ट्रात सलग तिसऱ्या दिवशी 35 हजारांपेक्षा जास्त कोरोनाबाधित

महाराष्ट्रात शनिवारी राज्यात तब्बल 35 हजार 726 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. त्यामुळे सलग तिसऱ्या दिवशी 35 हजारांपेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली.

शनिवारी, राज्यात 14 हजार 523 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आजपर्यंत एकूण 2314579 रुग्ण बरे होऊन रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले आहेत.

सध्याच्या स्थितीत राज्यात एकूण 3,03475 सक्रीय रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 86.58% झाले आहे.

दरम्यान, शनिवारी राज्यात कोरोना संदर्भात नवीन नियमावली लागू झाली. यानुसार रात्री 8 ते सकाळी 7 पर्यंत जमावबंदी कायम असेल. तसंच मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग या नियमांचं पालन अनिवार्य असेल.

शिवाय मद्य, पान, गुटखा, तंबाखू या पदार्थांचं सार्वजनिक ठिकाणी सेवन करण्यासही बंदी असेल. ही बातमी एबीपी माझाने दिली.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)