अरुण नारंग हल्ला प्रकरण : भाजप नेत्यांचा अमरिंदर सिंग यांच्या घरासमोर ठिय्या

आंदोलन

फोटो स्रोत, facebook

भारतीय जनता पक्षाचे पंजाबमधील आमदार अरुण नारंग यांच्यावर शनिवारी हल्ला करण्यात आला होता.

नारंग यांना मारहाण करत त्यांचे कपडे काढून त्यांच्या तोंडावर काळं फासण्यात आलं होतं. या प्रकरणानंतर पंजाबमधील राजकीय वातावरण भलतंच तापलं आहे.

भाजप नेत्यांनी या घटनेचा निषेध नोंदवत मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या सरकारी निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे.

पंजाबचे भाजप प्रदेशाध्यक्ष अश्विनी शर्मा यांच्यासह इतर नेत्यांच्या आंदोलनकर्त्यांमध्ये समावेश आहे.

अरुण नारंग हे पंजाबमधील अबोहरचे भाजप आमदार आहेत. ते शनिवारी मलौट येथे एक पत्रकार परिषद घेण्यासाठी जात होते. पण नारंग त्याठिकाणी दाखल होण्यापूर्वीच तिथं काही शेतकरी आंदोलकांनी प्रवेश केला. नारंग येताच त्यांनी त्यांच्याभोवती गराडा घातला.

यावेळी शेतकरी आंदोलकांकडून नारंग यांना मारहाण करण्यात आली. त्यांचे कपडेही फाडले तसंच त्यांच्या तोंडाला काळं फासलं.

त्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत गर्दीवर नियंत्रण मिळवलं. अरूण नारंग यांनी याप्रकरणी काँग्रेस सरकारवर आरोप केले आहेत.

दरम्यान, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. हा हल्ला निंदनीय असून यामुळे राज्याची शांतता भंग पावल्याचं त्यांनी म्हटलं आहे. अमरिंदर सिंग यांचे माध्यम सल्लागार रवीन ठकराल यांनी ट्वीट करून सांगितले आहे की "मुख्यमंत्र्यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. कोणत्याही परिस्थितीत कायदा हातात घेणे अयोग्य आहे. राज्याची शांतता भंग पावेल असं वर्तन खपवून घेतले जाणार नाही असे देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे."

भाजपचं नग्न आंदोलन

या प्रकारानंतर भाजपने मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. नारंग यांच्यावर झालेला हल्ला सत्ताधारी काँग्रेस पक्षाकडून पुरस्कृत असल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला आहे.

फोटो स्रोत, Twitter

भाजप नेत्यांच्या आंदोलनस्थळी अश्विनी शर्मा, मदन मोहन मित्तल, श्वेता मलिक दिनेश बब्बू आदी नेते उपस्थित होते.

कॅप्टन अमरिंदर सिंग विरोधी आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत, असाही आरोप भाजप नेत्यांनी केला आहे. नारंग यांच्यावरील हल्ल्याचा निषेध म्हणून नेत्यांनी नग्न आंदोलन केलं.

नारंग यांच्यासोबत काय घडलं?

अबोहरचे आमदार अरुण नारंग यांना मलौट याठिकाणी मारहाण करण्यात आली. ते त्यावेळी पत्रकार परिषद घेत होते. पण त्याचवेळी अचानक काही जण त्याठिकाणी आले.

त्यांनी नारंग यांना धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी त्यांना बाजूला नेण्याचा प्रयत्न केला. पण हल्लेखोरांनी त्यांना जुमानलं नाही.

पोलिसांनी नारंग यांना कार्यालयात घेऊन गेलं तरी जमावाने त्यांच्यावर हल्ला चढवला. दरम्यान, नारंग यांचे कपडे फाडून त्यांना नग्न केलं. तिथं त्यांच्या अंगावर शाई फेकून त्यांच्या तोंडावर काळं फासण्यात आलं.

या प्रकारानंतर एका शेतकऱ्याने म्हटलं, "दुपारी साडेबारा वाजता भाजप आमदार आणि मुक्तसार जिल्ह्याचे भाजप अध्यक्ष यांची पत्रकार होणार असल्याची माहिती आम्हाला मिळाली. या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊ नये, असा इशारा आम्ही दिला होता. पण तरीसुद्धा भाजप नेते आले. तीन शेतकरी कायदे मागे घेण्यात येत नाहीत, तोपर्यंत आम्ही भाजपचा विरोध करत राहू."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)