सचिन वाझे: नदीपात्रात कॉम्प्युटर, सीपीयू आणि गाड्यांच्या नंबर प्लेट्स

सचिन वाझे, एनआयए,

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन,

मिठी नदीपात्रात एनआयएने केलेल्या शोधमोहिमेत कॉम्प्युटर सापडला.

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी तपास करत असलेल्या एनआयएने रविवारी बीकेसी परिसरात मिठी नदीपात्रात शोध मोहीम राबवली.

यावेळी नदी पात्रातून एक कॉम्प्यूटर, सीपीयू, दोन नंबर प्लेट्स आणि आणि अन्य साहित्य मिळालं. यामुळे एनआयएच्या हाती आता या प्रकरणाशी निगडीत मोठे धागेदोरे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, एनआयएने या प्रकरणी सचिन वाझेंना अटक केली असून, दुसऱ्यांदा न्यायालयाने एनआयएकडे ताबा दिलेला आहे.

एनआयएची टीम सचिन वाझेंना घेऊन मिठी नदीपात्रात शोध मोहिमेसाठी पोहचली होती. यानंतर काही जण नदी पात्रात उतरले व मेटल डिटेक्टरच्या सहाय्याने लॅपटॉप, सीपीयू, डीव्हीआर मशीन, प्रिंटर आणि दोन नंबर प्लेट्स शोधून काढल्या.

त्याआधी एनआयएचं पथक वाझेंना घेऊन वांद्रे खाडीजवळ गेलं होतं. दरम्यान दरम्यान अटकेत असणारे निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी एनआयला मनसुख हिरेन यांचा मृतेदह सापडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी (६ मार्च) आपल्याकडील पाच मोबाइल नष्ट केल्याची माहिती दिली आहे.

मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली गाडी आढळली होती. त्याप्रकरणी API सचिन वाझेंना अटक केली होती.

जिलेटीन च्या कांड्या असलेली स्कॉर्पिओ गाडी 25 फेब्रुवारी रोजी पोलिसांना आढळली होती. ही स्कॉर्पिओ गाडी ज्यांच्या ताब्यात होती ते मनसुख हिरेन यांचा मृतदेह ठाण्यातील रेती बंदर इथे आढळला होता.

त्यानंतर हिरेन यांच्या पत्नी विमला हिरेन यांनी NIA ला दिलेल्या जबाबात सचिन वाझे यांच्यावर हत्येचा आरोप केला होता. त्यानंतर सचिन वाझे यांच्या भोवतीचे संशयाचे वर्तुळ आणखी गडद झाले होते. आता त्यांना अटक झाल्याने या प्रकरणाला आणखी गंभीर वळण लागले आहे.

कोण आहेत सचिन वाझे?

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

महाराष्ट्र पोलीस दलात सचिन वाझे सहाय्यक पोलीस निरीक्षक, म्हणजेच असिस्टंट पोलीस इंनस्पेक्टर (API) पदावर कार्यरत होते.

मुंबई क्राइम ब्रांचच्या 'क्राइम इंटेलिजन्स युनिट' चे प्रमुख म्हणून सेवा बजावत आहेत. मुंबईत घडणाऱ्या गुन्हेगारी कारवायांची गोपनीय माहिती मिळवून, त्या रोखण्याचं काम क्राइम ब्रांचच्या या युनिटकडे आहे.

जून 2020 मध्ये मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अध्यक्षतेखालील समितीने सचिन वाझेंच निलंबन मागे घेण्याचा निर्णय घेतला. निलंबन मागे घेतल्याने तब्बल 16 वर्षांनी वाझे यांचा पुन्हा महाराष्ट्र पोलिसांच्या सेवेत येण्याचा मार्ग खुला झाला.

पोलीस दलात परतल्यानंतर वाझे यांची आयुक्तांनी प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या मुंबई क्राइम ब्रांचमध्ये नियुक्ती केली.

सचिन वाझे यांचं पूर्ण नाव, सचिन हिंदूराव वाझे. सचिन वाझे मुळचे कोल्हापूरचे. सचिन वाझे यांची 1990 मध्ये महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदावर निवड झाली. तेव्हापासून वाझे यांचा पोलीस दलातील प्रवास सुरू झाला.

मुंबईत अंडरवर्ल्डने 1990 च्या दशकात डोकं वर काढण्यास सुरूवात केली. दाऊद, छोटा राजन आणि अरूण गवळी सारखे डॉन मुंबईच्या रस्त्यांवर रक्तपात करत होते. मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड विरोधात मोहीम उघडली.

मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्डच्या शार्प शूटर्सचं एक-एक करून एन्काउंटर करण्यास सुरूवात केली होती. सचिन वाझे त्याचसुमारास मुंबईत बदलीवर रुजू झाले होते.

ख्वाजा युनिसप्रकरणी निलंबन

मुंबई अंडरवर्ल्डचा कणा मोडण्यासाठी पोलिसांनी एन्काउंटरचं हत्यात उगारलं होतं. एकीकडे मुंबई पोलीस एन्काउंटरमध्ये अंडरवर्ल्डचा खात्मा करत होते. तर, 2000 च्या सुरूवातीला मुंबईवर दहशतवादाचं सावटं दिसू लागलं.

सचिव वाझे क्राइम ब्रांचमध्ये असताना, डिसेंबर 2002 मध्ये मुंबई पोलीस घाटकोपर स्फोटाची चौकशी करत होते. पोलिसांनी चौकशीसाठी ख्वाजा यूनूसला ताब्यात घेतलं होतं. पण, 2003 मध्ये ख्वाजा पोलीस कोठडीतून फरार झाल्याचा दावा पोलिसांनी केला.

पोलीस कोठडीत चौकशी दरम्यान ख्वाजा यूनूसचा मृत्यू झाल्याचा आरोप मुंबई क्राइम ब्रांचच्या अधिकाऱ्यांवर झाला. काही अधिकाऱ्यांवर ख्वाजा मृत्यूप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला. सचिन वाझे या अधिकाऱ्यांपैकीच एक होते.

ख्वाजा मृत्यू प्रकरणी मे 2004 मध्ये राज्य सरकारने सचिन वाझेंना पोलीस दलातून निलंबित केलं.

साल 2008 मध्ये सचिन वाझे आणि इतरांवर ख्वाजा मृत्यूप्रकरणी 1000 पानांचं आरोपपत्र दाखल करण्यात आलं.

पोलीस दलाचा राजीनामा आणि शिवसेना प्रवेश

सचिन वाझे यांनी पोलिस दलातून निलंबित झाल्यानंतर तीन वर्षांनी 2007 मध्ये महाराष्ट्र पोलीस दलाचा राजीनामा दिला. पण, सरकारने त्यांचा राजीनामा मंजूर केला नाही.

राजीनामा दिल्यानंतर एका वर्षात सचिन वाझे यांनी 2008 मध्ये दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत दसरा मेळाव्यात शिवसेनेत प्रवेश केला.

शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर सचिन वाझे राजकारणात फारसे सक्रिय नव्हते, असं शिवसेना नेते सांगतात.

पण, काही वृत्तवाहिन्यांच्या कार्यक्रमाला सचिन वाझे यांनी शिवसेना प्रवक्ते म्हणून हजेरी लावली असल्याची चर्चा आहे.

मुंबई पोलिसांचा टेक्नोसॅव्ही अधिकारी

सचिन वाझे पोलीस दलात असताना क्राइम रिपोर्टिंग करणारे पत्रकार सांगतात, "सचिन वाझेंची मुंबई पोलीस दलात 'टेक्नो-सॅव्ही' अधिकारी म्हणून ओळख होती. मुंबईत सायबरक्राइम करणाऱ्यांवर कारवाई पहिल्यांदा सचिन वाझे यांनीच केली होती."

वाझे यांनी 1997 मध्ये एक आंतरराष्ट्रीय क्रेडीटकार्ड रॅकेट उघडकीस आणलं होतं. त्यानंतर त्यांना त्यांचे सहकारी 'टेक्नो-सॅव्ही' अधिकारी म्हणून ओखळू लागले.

अर्णब गोस्वामींना अटक

शिवसेनेत असल्याकारणाने सचिन वाझे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत निकटवर्तीय आणि जवळचे मानले जातात.

अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणी रिपब्लिक चॅनलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना काही महिन्यांपूर्वी रायगड पोलिसांनी अटक केली होती. त्यावेळी मुंबई पोलिसांकडून सचिन वाझे त्या टीमचं नेतृत्व करत होते.

अर्णब गोस्वामी यांच्या कतिथ TRP घोटाळ्याची चौकशी देखील सचिन वाझे यांच्याकडेच आहे.

पुस्तकाचं लेखन

सचिन वाझे यांनी मुंबईत 26/11 ला करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यावर 'जिंकून हरलेली लढाई' नावाचं एक पुस्तक लिहिलं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)