IndvsEng: सॅम करनची खेळी व्यर्थ; टीम इंडियाने तिसऱ्या वनडेसह मालिका जिंकली

भारत, इंग्लंड

फोटो स्रोत, Mark Kolbe

फोटो कॅप्शन,

टीम इंडियाने इंग्लंडविरुद्धची वनडे सीरिज 2-1 अशी जिंकली

पुण्यात गहुंजे इथे सुरू असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडेत भारतीय संघाने सात रन्सने निसटता विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघाने तीन सामन्यांची मालिका 2-1 अशी जिंकली.

इंग्लंडच्या सॅम करनने नाबाद 95 रन्सची शानदार खेळी केली. मात्र हार्दिक पंड्या आणि नटराजनने शेवटच्या ओव्हर्समध्ये टिच्चून मारा करत भारतीय संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

330 रन्सच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडची अवस्था 257/8 अशी होती. मात्र सॅम करन आणि आदिल रशीद यांनी संयमी भागीदारी करत विजयाच्या आशा जागवल्या होत्या. करनने नऊ चौकार आणि तीन षटकारांसह नाबाद 95 रन्सची खेळी केली. इंग्लंडने 322 रन्स केल्या. भारतातर्फे शार्दूल ठाकूरने 4 तर भुवनेश्वर कुमारने 3 विकेट्स मिळवल्या.

भारतीय संघाने पहिल्यांदा बॅटिंग करताना 329 रन्सचा डोंगर उभारला. भारतीय संघाने कुलदीप यादवऐवजी टी.नटराजनला संधी दिली तर इंग्लंडने टॉम करनऐवजी मार्क वूडला खेळवण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडने टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतला.

रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी शतकी सलामी दिली. आदिल रशीदने ही जोडी फोडली. रोहितने 37रन्स केल्या. विराट कोहलीला मोईन अलीने झटपट तंबूत परतावलं. त्याला फक्त 7 रन्स करता आल्या. शिखर धवनने दहा चौकारांसह 67 रन्सची खेळी केली.

लोकेश राहुल लायम लिव्हिंगस्टोनच्या फुलटॉसवर फसला आणि बाद झाला. ऋषभ पंतने दुसऱ्या बाजूने पडणाऱ्या विकेट्सचं दडपण न घेता मनमुराद फटकेबाजी केली. पाच चौकार आणि चार षटकारांसह 62 बॉलमध्ये 78 रन्सची आक्रमक खेळी केली.

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन,

ऋषभ पंत

शतकाकडे आगेकूच करणाऱ्या ऋषभला सॅम करनने बाद केलं.

हार्दिक पंड्याने पाच चौकार आणि चार षटकारांसह 44 बॉलमध्ये 64 रन्सची वेगवान खेळी केली. कृणाल पंड्याने 25 तर शार्दूल ठाकूरने 30 रन्स केल्याने भारताने तीनशेचा टप्पा ओलांडला.

इंग्लंडच्या बॉलर्सनी शिस्तबद्ध मारा करत भारताला साडेतीनशेच्या आत रोखलं. मार्क वूडने तीन तर आदिल रशीदने दोन विकेट्स घेतल्या.

330या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडने जेसन रॉय आणि जॉनी बेअरस्टो या सलामीवीरांना झटपट गमावलं. डेव्हिड मलानने अर्धशतकी खेळी केली. दुसऱ्या वनडेत 99 रन्सची खेळी करणारा बेन स्टोक्स या मॅचमध्ये 35रन्स करून तंबूत परतला. नियमित कर्णधार आयोन मॉर्गनच्या अनुपस्थितीत कर्णधारपदाची धुरा सांभाळणारा जोस बटलर बाद होताच इंग्लंडच्या विजयाच्या आशा मावळल्या.

भारतीय संघाने चार सामन्यांची टेस्ट सीरिज 3-1 अशी जिंकली. त्यानंतरची ट्वेन्टी-20 मालिका भारतीय संघाने 3-2अशी जिंकली होती.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)