शुभेंदू अधिकारीः ममता 'दीदीं'ना टक्कर देणारे नंदिग्रामचे 'दादा' कोण आहेत?

  • प्रभाकर मणी तिवारी
  • बीबीसी हिंदीसाठी, कोलकातामधून
शुभेंदू अधिकारीः ममता दीदींना आव्हान देणारे नंदिग्रामचे 'दादा' कोण आहेत?

फोटो स्रोत, SANJAY DAS

"ममता बॅनर्जींनी जंगलमहल भागात क्रांती आणली आहे. दिल्लीतून इथं येणारे लोक बाहेरचे आहेत. बंगालमध्ये पुढची पन्नास वर्षं तरी तृणमूल काँग्रेसला कोणीच हरवू शकत नाही. आता पुन्हा एकदा केंद्रात बिगर भाजप सरकारचं नेतृत्व करण्याची संधी एका बंगाली महिलेसमोर (ममता बॅनर्जी) आहे."

"ममता बॅनर्जी यांनी नंदीग्राम आणि जंगलमहल भागात विकासासाठी काहीच केलं नाही. नंदीग्राममधून जर मी त्यांना किमान 50 हजार मतांनी हरवलं नाही, तर राजकारणातून संन्यास घेईन."

ही दोन्ही परस्परविरोधी वक्तव्यं एकाच व्यक्तीची आहेत, असं जर सांगितलं तर तुम्हालाही आश्चर्य वाटेल. पण हेच पश्चिम बंगालच्या राजकारणाचं सध्याचं वास्तव आहे.

या दोन्ही विधानांमध्ये केवळ काही महिन्यांचं अंतर आहे.

पहिलं विधान टीएमसी सरकारमधील तत्कालिन मंत्री आणि ममता बॅनर्जी यांचे निकटवर्तीय शुभेंदु अधिकारी यांनी जंगलमहल भागात एका क्रीडा स्पर्धेच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात केलं होतं.

नंतर मात्र परिस्थिती वेगाने बदलत गेली आणि गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर याचवर्षी जानेवारी महिन्यात त्यांनी दुसरं विधान केलं.

कधीकाळी टीएमसी प्रमुख ममता बॅनर्जी यांच्या अतिशय जवळचे मानले जाणारे शुभेंदू अधिकारी आता त्यांचे सर्वांत कट्टर विरोधक बनले आहेत. अगदी विरुद्ध टोकाचा हा प्रवास राजकारणात बऱ्याचदा पहायला मिळतो.

राजकारणात कोणी कोणाचा कायमचा मित्रही नसतो आणि कोणाचा शत्रूही नसतो. शुभेंदू यांची दोन्ही विधानं या म्हणीचं प्रत्यक्ष दर्शन घडवतात.

पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील नंदीग्राम मतदारसंघातून ते ममतांविरोधात निवडणूक लढवत आहेत.

ममता यांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात आव्हान?

पहिल्यांदा आमदार, नंतर दोन वेळा खासदार आणि गेल्यावेळी नंदीग्राम मतदारसंघातून विधानसभा निवडणूक जिंकून ममता बॅनर्जी सरकारमध्ये परिवहन मंत्री बनलेल्या शुभेंदू अधिकारी यांचं नाव काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगालच्या बाहेर फार जणांना माहीत नव्हतं.

फोटो स्रोत, SANJAY DAS

मात्र घटना वेगानं घडल्या आणि शुभेंदू अधिकारी गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात भाजपमध्ये गेले. त्यानंतर यंदाच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी मुख्यमंत्री आणि टीएमसी प्रमुख ममता बॅनर्जींनाच नंदीग्राममधून आव्हान दिलं. त्यानंतर शुभेंदू यांचं नाव देशातच नाही परदेशी माध्यमांमध्येही प्रसिद्ध झालं.

राजकीय विश्लेषक आणि सामान्य जनतेच्या दृष्टीनं सध्या तरी शुभेंदू पश्चिम बंगालमध्ये भाजपचा प्रमुख चेहरा म्हणून समोर येत आहेत.

पण त्यांना एवढी प्रसिद्धी का मिळत आहे?

पश्चिम बंगालच्या राजकारणातला शुभेंदू यांचा उदय आणि सध्याच्या निवडणुकीत त्यांना मिळत असलेलं महत्त्व समजून घेण्यासाठी आपल्याला 15 वर्षं मागे जावं लागेल. शुभेंदू यांनी 2006 या वर्षी पहिल्यांदा कांथी दक्षिण मतदारसंघातून तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर विधानसभेची निवडणूक लढवली होती.

त्यानंतर त्यांनी 2009 साली तमलुक मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली आणि जिंकलेही. 2014 सालीही त्यांनी आपला मतदारसंघ राखण्यात यश मिळवलं.

फोटो स्रोत, SANJAY DAS

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

2016 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी नंदीग्राममधून निवडणूक लढवली आणि जिंकूनही आले. ममता बॅनर्जींच्या मंत्रिमंडळात ते परिवहन मंत्री बनले. हळूहळू मंत्रिमंडळात त्यांचं स्थान क्रमांक दोनचं बनलं.

त्यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरूवात ही विद्यार्थी दशेपासून झाली. तेव्हा ते कांथीमधील पीके कॉलेजमधून पदवीचं शिक्षण घेत होते. 1989 साली ते काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेच्या विद्यार्थी परिषदेचे प्रतिनिधी म्हणून निवडले गेले होते.

वयाच्या 36 व्या वर्षी शुभेंदू कांथी दक्षिण मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक जिंकून आमदार बनले. त्याचवर्षी त्यांना कांथी नगरपालिकेचे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आलं. तमलुक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकल्यानंतर 2016 साली ममता बॅनर्जींना नंदीग्राम मतदारसंघातून मैदानात उतरवलं. तिथून ते सहजपणे निवडून आले.

शुभेंदू यांची राजकीय कारकीर्द भलेही 1990 च्या दशकात सुरू झाली असली तरी एक पक्षातील महत्त्वाचे नेते म्हणून त्यांचा उदय 2007 साली नंदीग्राममध्ये जमीन अधिग्रहणाविरोधात झालेल्या आंदोलनातून झाला. खासदार म्हणून अतिशय लो प्रोफाइल राहिलेल्या शुभेंदू अधिकारी त्यांच्या संघटनात्मक कौशल्यामुळे हळूहळू पक्षातले पर्यायी सत्ताकेंद्र बनले.

'पक्षात योग्य तो सन्मान मिळाला नाही'

पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यात कोलाघाटमध्ये रुपनारायण नदी ओलांडल्यावरच लक्षात येतं की, इथे अधिकारी कुटुंबाचं वर्चस्व आहे.

सगळीकडे शुभेंदू यांचे पोस्टर्स दिसतात. गल्लीबोळात, चौकांमध्ये, चहाच्या टपऱ्यांवर याच कुटुंबाबद्दल बोललं जातं.

फोटो स्रोत, Getty Images

गेल्या दोन दशकांपासून अधिकारी कुटुंबानं या भागात जशी पकड निर्माण केली आहे, तसं दुसरं उदाहरण राज्यामध्ये मिळणार नाही.

पूर्व मेदिनीपूर भागात अधिकारी कुटुंबीयांसोबत जवळचे संबंध असलेल्या टीएमसीच्या एका नेत्यानं नाव न छापण्याच्या अटीवर सांगितलं, "शुभेंदू यांनी या भागात पक्ष अधिक मजबूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. मात्र पक्षात त्यांना तो सन्मान नाही मिळाला, जो मिळायला हवा होता."

गेल्या काही दिवसांमध्ये ममता बॅनर्जी शुभेंदू यांना नाव न घेता गद्दार आणि मीर जाफरसारख्या विशेषणांनी संबोधत होत्या. याच गोष्टीमुळे या कुटुंबातील प्रमुख असलेले शिशिर अधिकारी खूप दुखावले आहेत. या भागात पक्ष वाढविण्यासाठी अधिकारी यांनी बरीच मेहनत घेतली होती.

ते म्हणतात, "आम्ही पक्षासाठी काय केलं नाही? पण त्याबदल्यात आम्हाला आता अगदी शेलकी विशेषणं ऐकायला मिळत आहेत. गद्दार आणि मीर जाफर कोण आहे, हे आता येणारा काळच सांगेल."

शुभेंदु यांचे वडील आणि अधिकारी कुटुंबातील प्रमुख शिशिर अधिकारी 1982 साली कांथी दक्षिण विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार म्हणून निवडून आले होते.

नंतर ते तृणमूल काँग्रेसमध्ये सहभागी झाले. सध्या तिसऱ्यांदा टीएमसीच्या तिकिटावर कांथी लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले आहेत. याआधी ते तीनवेळा विधानसभेची निवडणूकही जिंकले आहेत. मनमोहन सिंह सरकारमध्ये शिशिर मंत्रीही होते.

शुभेंदू यांचे छोटे भाऊ दिब्येंदू अधिकारी यांनी 2009, 2011 आणि 2016 साली विधानसभेची निवडणूक जिंकली होती. 2016मध्ये शुभेंदू विधानसभेवर गेले. त्याचवेळी त्यांनी तमलुकच्या खासदारकीचा राजीनामा दिला. तिथे पोटनिवडणूक झाली होती. आपला मतदारसंघ त्यांनी भावाला दिला. त्या निवडणुकीत दिब्येंदू विजयी होऊन संसदेमध्ये पोहोचले.

'पक्ष मजबूत करण्यात महत्त्वाचं योगदान'

राजकीय विश्लेषक प्राध्यापक समीरन पाल सांगतात, "तृणमूल काँग्रेसला सत्तेपर्यंत पोहोचविण्यात ज्या नंदीग्राम आंदोलनानं महत्त्वाची भूमिका बजावली होती, त्याचं नियोजन शुभेंदू अधिकारी यांनीच केलं होतं. 2007 साली कांथी दक्षिण मतदारसंघाचे ते आमदार होते. या नात्यानं तत्कालीन डाव्या सरकारच्या विरोधात भूमी अधिग्रहण विरोध समितीच्या बॅनरखाली स्थानिक लोकांना एकत्र करण्यात त्यांचा मोठा सहभाग होता."

फोटो स्रोत, Getty Images

"तेव्हा नंदीग्राममध्ये प्रस्तावित केमिकल हबसाठी जमीन अधिग्रहणाविरोधात आंदोलनाला सुरुवात होईल, अशी चिन्हं दिसत होती. तेव्हा या भागात हल्दियामधील सीपीएम नेते लक्ष्मण सेठ यांचा दबदबा होता. मात्र शुभेंदू यांच्यामुळेच या भागातील सर्वांत शक्तिशाली नेते असलेल्या लक्ष्मण सेठ यांना पराभव स्वीकारावा लागला होता," पाल सांगतात.

पाल सांगतात की, जंगलमहल नावानं ओळखलं जाणाऱ्या पश्चिम मेदिनीपूर, पुरुलिया आणि बांकुडा जिल्ह्यात तृणमूल काँग्रेसला मजबूत जनाधार मिळवून देण्यात शुभेंदू यांचा मोठा वाटा होता.

टीएमसीच्या एका ज्येष्ठ नेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितलं, "2011 मध्ये विधानसभा निवडणुकीत डाव्यांची 34 वर्षांची सत्ता उलथवून लावत सत्ता हस्तगत करणाऱ्या ममता बॅनर्जींनी पक्षाप्रति असलेल्या निष्ठेचा विचार करत अधिकारी कुटुंबाला महत्त्वाची भूमिका दिली. जंगलमहलसोबतच त्यांच्यावर मालदा आणि मुर्शिदाबादची जबाबदारी सोपविण्यात आली.

"त्यानंतर शुभेंदु यांनी हल्दिया बंदराच्या भागात विशेषतः तिथल्या कामगार संघटनांवर मजबूत पकड मिळवली. त्यामुळे राज्याचं राजकारण आणि टीएमसीमध्ये शुभेंदू यांचं नेतृत्व प्रस्थापित झालं.

नुकतेच टीएमसीमधून भाजपमध्ये गेलेल्या एका माजी मंत्र्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सगळा घटनाक्रम सांगितला.

महत्त्वाकांक्षेची लढाई?

टीएमसीमध्ये दुसऱ्या स्थानावर असताना मुकुल राय यांनी पूर्व आणि पश्चिम मेदिनीपूर जिल्ह्यातील पक्ष संघटनेमध्ये आपल्या समर्थकांचा समावेश करत शुभेंदू यांना शह देण्याचा प्रयत्न केला.

मात्र 2017 मध्ये मुकुल राय भाजपमध्ये सहभागी झाले. त्यानंतर पक्षात दुसऱ्या क्रमांकाचं स्थान अभिषेक बॅनर्जी यांना मिळालं. अभिषेक आणि शुभेंदू यांच्यात संघर्ष सुरू झाला. पक्षाच्या जडणघडणीत महत्त्वाचा वाटा उचलणाऱ्या शुभेंदू यांना वाटत होतं की, ममता बॅनर्जींनंतर पक्षातलं दुसऱ्या क्रमांकाचं स्थानं त्यांनाच मिळावं.

मात्र गेल्या लोकसभा निवडणुकीनंतर अभिषेक बॅनर्जी प्रशांत किशोर यांच्या मदतीनं पक्ष चालवायला लागले, तेव्हा शुभेंदू यांना जाणवायला लागलं की, इथे राहून आपल्या राजकीय महत्त्वाकांक्षा पूर्ण होणार नाहीत.

शुभेंदु यांनी मंत्रिमंडळ आणि पक्षातून राजीनामा देऊन चार महिन्यांपूर्वीच स्वतःला पक्षापासून दूर केलं. ते पक्षाच्या आणि सरकारच्या बैठकांनाही उपस्थित राहत नव्हते.

दुसरीकडे, त्यांनी मोठ्या प्रमाणावर जनसंपर्क अभियानाला सुरूवात केली होती. शुभेंदु आणि अधिकारी परिवाराचं महत्त्व लक्षात घेऊन स्वतः ममता बॅनर्जी, त्यांचे मंत्री आणि प्रशांत किशोर यांनीही त्यांच्या मनधरणीचे सर्वतोपरी प्रयत्न केले होते. मात्र शुभेंदु यांनी टीएमसीपासून दूर जाण्यासाठी मनाची तयारी केली होती. त्यामुळेच जेव्हा नोव्हेंबर महिन्यात त्यांनी आपला राजीनामा दिला, तेव्हा त्यांचं राजकारण जवळून अनुभवणाऱ्या अनेकांना फारसं आश्चर्य वाटलं नाही.

टीएमसीचे प्रवक्ते सौगत राय सांगतात, "शुभेंदु यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा खूप वाढल्या होत्या. त्यामुळेच त्यांनी दीदींच्या समजावण्याकडे लक्ष नाही दिलंं. पक्ष त्यांची तक्रार ऐकून ती सोडविण्यासाठी प्रयत्न करायला तयार होता. पण त्यांनी आपला अट्टाहास सोडला नाही."

टीएमसीच्या आणखी एका वरिष्ठ नेत्याने आरोप केला की, "शुभेंदू विधानसभा निवडणुकीत आपल्या 50 हून अधिक उमेदवारांना तिकिट देण्यासाठी दबाव टाकत होते. हे काही शक्य नव्हतं."

शुभेंदु यांचे पिता शिशिर अधिकारी यांनी हा आरोप फेटाळून लावला. ते म्हणतात, "जिथे तुमचा सन्मान नाही, तिथे थांबणं योग्य नाही. पक्ष आणि सरकारमध्ये शुभेंदू यांची उपेक्षा होत होती. त्यांच्या मंत्रालयाचे निर्णयही दुसरे लोक घेत होते. आता टीएमसीचे नेते आपली चूक लपवण्यासाठी ब्लॅकमेलसारखे बिनबुडाचे आरोप करत आहेत."

प्रोफेसल पाल सांगतात की, अधिकारी कुटुंबाचं प्राबल्य असलेल्या काही जिल्ह्यांमध्ये मतदारांच्या एका गटाचं समर्थन 'दीदीं'ऐवजी 'दादां'ना मिळू शकतं.

ते पुढे म्हणतात, "निवडणुकीचा निकाल काहीही लागला तरी शुभेंदू यांनी नंदीग्रामला 14 वर्षांनंतर पुन्हा एकदा चर्चेत आणलं आहे. हा राज्यातला सर्वांत हाय प्रोफाइल मतदारसंघ बनला आहे. त्याचे परिणाम बंगालच्या भविष्यातील राजकारणावर नक्कीच होऊ शकतात."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री आठ वाजता बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर कोरोना पॉडकास्ट पाहायला विसरू नका.)