कोरोनामुळे परवानगी नसतानाही बगाड यात्रेत हजारो लोकांची गर्दी कशी काय झाली?

  • स्वाती पाटील
  • बीबीसी मराठी
बगाड यात्रा

सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील बावधन इथं बगाड यात्रा आज पार पडली. या यात्रेसाठी हजारो जण एकत्र आले.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही धार्मिक उत्सवांना प्रशासनाने परवानगी नाकारली असतानाही तरीही एवढी गर्दी जमली.

सातारा जिल्ह्यात कलम 144 लागू करण्यात आले आहे. असं असतानाही या बगाड यात्रेसाठी हजारो लोक एकत्र जमले.

बगाड यात्रेला 350 वर्षांची परंपरा आहे. महिन्याभरापासून बावधन ग्रामस्थ, ग्रामपंचायत आणि जिल्हा प्रशासन यांच्यात बैठका सुरू होत्या.

परवानगी नाकारलेली असताना ही यात्रा झाल्याने आता पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. पोलिसांनी शेकडो लोकांवर गुन्हे दाखल करत कारवाईचा बडगा उगारला आहे.

"बगाड यात्रा काढू नये यासाठी प्रशासनानं निर्देश दिले होते. पण तरीही ही यात्रा काढण्यात आली. निर्देशांचं पालन करण्यात आलं नाही. याबद्दल संबंधितांवर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल," असं साताऱ्याचे पोलीस उपअधीक्षक धीरज पाटील यांनी सांगितलं आहे.

तर लग्न सोहळे, राजकीय कार्यक्रमांना परवानगी दिली जाते मात्र धार्मिक कार्यक्रम होऊ दिले जात नाही, ही हिटलरशाही आहे, असा आरोप करत या गर्दीला प्रशासन जबाबदार असल्याचं ग्रामस्थांनी म्हटलंय. 

प्रशासन कारवाई करेल - पालकमंत्री

बगाडची यात्रा काही लोकांनी पुढाकार घेऊन पार पाडली. खरं तर याठिकाणी गर्दी जमवता येणार नाही, अशा सूचना प्रशासनानं ग्रामस्थांना दिल्या होत्या. लोकांनीही ते कबुल केलं होतं. पण आज सकाळी या सर्व मंडळींनी नियमांचं उल्लंघन केलं. प्रशासन निश्चितपणे कारवाई करेल, असं साताऱ्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी म्हटलं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)