SSC-HSC बोर्ड: 10 वी, 12 वी बोर्डाची परीक्षा देणारे विद्यार्थी का उतरले रस्त्यावर?

10वी परीक्षा आंदोलन

फोटो स्रोत, BBC / Dipali Jagtap

राज्यात एप्रिल आणि मे महिन्यात दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत. सरकारच्या या निर्णयाच्या निषेधार्थ आज विद्यार्थ्यांनी मुंबईत आंदोलन केलं.

महाराष्ट्रात जवळपास 32 लाख विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. सध्या राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या विक्रमी वाढते आहे. कित्येक जिल्ह्यात कडक निर्बंध लागू केलेत. अशा परिस्थितीत आम्ही परीक्षा कशी द्यायची? असा प्रश्न बोर्डाच्या विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.

बोर्डाची परीक्षा पुढे ढकलावी किंवा ऑनलाईन स्वरुपात घ्यावी अशीही मागणी काही विद्यार्थ्यांनी केली आहे. या मागणीसाठी गेल्या काही दिवसांत पुणे आणि नाशिकमध्ये विद्यार्थी रस्त्यावर उतरले. तर आज मुंबईत सीएसटी आणि दादर याठिकाणी विद्यार्थ्यांनी आंदोलनं केली.

दुपारी 1 वाजताच्या सुमारास विद्यार्थी मुंबईत सीएसटी आणि दादरला जमा झाले होते. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत 15 ते 20 विद्यार्थ्यांना ताब्यात घेतलं. काही काळाने या विद्यार्थ्यांना सोडून देण्यात आलं.

वर्षभर जर आम्ही ऑनलाईन शिक्षण घेतलं असेल, तर परीक्षा ऑफलाईन का घेण्यात येतेय, असा सवाल या आंदोलन करण्या विद्यार्थ्यांपैकी काहींनी उपस्थित केलाय. सोबतच दुर्गम आणि ग्रामीण भागातल्या अनेक विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणामध्ये अनेक अडचणी आल्याने त्यांचा अभ्यास झालेला नसल्याचंही या मुलांचं म्हणणं आहे.

दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा पुनर्विचार सध्या तरी करण्यात येणार नसल्याचं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दोन दिवसांपूर्वी म्हटलं होतं.

31 मार्च रोजी बीबीसी मराठीने घेतलेल्या मुलाखतीत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या होत्या, "माझी विद्यार्थी पालकांशी चर्चा झाली आहे. त्यांना मी समजावले आहे. परीक्षा आपल्याला घ्यावी लागणार आहे. योग्य ती काळजी घेतली जाईल. परीक्षा पुढे ढकलली तरी ती काही दिवसांनी घ्यावीच लागणार आहे."

दहावीची परीक्षा 29 एप्रिल ते 21 मे दरम्यान तर बारावीची परीक्षा 23 एप्रिल ते 20 मे दरम्यान होणार आहे. तर 22 मे ते 10 जून दरम्यान बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा होईल.

या काळात विद्यार्थ्यांना कोरोना झाल्यास त्यांच्यासाठी जून महिन्यामध्ये विशेष परीक्षा घेण्यात येणार आहे. या दोन्ही परीक्षांचे निकाल झाल्यानंतर तिसरी पुरवणी परीक्षाही घेण्यात येणार असल्याचं वर्षा गायकवाड यांनी सांगितलंय. यामध्ये विद्यार्थ्यांना नापास झालेल्या विषयांचे पेपर देता येतील आणि श्रेणीवर्धन करायची संधी मिळेल.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)