कोरोना लॉकडाऊन: उद्धव ठाकरे म्हणतात 2 दिवसांत कडक निर्बंध जाहीर करणार

उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, facebook

फोटो कॅप्शन,

उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला.

मी गेल्या काही दिवसांपूर्वी लॉकडाऊन लावायची शक्यता वर्तवली होती. आजही ती शक्यता टळलेली नाहीये. असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटलं.

लॉकडाऊनच्या विषयात राजकारण आणू नका, असंही ते म्हणाले आहेत.

"आज कदाचित कोरोना रुग्णांचा 45 हजारांचा टप्पा आपण गाठू किंवा पार करू. राज्यातले 62 टक्के बेड्स भरले आहेत. 48 टक्के ICU बेड्स भरले आहेत. ऑक्सिजन बेड्स 25 टक्के भरले आहेत. ही परिस्थिती चिंताजनक आहे. परिस्थिती अशीच राहिली तर आणखी 15-20 दिवसांमध्ये सुविधा अपु्ऱ्या पडतील," असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्र्यांच्या संवादातील मुद्दे-

  • मी गेल्या काही दिवसांपूर्वी लॉकडाऊन लावायची शक्यता वर्तवली होती. आजही ती शक्यता टळलेली नाहीये. लॉकडाऊनचा उपयोग हा संसर्ग थांबवण्यासाठी आहे आणि तयारी करण्यासाठी आहे.
  • कोरोनाचा राक्षस दुप्पट-तिपटीने अक्राळविक्राळ रूप धारण करून आलाय. कोरोनाचा विषाणू वेगवेगळी अवतार धारण करून आपल्याला संकटात टाकतोय.
  • आपण RTPCR चाचण्याच अधिक करणार आहोत. दर्जाशी तडजोड नाही. आपण रुग्ण लपवत नाही. मला कुणी व्हिलन ठरवलं तरी माझ्यावरची जबाबदारी मी पार पाडणार आहे.
  • महाराष्ट्राची परिस्थिती धक्कादायक असली तरी आपण सत्य लोकांसमोर आणत आहोत. इतर राज्यांत आकडे कसे वाढत नाहीत, असं विचारतात. त्याबद्दल मी बोलणार नाही. मी महाराष्ट्राबद्दल बोलेन.
  • लस घेतल्यानंतरही मास्क घालणं अनिवार्य आहे. लशीचे दोन डोस घेतल्यानंतर काही लोकांना कोरोना झाल्याचं मी पंतप्रधानांना सांगितलं. तर ते म्हणाले, लस घेतल्यानंतर कोरोना होणार नाही, असं नाही. पण लशीमुळे कोरोनाची दाहकता कमी होणार आहे.
  • संपूर्ण देशात महाराष्ट्रात सर्वाधिक लसीकरण झालं आहे. राज्यात दररोज तीन लाख इतकं लसीकरण होत आहे. एका बाजूने आपली यंत्रणा, ट्रॅकिंग, टेस्टींगमध्ये व्यस्त आहे. उपचारासाठी यंत्रणा व्यस्त आहे. तसंच लसीकरणासाठीही यंत्रणा व्यस्त आहे.
  • लॉकडाऊन हवं की नको, या कात्रीत आपण अडकलो आहोत. एकीकडे जीव वाचवायचा आहे, दुसरीकडे अर्थचक्रही सुरू राहावं, याची काळजी घ्यावी लागणार आहे. लॉकडाऊन परवडणार नाही, पाच हजार रुपये द्या, आरोग्य सुविधा वाढवा, असे सल्ले खूप येत आहेत. पण रोज 50 वैद्यकीय कर्मचारी मला कुणी देऊ शकतं का?

फोटो स्रोत, Getty Images

दरम्यान, देशातील सर्वाधिक कोरोनाबाधितांच्या संख्येत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. तसंच सर्वाधिक सक्रिय रुग्ण असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये देशातील 10 पैकी 8 जिल्हे महाराष्ट्रातीलच आहेत. राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली असल्याचं यापूर्वीच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केलं होतं.

तसंच गेल्या 2 दिवसांपासून राज्यातील नेत्यांकडून लॉकडाऊन करण्याबाबत विविध प्रतिक्रिया येत आहेत.

अन्यथा लॉकडाऊन करावाच लागेल- आरोग्यमंत्री राजेश टोपे

राज्यातील लॉकडाऊन संदर्भात आरोग्यमंत्री राजेश टोपे वारंवार इशारा देताना दिसत आहे. नुकतंच त्यांनी पुन्हा लॉकडाऊन करण्याचा इशारा दिला होता.

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. दिवसेंदिवस वाढणारी रुग्णसंख्या चिंतेची बाब आहे. नागरिक नियम पाळत नसल्याने आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गंभीर इशारा दिला आहे.

दर दिवशी कोव्हिड-19 ग्रस्तांची संख्या 10 टक्क्यांनी वाढतेय. ही गोष्ट अत्यंत चिंतेची असल्याचं आरोग्यमंत्री टोपे म्हणाले.

ते पुढे म्हणाले, "नियम पाळत नसल्याने आपण लॉकडाऊनकडे वाटचाल करत आहोत. लोकांना निर्बंध पाळावेच लागतील अन्यथा लॉकडाऊन लावावाच लागेल," असं टोपे यांनी स्पष्ट केलं होतं.

नियमांचं काटेकोरपणे पालन करा - अजित पवार

पुणे जिल्ह्यात कोरोना संसर्गवाढीचा वेग लक्षात घेत रूग्ण संख्येच्या प्रमाणात सर्व यंत्रणांनी अत्यावश्यक उपचार सुविधा निर्मितीवर भर देण्यासोबतच प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी एकजुटीने संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज केलं.

कोरोनाबाधित रूग्ण उपचारापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्या, कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी निर्बंधांचे काटेकोरपणे पालन करा, असं अजित पवार म्हणाले आहेत.

परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यास लॉकडाऊन हाच शेवटचा पर्याय - अस्लम शेख

कोरोना संदर्भात परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यास लॉकडाऊन हाच शेवटचा पर्याय आहे, असं वक्तव्य मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी केलं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री 8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा )