संजय राऊत : 'महाराष्ट्रातला सत्तेचा फॉर्म्युला UPA नं केंद्र पातळीवर राबवायला हवा' #5मोठ्याबातम्या

संजय राऊत

फोटो स्रोत, Getty Images

आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...

1) महाराष्ट्रानं भाजपविरोधी पक्षांना मार्ग दाखवला - संजय राऊत

महाराष्ट्रात असलेला सत्तेचा फॉर्म्युला केंद्र पातळीवर देखील UPA नं राबवायला हवा, असा सल्ला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला आहे. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.

"महाराष्ट्रानं देशातल्या भाजपविरोधी पक्षांना एक नवा मार्ग दाखवला आहे. विचारसरणी वेगळी असून देखील तीन वेगवेगळ्या पक्षांनी गेल्या दीड वर्षात महाराष्ट्रात आदर्श सरकार चालवलं आहे," असं संजय राऊत म्हणाले.

यावेळी संजय राऊत यांनी दोनच दिवसांपूर्वी ममता बॅनर्जी यांनी भाजपविरोधी पक्षांना उद्देशून लिहिलेल्या पत्राचा उल्लेख केला.

"UPA नं हा प्रयोग देश पातळीवर राबवायला हवा. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देखील देशातल्या 27 विरोधी पक्षाच्या नेत्यांना लिहिलेल्या पत्रामध्ये याचा उल्लेख केला आहे," असं राऊत म्हणाले.

2) राज्याला दारिद्र्यात लोटण्याचं सरकारकडून काम - राणे

महाराष्ट्राला आर्थिक संकटात आणि दारिद्र्यात लोटण्याचं काम महाविकास आघाडीकडून सुरू असल्याची टीका माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे खासदार नारायण राणे यांनी केली. ई टीव्ही भारतनं ही बातमी दिलीय.

फोटो स्रोत, Twitter

"वेगाने लसीकरण करण्यासाठी, तसंच रुग्णालयात मोठ्या प्रमाणात बेड उपलब्ध करून देण्यासाठी या सरकारकडे नियोजन नसल्याने रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे," अशी टीका नारायण राणे यांनी केलीय.

नियम पाळा नाहीतर लॉकडाऊन लावू, अशी धमकी सरकार देत असल्याचा आरोपही राणेंनी केला.

"या लॉकडाऊनमुळे समाजातील विविध घटकांचे किती मोठे नुकसान होणार आहे, याची मुख्यमंत्र्यांना कल्पना नाही. घराबाहेर न पडणाऱ्या मुख्यमंत्र्यांना जनतेच्या वेदना कशा कळणार," असं राणे म्हणाले.

3) तृणमूल खासदार महुआ मोईत्रांनी नरेंद्र मोदींना म्हटलं 'रोडरोमिओ'

तृणमूलच्या खासदार महुआ मोईत्रांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख 'रोडरोमिओ' असा केला आहे. एनडीटीव्हीनं ही बातमी दिली आहे.

मोईत्रा म्हणाल्या, "बंगालमध्ये आमच्याकडे एक शब्द आहे ज्याचा अर्थ रस्त्याच्या शेजारी भिंतीवर बसणारे आणि तिथून येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक महिलेला आवाज देत दीदी-ए-दीदी म्हणणारे. पंतप्रधान हेच करत आहेत."

"लाखो लोक उपस्थित असणाऱ्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्र्यांना उपहासात्मकपणे दीदी ओ दीदी असं म्हणत होते. तुम्ही असं म्हणाल का? ते आपल्या आई-बहिणीबद्दल असं बोलतील का? हे ठीक कसं काय असू शकतं? पंतप्रधान येऊन आता आम्हाला सभ्यतेबद्दल शिकवणार का? पंतप्रधान येथे बसून हे सर्वात दर्जाहीन पद्धतीने मुख्यमंत्र्यांचा उल्लेख करत आहेत," असे प्रश्नही त्यांनी विचारले.

परवा मोदींनी ममता बॅनर्जींवर टीका करताना, "दीदी ओ दीदी…तुम्ही दुसऱ्या मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचं कळालं आहे. यामध्ये काही सत्य आहे का?" असं म्हटलं होतं. या टीकेला उत्तर देताना खासदार मोईत्रा यांनी वरील विधानं केली.

4) शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्यावर हल्ला

दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या राकेश टिकैत यांच्यावर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. टीव्ही 9 मराठीनं ही बातमी दिली आहे.

किसान सभेचे नेते राकेश टिकैत हे राजस्थानातील हरसौरा इथून एका सभेला संबोधित करुन बानसूरकडे निघाले होते. त्यावेळी काही लोकांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक केल्याची माहिती टिकैत यांनी दिलीय.

या हल्ल्यात त्यांच्या गाडीच्या काचा फुटल्या आहे. तसंच टिकैत यांच्यावर शाईही फेकण्यात आली.

या हल्ल्या प्रकरणी अलवरच्या मस्त्य विद्यापीठातील छात्रसंघाचे अध्यक्ष कुलदीप यादवसह 4 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय.

5) मी करुणानिधींचा मुलगा आहे, मी घाबरणार नाही - एमके स्टॅलिन

द्रमुकचे अध्यक्ष एमके स्टॅलिन यांची मुलगी आणि जावयाच्या घरावर आयकर विभागानं छापे टाकले. या घटनेनंतर एमके स्टॅलिन यांनी भाजप आणि AIADMK वर टीका केली आहे. द न्यूज मिंटनं ही बातमी दिली आहे.

"मी मोदींना सांगतो, हा द्रमुक पक्ष आहे. विसरू नका. मी करुणानिधींचा मुलगा आहे. मी अशा गोष्टींना घाबरणार नाही," असं एमके स्टॅलिन म्हणाले.

"मी MISA आणि आणीबाणीचा अनुभव घेतला आहे. त्यामुळे तुम्ही कितीही छापे टाकलेत तरी घाबरणार नाही," असं स्टॅलिन म्हणाले.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)