शिवाजी महाराजः रायगडावरील उत्खननात सापडली सोन्याची बांगडी

रायगड, संभाजीराजे छत्रपती

फोटो स्रोत, Facebook/Yuvraj Sambhajiraje Chhatrapati

फोटो कॅप्शन,

रायगडावर सापडलेली सोन्याची बांगडी

रायगड जिल्ह्यातील किल्ले रायगडावर उत्खननादरम्यान सोन्याची बांगडी सापडली. रायगड किल्ल्यावर रायगड प्राधिकरण आणि भारतीय पुरातत्व खात्याकडून एकत्रितपणे उत्खननाची मोहीम राबवली जातेय.

रायगडावरील श्री जगदीश्वर मंदिराच्या डावीकडील बाजूच्या वाड्यात सोन्याची बांगडी सापडली.

रायगडावर आतापर्यंत भांडी, नाणी आणि घरांची वेगवेगळ्या प्रकारची कौलं अश वस्तू सापडल्या आहेत. मात्र, पहिल्यांदाच सोन्याच्या धातूपासून बनलेली मौल्यवान बांगडी (पाटली) सापडल्यानं इतिहासप्रेमींकडून आनंद व्यक्त होत आहे.

फोटो स्रोत, Facebook/Yuvraj Sambhajiraje Chhatrapati

फोटो कॅप्शन,

रायगडावर सापडलेली सोन्याची बांगडी पाहताना रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष खा. संभाजीराजे छत्रपती

याबाबत माहिती देताना रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितलं की, "रायगड प्राधिकरणामार्फत दुर्गराज रायगडावर सुरू असलेल्या उत्खननाचे महत्त्व पुन्हा प्रत्ययास आले. दोन दिवसांपूर्वी झालेल्या उत्खननामध्ये सोन्याच्या धातू पासून बनवलेली पुरातन मौल्यवान बांगडी(पाटली)मिळालेली आहे."

"पुढेही अनेक ऐतिहासिक वस्तूंसह वेगवेगळे अलंकारही उत्खननात मिळू शकतात. यामुळे गडावरील तत्कालीन राहणीमान, संस्कृती, वास्तूरचना नव्याने समजण्यास मदत होणार आहे. तसंच, या वस्तू ज्या ठिकाणी मिळतात, त्यावरून त्या ठिकाणाचे वास्तविक महत्त्व आणि माहिती समजण्यास मोलाची मदत होणार आहे," असं संभाजीराजे म्हणाले.

फोटो स्रोत, Facebook/Yuvraj Sambhajiraje Chhatrapati

फोटो कॅप्शन,

रायगडावर सापडलेली सोन्याची बांगडी

"या बांगडीवरील नक्षीकाम उत्कृष्ट दर्जाचं आहे. या सापडणाऱ्या वस्तूंमुळे इतिहासाला वेगळं वळणं लागेल. मराठा साम्राज्य अधिक कळण्यास मदत होईल," असं संभाजीराजे म्हणाले.

रायगडावर 350 साईट्स आहेत. त्यातील 10-12 साईट्सचंच उत्खनन सुरू आहे.

"या 350 साईट्सवर पुरातत्व खात्याच्या वेगानं तिथं उत्खनन केलं तर 25 वर्षे लागतील. त्यामुळे त्यांना विनंती करतो की, रायगड प्राधिकरणासोबत मिळून उत्खनन केल्यास सात-आठ वर्षात बऱ्याच गोष्टी पाहायला मिळतील," असा विश्वासही संभाजीराजे यांनी व्यक्त केला.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)