कोरोना : पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेशिवाय पुढच्या वर्षात प्रवेश - वर्षा गायकवाड

वर्षा गायकवाड

फोटो स्रोत, Twitter/@VarshaEGaikwad

पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना यावर्षी परीक्षा न घेता पुढच्या वर्षात प्रवेश देण्यात येणार असल्याची घोषणा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केलीय.

राज्यातली कोरोनाची परिस्थिती पाहता हा निर्णय घेण्यात आल्याचं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.

वर्षा गायकवाड म्हणाल्या, "मुलांच्या वार्षिक मूल्यमापनाविषयी निर्णय घेत असताना आम्ही शालेय शिक्षण विभागाच्या मार्फत असा निर्णय घेत आहोत, की पहिली ते आठवीचे जे विद्यार्थी आहेत, RTE म्हणजे शिक्षणाच्या मोफत कायद्याच्या अंतर्गत, खरंतर या मुलांचं वर्षभराचं मूल्यमापन पाहणं गरजेचं आहे. परंतु यावर्षी हे होणं शक्य नाही. म्हणून राज्यामधले जे पहिली ते आठवीचे विद्यार्थी आहेत, शिक्षणाचा हक्क कायद्याअंतर्गत जे विद्यार्थी येतात, त्या सगळ्या विद्यार्थ्यांना सरसकट त्यांना पास करून पुढच्या वर्गात पाठवण्याबद्दलचा निर्णय शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून आम्ही घेत आहोत."

राज्यातली कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढतेय. मार्च 2020मध्ये कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन लावण्यात आल्यापासून शाळा बंद झाल्या होत्या.

त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने नवीन पासून शैक्षणिक वर्षामध्ये शिक्षण देण्यास सुरुवात झाली. महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये 2020 वर्ष संपताना मोठ्या वर्गांच्या शाळा सुरू झाल्या होत्या. पण पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक वर्गांची प्रत्यक्ष शाळा सुरू झाली नाही.

पण मुलांपर्यंत शिक्षण पोहोचण्यासाठी आलेले अडथळे, शैक्षणिक वर्ष पूर्ण होत आलं असतानाही पूर्ण न होऊ शकलेला अभ्यासक्रम हे सगळं लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आल्याचं वर्षा गायकवाड यांनी म्हटलंय.

सध्या राज्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षांवरूनही विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे. कोरोना संसर्ग वाढत असताना आणि वर्षभर ऑनलाईन अभ्यास झालेला असताना ऑफलाईन परीक्षा घेऊ नयेत अशी मागणी विद्यार्थ्यांनी केलीय. तर सध्यातरी ऑफलाईन परीक्षा घेण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करणार नसल्याचं वर्षा गायकवाड यांनी म्हटलं होतं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू