अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठवलेल्या राजीनामा पत्रात काय म्हटलं?

अनिल देशमुख

फोटो स्रोत, facebook

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांची सीबीआय चौकशी होणार असल्यानं देशमुख यांनी राजीनामा दिला आहे. आपल्या राजीनाम्याचं पत्र त्यांनी ट्वीट केलं आहे.

या प्रकरणाची सीबीआय चौकशी होत असल्याने पदावर राहणं नैतिकदृष्ट्या योग्य वाटत नसल्याचं अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लिहिलेल्या राजीनामा पत्रात म्हटलं आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दरमहा 100 कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला होता.

गृहमंत्र्यांनी नैतिकतेच्या दृष्टिनं राजीनामा दिला, हे योग्यच झालं. पण ही नैतिकता आधीच आठवायला हवी होती, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.

"हा राजीनामा घ्यायला उशीरच झाला. अनिल देशमुख यांच्यावर आरोप झाल्यानंतरच गृहमंत्रिपदाचा राजीनामा घ्यायला हवा होता. इतक्या भयावह घटना घडत असताना मुख्यमंत्री अजूनही गप्प का आहेत? मुख्यमंत्र्यांनी आतातरी त्यांचं मौन सोडावं," असंही फडणवीसांनी म्हटलं.

दरम्यान, अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याविषयी माहिती देताना अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी माध्यमांना सांगितलं, "परमबीर सिंह यांच्या आरोपानंतर अनिल देशमुख शरद पवारांना भेटले. सीबीआय चौकशी करणार असेल तर मी राजीनामा देऊ इच्छितो असं अनिल देशमुखांनी पवारांना सांगितलं. त्याला पवारांनी होकार दिला. त्यामुळे आता देशमुख राजीनामा देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयात गेले आहेत."

परमबीर सिंह यांच्या आरोपात कोणतंही तथ्य नाही, असंही मलिक यांनी म्हटलं.

गृहमंत्री पदाची जबाबदारी सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडेच राहील, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

पवारांच्या निर्णयाचं स्वागत - चंद्रकांत पाटील

"सीबीआय चौकशी सुरू असताना पदावर राहता येत नाही या संकेताचा विचार करून शरद पवारांनी संवेदनशीलतेने हा निर्णय घेतला असल्याबद्दल समाधान व्यक्त करतो," अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अनिल देशमुखांच्या राजीनाम्यानंतर व्यक्त केली.

सीबीआयच्या पंधरा दिवसांच्या चौकशीनंतर सगळं सत्य बाहेर पडेल, असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं.

अनिल देशमुख आमचं वैयक्तिक टार्गेट नाही - प्रवीण दरेकर

"अनिल देशमुख आमचं वैयक्तिक टार्गेट असण्याचं कारण नव्हतं. आमचा आक्षेप सरकारवर होता. कारण ज्या खात्याकडे भ्रष्टाचार निर्मूलनाची जबाबदारी आहे, त्यांच्यावरच भ्रष्टाचाराचे आरोप होत असतील, तर सरकारनं विचार करणं गरजेचं होतं," अशी प्रतिक्रिया विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केली.

हा भ्रष्टाचार हजारो कोटींचा असल्याचा आरोपही दरेकर यांनी केला.

आम्ही जेव्हा जेव्हा आरोप करतो, तेव्हा सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका आमच्यावर केली. पण प्रत्येकवेळी आम्ही केलेले आरोप सिद्ध झाले असल्याचंही प्रवीण दरेकर यांनी म्हटलं.

प्रकरण काय?

काही दिवसांपूर्वीच पोलीस अधिकारी सचिन वाझे प्रकरणी परमबीर सिंह यांची मुंबई पोलीस आयुक्त पदावरुन बदली करण्यात आली होती. त्यानंतर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले.

आज परमबीर सिंह यांच्या आरोपांची प्राथमिक सीबीआय चौकशी करण्याचे हायकोर्टाने आदेश दिले आहेत. या चौकशीचा अहवाल 15 दिवसांमध्ये सादर करावा असेही कोर्टाने सांगितले आहे.

(ही बातमी सतत अपडेट होत आहे)

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)