गुंदेचा बंधू: प्रसिद्ध संगीत गुरूंवर लैंगिक अत्याचाराचे आरोप

  • निखील इनामदार आणि पूजा अगरवाल
  • बीबीसी न्यूज, मुंबई
गुंदेचा बंधू

फोटो स्रोत, FACEBOOK/ GUNDECHA BROTHERS

फोटो कॅप्शन,

गुंदेचा बंधू

तिची अस्वस्थता आणि काळजी झूमच्या स्क्रीनवरही स्पष्ट दिसत होती. मोनिका तिचं नाव. हे नाव बदललेलं आहे. कारण तिच्यावर सूड उगवला जाईल अशी भीती तिला वाटते. मात्र, तिची व्यथा सांगण्यास ती पुढे आलीय.

मोनिकाचा आरोप आहे की, ती धृपद संस्थान या संगीत शाळेत शिकत असताना प्रसिद्ध भारतीय शास्त्रीय गायक रमाकांत गुंदेचा यांनी तिच्यावर बलात्कार केला. धृपद संस्थान हे मध्य प्रदेशात आहे.

रमाकांत गुंदेचा यांचं नोव्हेंबर 2019 मध्ये निधन झालं. मात्र, त्यांच्यावर आणि त्यांचे दोन भाऊ उमाकांत आणि अखिलेश यांच्यावर त्यांच्या विद्यार्थिनींनी लैंगिक छळाचे आरोप केले आहेत.

तीन महिन्यांच्या शोधादरम्यान अनेक विद्यार्थिनींशी चर्चा केली. त्या दरम्यान त्यांनी सांगितलं की गुंदेचा बंधूंनी त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले. उमाकांत आणि अखिलेश यांनी हे आरोप फेटाळले आहेत.

रमाकांत हे धृपद शैलीतले नावाजलेले शास्त्रीय गायक होते. उमाकांत गुंदेचा अजूनही या शैलीत गातात, तर अखिलेश गुंदेचा हे पखवाजवादक आहेत.

2012 साली रमाकांत आणि उमाकांत यांना संगीत क्षेत्रातील योगदानासाठी 'पद्मश्री' या भारतातील चौथ्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरवण्यात आलं.

फोटो स्रोत, DEREK ECKLUND

फोटो कॅप्शन,

धृपद संस्थान

धृपद संस्थानात संगीत शिकण्यासाठी केवळ भारतातूनच नव्हे, तर जगभरातील विविध देशांमधून शेकडो विद्यार्थी-विद्यार्थिनी येतात. युनिस्कोनं धृपद संस्थानाला अमूर्त सांस्कृतिक वारसा म्हणून मान्यता दिल्याचा दावाही या संस्थेकडून करण्यात येतो. बीबीसीने याची युनिस्कोकडे स्वतंत्ररीत्या पडताळणी केली असता असं समजलं की त्यांच्या या दाव्यात तथ्य नाही. धृपद संस्थान संगीत शाळेशी आमचा काहीही संबंध नाही असं युनिस्कोने स्पष्ट केलं. त्यांनी युनिस्कोचं नाव वापरणं थांबवावं अशी नोटीस देखील त्यांना पाठवू असं युनिस्कोच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

हे गुंदेचा बंधू प्रसिद्धी आणि कलेचा दर्जा याबाबत शिखरावर पोहोचले आहेत असं मानलं जातं. मात्र, त्यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे शास्त्रीय संगीत जगताला मोठा धक्का बसला आहे.

या आरोपांमुळे गुरू-शिष्य ही प्राचीन पंरपराही प्रकाश झोतात आलीय. या परंपरेत अलिखित नियम असा असतो की, शिष्यानं गुरूला पूर्णपणे शरण जायचं.

या तिन्ही भावांविरोधात अश्लील संदेश पाठवण्यापासून वर्गात विनयभंग करण्यापर्यंत आरोप आहेत. रमाकांत यांच्यावर तर बलात्काराचाही आरोप आहे.

मोनिका सांगतात, "संगीत शाळेतला माझा पहिलाच आठवडा होता, जेव्हा रमाकांत यांच्याकडून अयोग्य व्हॉट्सअप मेसेज यायला सुरुवात झाली. एका संध्याकाळी तर रमाकांत यांनी मला काळोख असलेल्या कार पार्कमध्ये नेलं आणि गाडीच्या मागच्या सीटवर माझ्याशी गैरवर्तन करण्यास सुरुवात केली."

"ते माझं चुंबन घेऊ लागले. मी त्यांना मागे सारलं, पण त्यांनी त्यांचे प्रयत्न सुरुच ठेवले. त्यांनी माझ्या शरीराला स्पर्श केला आणि माझे कपडे काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी माझ्या लक्षात आलं की, माझी हालचाल होत नाहीय. मी एखाद्या दगडाप्रमाणे झाली होती. मी काहीच प्रतिसाद देत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी म्हटलं, तुला परत शाळेत सोडू का? पण त्या प्रश्नालाही उत्तर देऊ शकले नाही," असं मोनिका सांगतात.

फोटो कॅप्शन,

गुंदेचा बंधू

मोनिका यांना या आठवणी नकोशा वाटतात. त्यांनी तातडीनं शाळा सोडली नाही. कारण त्यांना संगीताची आवड होती. संगीत क्षेत्रात काही करण्याची इच्छा होती. किंबहुना, मोनिका यांनी त्यांची नोकरी सोडून, सर्व पैसा संगीत शिकण्यासाठी गुंतवला होता. त्यासाठीच त्या धृपद संस्थानात आल्या होत्या.

मात्र, धृपद संस्थानात प्रवेश घेतल्याच्या तीन महिन्यानंतर रमाकांत गुंदेचा यांनी बलात्कार केल्याचा आरोप मोनिका करतात. त्या म्हणतात, "त्यांनी माझ्या रुममध्ये प्रवेश केला. माझे कपडे काढले आणि माझ्यावर बलात्कार केला. नंतर ते निघून गेले. मी लगेच दारापाशी गेले आणि दार बंद केलं. तीन दिवस मी काहीच खाल्लं नाही."

सारा ही धृपद संस्थानची आणखी एक विद्यार्थिनी. अर्थात, तिचंही नाव बदलण्यात आलंय. अखिलेश गुंदेचा यांनी आपला विनयभंग केल्याचा आरोप सारा यांनी बीबीसीशी बोलताना केला.

"मी तिथं असताना आजारी पडले होते आणि हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. अखिलेश गुंदेचा मला पुन्हा शाळेत नेण्यासाठी आले होते. कारमध्ये ते माझ्या बाजूलाच बसले होते. ते माजा हात पकडू लागले. मी त्यांना बाजूला सारलं. ते मला फार विचित्र वाटलं," असं सारा सांगतात.

एकूण पाच मुलींनी बीबीसीला सांगितलं की त्यांच्यावर धृपद संस्थानमध्ये लैंगिक अत्याचार झाले. त्यापैकी काहींनी सांगितले की जेव्हा त्यांनी रमाकांत यांना नकार दिला तेव्हा त्यांचा त्या विद्यार्थिनींना शिकवण्यातील रस निघून गेला. जर एखाद्या मुलीने तक्रार केली तर तिचा वर्गात सर्वांसमक्ष पाणउतारा केला जाई.

रेचल फेअरबँक या प्राथमिक शाळेतल्या शिक्षिका आहेत. त्या आता अमेरिकेतील सिएटल इथं राहतात. त्या सांगतात की, मार्च 2017 मध्ये शाळेच्या पहिल्याच दिवशी त्यांच्यासोबत गैरवर्तन झालं.

सामान खोलीवर सोडण्यासाठी आलेल्या कॅम्पस ड्रायव्हरने त्यांना एकटं गाठलं असं त्या सांगतात. तो मला त्रास देईल असं मला वाटलं म्हणून मी रमाकांतला मध्यस्थी करायला भाग पाडलं. किंवा तो मला इजा करेल असं वाटलं म्हणून रमाकांतला यामध्ये लक्ष द्यायला सांगितलं.

फोटो स्रोत, Getty Images

मात्र, मदत करण्याऐवजी रमाकांत गैरवर्तन करू लागले, असा आरोप रेचल करतात. त्या म्हणतात, "त्यांनी माझं चुंबन घेण्याचा प्रयत्न केला आणि ते सारखे मेसेज करत, प्रेमाविषयी बोलत. एकदा तर, रात्री उशिरा ते कॅम्पसपासून दूर गाडीतून घेऊन गेले आणि त्यांनी माझे कपडे काढून गुप्तांगाला स्पर्श केला."

"मी त्यांना मागे ढकललं. त्यांनी मला एका लहान शहरात नेलं. हे शाळेच्या काही अंतरावर होतं. तिथून मी कशीतरी निसटली. शेतातून धावत पुन्हा शाळेत आले. त्यानंतर लगेचच मी शाळा सोडली. रमाकांत गुंदेचा यांच्या उपस्थित वर्गात मी बसूही शकली नाही," असं रचेल सांगतात.

रचेल आपलं नावही लपवू पाहत नाहीत. त्या म्हणतात, "आता मला बोलायला धाडस आलंय. सप्टेंबर 2020 मध्ये 'धृपद फॅमिली युरोप' या फेसबुक ग्रुपवर असाच एक महिलेचा आरोप वाचल्यानंतर मला माझ्याबाबतचा प्रसंग सांगण्याचं धाडस झालं."

अखिलेश आणि उमकांत गुंदेचा यांनी वकिलांमार्फत सर्व आरोप फेटाळले. 'स्वार्थी हेतूने' आरोप केल्याचं गुंदेचा बंधूंचं म्हणणं आहे. "गुंदेचा बंधू आणि धृपद संस्थानच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवण्याच्या हेतूने हे आरोप केले आहेत," असा दावा गुंदेचा बंधूंमार्फत करण्यात आलाय.

मात्र, या सर्व तक्रारींचा अंतर्गत तक्रार समितीकडून गेल्या चार महिन्यांपासून तपास सुरू आहे. भारतीय कायद्यानुसार लैंगिक छळ किंवा गैरवर्तनाच्या तक्रारींकडे लक्ष देण्यासाठी प्रत्येक संस्थेला एक समिती स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत.

विद्यार्थिनींच्या मते, धृपद संस्थानची समिती शाळेवर दबाव आणल्यानंतर स्थापन करण्यात आली. या संस्थानचे माजी विद्यार्थी पीडितांच्या बाजूने उभे आहेत. मात्र, त्यांना अनेकदा धमकीचे संदेश आल्याचा त्यांचा आरोप आहे.

तक्रार समितीने या प्रकरणाच्या अहवालातील शिफारशी सर्व पीडितांना पाठवल्या आहेत. मात्र, या अहवालात काय आहे, हे उघड न करण्याबाबत या पीडितांना कायद्याचं बंधन आहे.

भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्राला पहिल्यांदाच #MeToo चळवळीनं स्पर्श केलाय.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

प्रसिद्ध शास्त्रीय गायक टीएम कृष्णा

शास्त्रीय गायन क्षेत्रातील अनेकांचं म्हणणं आहे की, प्राचीन पद्धतीनं शिकण्यासाठी गुरू-शिष्याची परंपरेतील कठोरता टिकवून ठेवणं मुलभूत गरज आहे. मात्र, काहीजण बीबीसीशी बोलताना म्हणाले, ही पद्धत शोषणाची सोपी पद्धत आहे हे आपण ओळखायला हवं.

"शिष्यानं गुरुला पूर्णपणे अधीन किंवा शरण व्हावं असं या परंपरेत अपेक्षित असतं. शिष्य पुरुष असेल तर शरण होण्याचं प्रमाण कमी असतं. शिष्य स्त्री असेल तर शरण होण्याचं प्रमाण जास्त असतं. यामुळेच स्त्री अधिक असुरक्षित होण्याची शक्यता असते," असं 79 वर्षीय गायिक नीला भागवत म्हणतात.

भागवत या स्वत:च गीतरचना करतात. कारण त्यांना असं वाटतं की, पारंपरिक गीतांवर पुरुषप्रधान संस्कृतीचं वर्चस्व दिसतं.

कर्नाटक संगीतातील प्रसिद्ध शास्त्रीय गायक टीएम कृष्णा तर म्हणतात की, गुरू-शिष्य परंपरा पूर्णपणे रद्द केली पाहिजे.

"इतर नात्यांप्रमाणेच गुरू-शिष्य नातंही अधिकाराच्या पातळीवर असमतोल असणारं आहे. पण धक्कादायक गोष्ट ही आहे की या असमानतेचं उदात्तीकरण केलं जातं," असं टीएम कृष्णा यांनी नुकतेच इंडियन एक्स्प्रेसमधील लेखात म्हटलं होतं.

"अर्थात, मी काहीतरी प्राचीन परंपरा नष्ट करू पाहतोय, असे आरोप होतील. पण एखाद्या वाईट गोष्टीचा बचाव करण्यासाठी त्या परंपरेचा इतिहास उगाळू नये," असंही ते म्हणतात.

कृष्णा आणि भागवत हे दोघेही म्हणतात की, एखाद्या ईश्वराप्रमाणे, जे कोणतीही चूक करू शकत नाही, असं गुरूकडे पाहण्यापेक्षा गुरूचं 'मानवीकरण' होणं गरजेचं आहे आणि या क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणूनच त्यांच्याकडे पाहायला हवं.

"नुकत्याच झालेल्या या आरोपांनंतर कुणी त्या संस्थेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलाय का? देशात अशा शेकडो संस्था आहेत, तिथं अंतर्गत अनुपालन समिती अस्तित्वात तरी आहे का?" असा प्रश्न ज्येष्ठ शास्त्रीय गायिका शुभा मुदगल यांनी केलाय.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

ज्येष्ठ शास्त्रीय गायिका शुभा मुदगल

टीएम कृष्णा, नीला भागवत आणि शुभा मुदगल ही मंडळी संगीत क्षेत्रातील अत्यंत मोजक्या व्यक्ती आहेत, ज्या समोर येऊन या विषयावर बोलत आहेत. बाकीचे सर्व गप्प बसले आहेत. काही जणांना आश्चर्य वाटतंय की, गुंदेचा बंधूंच्या करिअरवर या सगळ्या आरोपांचा किती परिणाम होईल.

अखिलेश गुंदेचा यांना प्रतिष्ठेच्या तानसेन समारोह 2020 मध्येही बोलावण्यात आलं होतं.

न्यायव्यवस्थेवर फारसा विश्वास नसल्यानं आपण कायदेशीर मार्ग अवलंबत नसल्याचं अनेक विद्यार्थ्यांनी बीबीसीशी बोलताना म्हटलं. तसंच, याबाबत पुढील पावलांबाबत अस्पष्टता आहे. कारण बरेच पीडित तर देश सोडून गेलेत.

तपास समितीच्या निष्कर्षांसह अनेक महिलांना वाटतं की, गुंदेचा यांनी जाहीर माफी मागावी. पण हे अद्याप झालं नाही.

रेचल यांना या तपासात काहीच महत्त्वाचं वाटत नाही. त्यातील निष्कर्ष जाहीर होऊ शकली नाहीत. धृपदसोबतचे संबंध तोडावे लागले, हे जास्त दु:खदायक असल्याचं रचेल सांगतात.

"माझ्याकडे स्वत:ची वीणा आहे. मात्र, आता ती मी विकणार आहे. मागचं सगळं विसरुन मी गाणं गाऊ शकत नाही," असंही त्या म्हणतात.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)