पुणे कोरोना : संध्याकाळी 6 वाजल्यापासून संचारबंदी, काय सुरू, काय बंद राहणार?

  • राहुल गायकवाड
  • बीबीसी मराठी
बस कंडक्टर

फोटो स्रोत, Getty Images

राज्यातील वाढती कोरोना रुग्णसंख्या पाहता राज्य सरकारच्या मंत्रीमंडळ बैठकीत झालेल्या निर्णयानुसार राज्यात काही कठोर निर्बंध लावण्यात आले.

यात राज्य सरकारने रात्री आठ वाजल्यानंतर संचारबंदी लागू असेल, असं म्हंटलं आहे. असं असलं तरी शुक्रवारी अजित पवार यांच्या बैठकीमध्ये पुण्यात संध्याकाळी 6 वाजल्यानंतर संचारबंदी लागू करण्यात आली होती.

राज्य सरकारने जरी 8 वाजल्यापासून संचारबंदी जाहीर केली असली, तरी पुण्यात संध्याकाळी 6 वाजल्यापासूनच संचारबंदी असेल ,असं पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी बीबीसी मराठीशी बोलताना स्पष्ट केले.

पुण्यातल्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे शुक्रवारी झालेल्या आढावा बैठकीमध्ये पुण्यात अधिकचे काही निर्बंध लावण्यात आले. त्यानंतर रविवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली यात राज्यासाठी काही निर्बंध नव्याने लावण्यात आले. त्यामुळे पुण्यात कुठले निर्बंध लागू असतील याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. यावर पुण्याच्या महापौरांनी स्पष्टीकरण दिले आहे.

पुणे शहरात 6 पासून संचारबंदी

राज्य सरकारने काढलेल्या आदेशात रात्री आठ ते सकाळी 7 वाजेपर्यंत संचारबंदी असेल असं म्हटलं आहे. पुण्यात मात्र संध्याकाळी 6 वाजल्यापासूनच संचारबंदी असेल असं महापौरांनी स्पष्ट केलं. विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याशी झालेल्या चर्चेत त्यांनी ही माहिती दिल्याचे महापौरांनी सांगितले.

अत्यावश्यक सेवांच्या दुकानांच्या व्यतिरिक्त इतर दुकानांच्या बाबतीत विचारले असता महापौर म्हणाले, ''राज्य सरकारने जे आदेश काढले त्यात शनिवार-रविवारी अत्यावश्यक सेवा सोडून इतर सर्व बंद असेल असं म्हटलं आहे. त्यामुळे इतर दिवशी सकाळी 6 ते संध्याकाळी 6 दुकाने सुरू राहतील. तसेच राज्य सरकारच्या नव्या नियमांनुसार शनिवार - रविवार लॉकडाऊन असल्याने या दिवशी होणारे लग्न सोहळे आता होऊ शकणार नाहीत.''

फोटो कॅप्शन,

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ

काय सुरू, काय बंद राहणार?

  • हॉटेल, रेस्टॉरंट, बार बंद .पार्सल सेवा सुरू राहणार
  • मॉल्स, सिनेमा हॉल बंद, पीएमएल बंद
  • धार्मिक स्थळ, आठवडे बाजार बंद.
  • भाजी मंडईमध्ये सोशल डिस्टनसिंग चे नियम पाळावे लागणार.
  • लग्न आणि अंत्यविधी सोडून कुठल्याच कार्यक्रमाला परवानगी नाही.
  • शनिवारी-रविवारी सगळं बंद राहणार

जास्तीत जास्त बेड उपलब्ध करण्याचे प्रयत्न

पुण्यात दररोज 5 ते 6 हजारांच्या संख्येने रुग्णसंख्या वाढत असल्याने बेड्सचा तुटवडा जाणवत आहे. अनेकांना बेड्स मिळवण्यात अडचणी येत आहेत.

बेड्सच्या उपलब्धतेबाबत बोलताना महापौर म्हणाले, ''येत्या काळात बेड्सची संख्या कमी पडू शकते, त्यासाठी जास्तीत जास्त बेड्स उपलब्ध करण्याबाबत नियोजन सुरू आहे. आज पुण्याचे विभागीय आयुक्त तसेच महापालिकेच्या आयुक्तांसोबत चर्चा झाली यात बेड्स कसे वाढवता येईल याबाबत आम्ही चर्चा केली.''

रुग्णांच्या सोयीसाठी कॉलसेंटर सुरु करण्याचा विचार

कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने पुणे महानगरपालिकेच्या हेल्पलाईनवर येणाऱ्या कॉल्सची संख्या झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे वारंवार फोन करुनही फोन उचलला जात नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत आहेत.

यावर उपाय म्हणून कोव्हिड रुग्णांसाठी स्वतंत्र कॉलसेंटर सुरु करण्याचा विचार असल्याचे महापौरांनी सांगितले.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)