तिरुपतीच्या मंदिरातून होणाऱ्या केसांच्या तस्करीचं चीन कनेक्शन काय आहे?

  • व्ही. शंकर
  • बीबीसी तेलगूसाठी
तिरुपती केस दान

फोटो स्रोत, Getty Images

भारत आणि म्यानमार सीमेवर दोन महिन्यांपूर्वी सापडलेल्या केसांमुळे आंध्र प्रदेशातील राजकारण आता तापलं आहे.

हे केस तिरुपती देवस्थानम म्हणजेच टीटीडीमधून तस्करी केले गेले होते अशी शंका व्यक्त केली जात आहे. हे मंदिर आणि इथं होणारं केशदान लोकांच्या भावनांशी निगडीत आहे.

या केशतस्करी विषयी आता भाविकांमध्ये चर्चा होऊ लागली आहे. या पकडल्या गेलेल्या केसांची किंमत सुमारे 1.8 कोटी रुपये सांगण्यात येत आहे.

तस्करीची माहिती मिळाल्यावर अधिकाऱ्यांनी काय केलं असा प्रश्न विचारला जात आहे. तिरुमलामध्ये काही सोशल मीडिया अकाऊंट्स तसेच एका टीव्ही चॅनलविरोधात खटला का दाखल केला आहे असा प्रश्नही विचारला जात आहे.

केशदानाचे हे केस दोन महिन्यांपुर्वी पकडले गेले होते. आसाम रायफल्सच्या एक शोधतुकडीने हे केस मिझोरम आणि म्यानमारच्या सीमेवर पकडले होते. त्याची आता जास्त चर्चा होऊ लागली आहे.

साधारणतः या प्रदेशात सोनं किंवा रानटी प्राण्यांची तस्करी होत अशते. परंतु संरक्षण दलाच्या जवानांना प्रथमच केस भरलेली 120 पोती मिळाली. यातल्या प्रत्येक पोत्यात सुमारे 50 किलो केस होते.

केसांनी भरलेली 120 पोती

20 मार्चला प्रसिद्ध झालेल्या एका अधिकृत निवेदनामध्ये संरक्षणदलांनी केसांची ही तस्करी एका ट्रकमधून होताना पकडली.

हे केस तिरुपतीमधून आणले गेले होते असं हा ट्रक चालवणाऱ्या काही ड्रायव्हर लोकांनी सांगितल्याचं काही अधिकाऱ्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

फोटो स्रोत, ASSAM RIFLES

ऐजॉल येथिल एका मारुयती नावाच्या महिलेनं तिरुपतीमधून केस आणण्याचा ठेका दिला होता, असं ड्रायव्हरनं सांगितल्याचं अधिकारी म्हणाले.

देशाच्या वेगवेगळ्या मंदिरातून केस गोळा करुन ट्रकमधून नेण्यात येत होते. मात्र जो ट्रक पकडला त्यात तिरुपतीमधून आणलेले केस होते, असं हिंदू या वर्तमानपत्रातील बातमीत म्हटलं आहे.

पोलिसांनी ट्रक ड्रायव्हर मुंगयान सिंहची कसून चौकशी केली. हा ट्रक भारतीय सीमेमध्ये सात किलोमीटर आतच पकडला गेला. जप्त केलेल्या केसांची किंमत 1.8 कोटी रुपये असू शकते, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. हे केस भारतातून तस्करी करून म्यानमारला पाठवले जातात. मग ते थायलंडला जातात आणि तिथून ते चीनला जातात.

चीनमध्ये विग तयार करण्याचा उद्योग

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार चीनमध्ये या केसांपासून विग तयार केले जातात आणि मग जगभरातील बाजारांमध्ये ते विकले जातात.

विग बनवण्याच्या व्यवसायामध्ये 70 ट्कके हिस्सा चीनचा आहे, असं तज्ज्ञ सांगतात.

भारतातील काही देवळांमध्ये केस वाहण्याची प्रथा आहे. त्यामुळेच हे केस सहजरित्या उपलब्ध होतात. विग व्यवसायाचा कच्चा माल भारतातूनच जातो. भारतात सर्वात जास्त केशदान तिरुपती मंदिरात होतं. इथं दररोज पन्नास हजार भक्त दर्शनासाठी येतात. त्यातील साधारणतः एक तृतियांश लोक केस वाहतात.

2020-21 या आर्थिक वर्षात टीटीडीच्या केसांमधून 131 कोटी रुपयांचं उत्पादन मिळालं. टीटीडीचं वार्षिक बजेट 3 हजार कोटी रुपयांचं असतं.

फोटो स्रोत, HK RAJASHEKAR/THE INDIA TODAY GROUP/GETTY IMAGES

तिकिट विक्रीच्या उत्पन्नाबरोबरच या केसविक्रीतूनसुद्धा टीटीडीला चांगलं उत्पन्न मिळतं, हे अधिकृत आकडेवारीतून दिसतं.

सर्वात जास्त केस विकणारं टीटीडी

तिरुमलामध्ये पूर्वी केशदानातून मिळालेल्या केसांची लिलावातून विक्री होत असे. दान केलेल्या केसांना तिरुपतीच्या भांडार केंद्रात आणले जातात. मग या केसांचा रंग आणि लांबीनुसार लिलाव केला जातो. त्यांची पाच प्रकारात विभागणी होते. लांब केसांचे जास्त पैसे मिळतात.

टीटीडीने दिलेल्या अधिकृत निवेदनात दिलेल्या माहितीनुसार, 2019 साली केसांच्या विक्रीतून त्यांना 74 कोटी रुपये मिळाले होते. डिसेंबर 2019मध्ये लिलावातून 54 हजार किलो केसांचे 37.26 कोटी रुपये मिळाले होते. आता हा लिलाव दर महिन्यातून एकदा होत असल्याचं समजतं. या लिलालाच्या आणि केस विकण्याच्या अटीबद्दल माहिती दिलेली नाही. त्यासाठी बीबीसीने टीटीडीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला मात्र त्यांनी याबाबत त्यांच्याकडे माहिती नसल्याचं सांगितलं.

केस खरेदी करणारे नंतर ते कोठे विकतात हे आपल्या कार्यक्षेत्रात येत नसल्याचं टीटीडीनं सांगितलं.

फोटो स्रोत, Getty Images

एका अधिकृत निवेदना टीटीडीचे जनसंपर्क अधिकारी टी. रवी म्हणाले, "टीटीडी ई टेंडरद्वारे तीन महिन्यातून एकदा दान केलेल्या केसांचा लिलाव करते. सर्वाधीक मोठी बोली लावणाऱ्या व्यावसायिकाकडून जीएसटी घेऊन त्याला केस दिले जातात. केस खरेदी करणाऱ्याकडे निर्यातीचा परवाना नसला तर तो या केसांचं काय करेल हे टीटीडीच्या कार्यक्षेत्रात येत नाही. भारतातील इतर मंदिरांमध्येही दान केलेले केस विकले जातात. त्याचप्रमाणे टीटीडीसुद्धा तीन महिन्यांतून एकदा ई-टेंडरद्वारे केसांची विक्री करते."

वाद काय आहे?

टीटीडीच्या अधिकाऱ्यांनी या पकडल्या गेलेल्या केसांची जबाबदारी घ्यायला पाहिजे, असं मत विरोधीपक्ष तेलगू देसम पक्षाचं आहे. बीबीसीशी बोलताना पक्षाचे नेते बंडारू सत्यनारायण मूर्ती यांनी या प्रकरणी चौकशी करुन कडक कारवाई होण्याची गरज बोलून दाखवली.

फोटो स्रोत, Getty Images

ते म्हणाले, "टीटीडीमध्ये इतकी गोपनीयता का आहे? लाखो भाविकांच्या भावनांशी संबंधित असलेल्या प्रकरणात टीटीडी आपली काहीच भूमिका नाही असं म्हणते हे लज्जास्पद आहे. ज्यांनी केस खरेदीचा ठेका घेतला होता त्यांच्याबद्दल या अधिकाऱ्यांना काहीच माहिती नाही? कोणत्याही चौकशी किंवा पडताळणीविना ते ठेका देत असत? या केसांचं विकत घेणारे लोक काय करतात हे अधिकाऱ्यांना माहिती नाही? टीटीडी प्रशासकीय समितीला तात्काळ रद्द करुन संबंधित अधिकाऱ्यांविरोधात कारवाई केली गेली पाहिजे."

गेल्या दोन वर्षांपासून टीटीडी अनेक वादांमध्ये अडकलं आहे. आता या केसांमुळे हा वाद वाढवला आहे. संबंधित व्यावसायिकाला काळ्या यादीत टाकलं जाईल असं टीटीडीनं सांगितलं आहे.

टीटीडीची तक्रार

सुरुवातीला केस कोठे विकले जातात याबद्दल आपल्याला माहिती नसतं असं टीटीडीनं सांगितलं होतं. मात्र नंतर जर आपल्याला नाव समजलं तर त्यांना ब्लॅकलिस्ट करू असं स्पष्ट केलं आहे.

तर ही तस्करी टीटीडीमार्फतच होत असल्याचा दावाही सोशल मीडियावर केला जात आहे. आंध्र प्रदेशच्या दक्षता विभागाने सर्व तक्रारींची दखल घेतलेली आहे. तिरुपती पोलिसांनी टीटीडीच्या तक्रारीवर गुन्हा दाखल केला आहे. टीटीडीने फेसबूकवर लिहिल्या जाणाऱ्या पोस्टमुळे आपली बदनामी होत असल्याचं तक्रारीत म्हटल्याचं पोलीस अधिकारी बी. शिवप्रसाद रेड्डी यांनी बीबीसीला सांगितलं.

फोटो स्रोत, Getty Images

पोलिसांनी तेलगू देसम पक्षाविरोधातही गुन्हा नोंदवला आहे. त्यामध्ये काही इतर लोकांचाही समावेश करण्यात आला आहे. आंध्र ज्योती वाहिनीद्वारेही अशा बातम्या प्रसारित झाल्याचं तक्रारीत म्हटलं आङे.

आंध्र पोलिसांच्या माहितीनुसार आंध्र ज्योतीचं नावही एफआयआऱमध्ये समाविष्ट करण्यात आलं आहे. पोलीस सांगतात, "तपासानंतर या प्रकरणात कोणाची काय भूमिका आहे हे स्पष्ट होईल." तर टीटीडीच्या उत्पन्नातील घट आणि तस्करीमधील संबंध तपासला पाहिजे, असं मत सीपीएम नेता आणि टीटीडी कंत्राटी कामगार संघटनेच्या नेत्यांनी मांडलं आहे.

एक नेते म्हणाले, "केशतस्करीच्या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. केसांच्या विक्रीतून टीटीडीला किमान 1 हजार कोटी मिळायला हवे होते. मात्र गेल्या 12 वर्षांत त्यात वाढ झालेली नाही. कमी झालेले उत्पन्न आणि केसांची तस्करी यांचा संबंध तपासला पाहिजे. सरकारने विस्तृत चौकशीची घोषणा केली पाहिजे, जेणेकरुन सर्व सत्य समोर येईल."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)