देवेंद्र फडणवीसः राज्य सरकारच्या 'निर्बंधां'मुळे अस्वस्थता, पुन्हा निर्णय घ्या #5मोठ्या बातम्या

राज्य सरकारच्या 'निर्बंधां'मुळे अस्वस्थता, पुन्हा निर्णय घ्या- देवेंद्र फडणवीस

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

देवेंद्र फडणवीस

आज विविध वर्तमानतपत्रांमध्ये आलेल्या बातम्यांचा 5 महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा

1. राज्य सरकारच्या 'निर्बंधां'मुळे अस्वस्थता, पुन्हा निर्णय घ्या- देवेंद्र फडणवीस

कोरोनाची लाट आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकारने जे कडक निर्बंध लावले आहेत त्यामुळे लहान व्यावसायिक आणि जनसामान्यांमध्ये अस्वस्थता आहे, त्यामुळे हे निर्बंध मागे घेऊ नव्याने अधिसूचना जाहीर करावी असं पत्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे. ही बातमी एबीपी माझाने प्रसिद्ध केली आहे.

मुख्यमंत्र्यांनी केलेल्या दूरध्वनीमध्ये दोन दिवसांच्या लॉकडाऊनचे बोलणे झाले होते त्यामुळे आम्ही त्याला सहमती दिली होती असं देवेंद्र फडणवीस यांनी या पत्रात लिहिलं आहे.

मात्र ज्याप्रकारे इतर पाच दिवसही लॉकडाऊनसारखे निर्बंध घातल्यामुळे जनमानसात कमालीची अस्वस्थता आहे. काही ठिकाणी लोक रस्त्यावर उतरुन विरोध करत आहेत. हे निर्बंध घालताना काही क्षेत्रांचा आजिबात विचार करण्यात आलेला नाही असं फडणवीस यांना या पत्रात म्हटलं आहे.

2. शिवसेनेला भाजपचा नवा धक्का, माजी आमदार पक्षात

शिवसेनाला भाजपने एक नवा धक्का दिला आहे. शिवसेनेच्या माजी आमदार तृप्ती सावंत यांना भाजपाने आपल्या पक्षात घेतलं आहे. सावंत यांचा वांद्रे पूर्व मतदारसंघात 2015 साली झालेल्या पोटनिवडणुकीत विजय झाला होता.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

तृप्ती सावंत (2015)

मात्र 2019 साली शिवसेनेने त्यांना तिकीट नाकारलं आणि माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना तिकीट दिलं. त्यामुळे सावंत यांनी अपक्ष निवडणूक लढवली. या निवडणुकीत काँग्रेसच्या झिशान सिद्दिकी यांना यश मिळालं. आता तृप्ती सावंत भाजपमध्ये दाखल झाल्या आहेत. हे वृत्त न्यूज18 लोकमतने दिले आहे.

3. मुंबईत तीन दिवस पुरतील एवढेच लशीचे डोस- महापौर

मुंबईमध्ये तीन दिवस लसीकरण होईल एवढ्याच लशी शिल्लक असल्याचं शहराच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

किशोरी पेडणेकर

"मुंबईत सध्या कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन्ही लसींचे मिळून 1 लाख 85 हजार डोस शिल्लक आहेत. तसेच मुंबईला मिळणारा पुढचा लसींचा साठा हा 15 एप्रिलनंतर मिळणार आहे. त्यामुळे येत्या 3 दिवसांत मुंबईत लसींचा तुटवडा निर्माण होऊ शकतो," अशी माहिती किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. ही बातमी लोकसत्ताने दिली आहे.

4. 'पुढील 4 आठवडे महत्त्वाचे' - निती आयोग

कोरोनाचे संकट अधिक गंभीर होत चालले आहे. त्यामुळे पुढचे 4 आठवडे महत्त्वाचे असल्याचं मत निती आयोग (आरोग्य)चे सदस्य आणि कोरोनाविरोधी कृती दलाचे व्ही. के. पॉल यांनी मांडले आहे. याबाबत लोकमतने सविस्तर बातमी प्रसिद्ध केली आहे.

जास्तीत जास्त चाचण्या, लसीकरण, मास्क वापरणे यावर राज्य सरकारांनी भर द्यावा असं पॉल यांनी स्पष्ट केलं आहे. सर्व वयोगटातील लोकांना लस देण्यात यावी ही मागणी फेटाळून लावली असल्याचं त्यांनी सांगितलं. शास्त्रीय दृष्टिकोनातून ते योग्य नाही असं कारण पॉल यांनी दिलं आहे. जगात कोणत्याही देशात सर्व वयोगटांसाठी लसीकरण खुलं केलं नसल्याचं त्यांनी सांगितलं.

5. शिवभोजन थाळीचं पार्सल मिळणार - छगन भुजबळ

राज्यात गरिबांना जेवण मिळावं यासाठी सुरू करण्यात आलेल्या शिवभोजन थाळीचं आता पार्सल मिळणार आहे. छगन भुजबळ यांनी ही घोषणा केल्याचं सामना वृत्तपत्रानं दिलेल्या बातमीत म्हटलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

छगन भुजबळ

'ब्रेक द चेन' या मोहिमेंतर्गत राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे शिवभोजन थाळीही पार्सल मिळणार असल्याचं अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं. ही थाळी 5 रुपयांना मिळणार आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)