सचिन वाझे: अनिल परब यांच्यावरील आरोप उद्धव ठाकरेंसाठी धोक्याची घंटा आहे का?

  • प्राजक्ता पोळ
  • बीबीसी मराठी
ठाकरे-वाझे-परब

फोटो स्रोत, facebook

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपयांची वसुली गोळा करण्याचा आरोप केला. तसं पत्र त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलं. या लेटरबॉम्बनंतर एकच खळबळ माजली.

यानंतर विरोधी पक्ष असलेल्या भाजपच्या नेत्यांनी हे प्रकरण उचलून धरलं. या प्रकरणाची सुरुवात ही अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडणं आणि मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू होण्यापासून सुरुवात झाली.

सचिन वाझे यांचे 'ऑपरेटर' सरकारमध्ये बसलेले आहेत असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला, तर अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर अजून एक मंत्री जाणार असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं.

आता सचिन वाझे यांचा दुसरा लेटरबॉम्ब ठाकरे सरकारवर पडला आहे. एनआयएच्या अटकेत असलेले सचिन वाझेंनी लिहीलेल्या पत्रात अनिल देशमुखांसह अनिल परब यांनीही खंडणी वसूलीचे आदेश दिल्याचे गंभीर आरोप केले आहेत.

अनिल परब हे उद्धव ठाकरे यांच्या जवळचे नेते मानले जातात. शिवसेनेकडून कायदेशीर भूमिका मांडण्यासाठी अनिल परब हे कायम माध्यमांमध्ये दिसतात. यानिमित्ताने अनिल परब यांच्यावर झालेले गंभीर आरोप ही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासाठी धोक्याची घंटा आहे का? हा प्रश्न उपस्थित होतो.

काय आहेत सचिन वाझेंचे आरोप?

सचिन वाझे यांनी लिहीलेलं पत्र एनआयएच्या विशेष कोर्टात सादर करण्यात आलं. या पत्रात तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह अनिल परब यांच्यावरही सचिन वाझे यांनी आरोप केले आहेत.

फोटो स्रोत, Getty Images

सचिन वाझे त्यांच्या पत्रात म्हणतात, "शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांनी भेंडी बाजार येथे सुरू असलेल्या भव्य क्लस्टर डेव्हलपमेंट प्रकल्पाची चौकशी करण्यास सांगितले. हा प्रकल्प सैफी बुर्हानी ट्रस्टतर्फे सुरू आहे. त्यांच्या ट्रस्टीजशी 50 कोटी रूपये वसूल करण्यासाठी प्राथमिक बोलणी करण्यास मला सांगितले. ही बोलणी झाल्यानंतर त्यांना वाटाघाटी करण्यासाठी माझ्यासमोर आण असेही सांगितले. हे सर्व अनिल परब यांनी मला त्यांच्या शासकीय बंगल्यावर बोलवून सांगितले."

अनिल देशमुख यांच्याबाबत आरोप करताना सचिन वाझे पत्रात म्हणतात, "मुंबईत जवळपास 1650 बार आणि रेस्टॉरंट आहेत. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मला प्रत्येकाकडून 3 ते 3.5 लाख रूपये गोळा करण्यास सांगितले.

मी त्यांना मुंबईत 200 ते 250 बार आणि रेस्टॉरंट असल्याचं म्हटलं. त्याचबरोबर मी अशी कोणतीही वसूली करणार नसल्याचं त्यांना सांगितलं. पण ज्ञानेश्वरी बंगल्याच्या बाहेर पडताना त्यांच्या पीएने मंत्र्यांचं ऐकण्याचा सल्ला दिला. मी मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना फोन करून सर्व सांगितलं. तेव्हा त्यांनी कोणतही बेकायदा काम न करण्याचा सल्ला दिला".

अनिल परब यांनी आरोप फेटाळले

सचिन वाझेंच्या पत्रानंतर अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेतली आणि स्वतःची भूमिका स्पष्ट केली.

फोटो स्रोत, facebook

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

अनिल परब म्हणाले, "माझं दैवत असलेले बाळासाहेब ठाकरे आणि माझ्यासाठी सर्वस्व असलेल्या माझ्या दोन मुली त्यांची शपथ घेऊन सांगतो की, माझ्यावर केलेले हे आरोप खोटे आहेत. मला बदनाम करण्यासाठी केलेलं हे कारस्थान आहे.

"मुख्यमंत्र्यांना बदनाम करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या माणसाला बदनाम करणं हा धोरणाचा एक भाग आहे. यासाठी मी एनआयए, सीबीआय, नार्कोटीक्स अश्या कोणत्याही चौकशीला सामोरं जाण्यास तयार आहे".

दुसरीकडे अनिल परब हे सातत्याने अर्थसंकल्पीय अधिवेशनात सचिन वाझेंची पाठराखण करताना दिसत होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सचिन वाझे काही ओसामा बिन लादेन नाही अशा शब्दात त्यांची बाजू घेत विरोधकांना उत्तर दिलं. पण वाझेंच्या या पत्रानंतर शिवसेना विरूद्ध वाझे असं चित्र दिसू लागलं आहे.

परमबीर सिंग यांच्या पत्रानंतर हे आरोप गंभीर आहेत. सरकारमधल्या मंत्र्यांनी पाय जमिनीवर आहेत का तपासणं गरजेचं आहे असं म्हणणार्‍या संजय राऊत यांनी सचिन वाझेंच्या पत्रानंतर मात्र हे महाराष्ट्राला कलंकीत करण्याचे कारस्थान असल्याचं म्हटलं.

ते म्हणतात, "जेलमधलं पत्रलेखन हा जितका संशोधनाचा तितकाच अभ्यासाचा विषय आहे असे काही पत्र लेखक इतरांना सुद्धा मिळू शकतात. एकंदरीत गलिच्छ राजकारणाने टोक गाठले आहे. महाराष्ट्राची प्रतिमा कलंकीत करण्याचे इतिहासातील सर्वात मोठे साडेतीन अतिशहाण्यांचे कारस्थान दिसते आहे."

फोटो स्रोत, Getty Images

सचिन वाझेंच्या पत्रातले आरोप हे खरे आहे की कारस्थानाचा भाग हे समोर यईल. पण आरोपांचं हे राजकारण आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत येऊन ठेपलं आहे का?

उद्धव ठाकरेंसाठी धोका?

याबाबत जेष्ठ पत्रकार संतोष प्रधान सांगतात, "ते पत्र खरंच सचिन वाझेंचं आहे का? ते त्यांनी लिहीलं आहे का? ते आरोप खरे की खोटे हा सर्व तपासाचा विषय आहे. पण आरोप प्रत्यारोपांच्या राजकारणाचाही यात संशय आल्याशिवाय राहत नाही. 2014 साली शिवसेना भाजपची सत्ता होती. तेव्हा मुंबईत महापालिकेतल्या भ्रष्टाचाराची प्रकरणं भाजप नेत्यांनी काढली. तेव्हा नागपूर महापालिकेच्या भ्रष्टाचाराची काही प्रकरणं अनिल परब यांनी माध्यमांमध्ये उघड केली होती.

"राजकारणात जी व्यक्ती वरिष्ठ नेत्यांच्या जवळची असते त्यांना टार्गेट केलं जातं. अनिल परबांची चौकशी झाली तर निश्चितपणे ही उध्दव ठाकरेंसााठी धोक्याची घंटा आहे."

जेष्ठ पत्रकार विजय चोरमारे सांगतात, "मूळ प्रकरण हे अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडणं हे आहे. त्यात सचिन वाझे दोषी आहे का? हे पाहणं गरजेचं आहे. सचिन वाझे यांचं पत्र संशयास्पद वाटतं. अनिल परब हे ठाकरे कुटुंबीयाच्या कायदेशीर बाबी बघतात. सध्या ते संघटनात्मक आणि राजकीय दोन्ही पातळ्यांवर ते शिवसेनेची बाजू भक्कमपणे मांडत असतात. अनिल परब यांच्यावर आरोप करणं म्हणजे उध्दव ठाकरेंवर आरोप करण्यासारखं आहे. त्यामुळे मोठं राजकारण यामागे असू शकतं असं वाटतं."

हेही वाचलंत का?

बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)