उद्धव ठाकरे : आज आपण लॉकडाऊनचा निर्णय घेतला नाही तर...

उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, Facebook

राज्यात 15 दिवसांचा लॉकडाऊन लावण्याबाबत सरकारचा विचार सुरू आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी उद्या (11 एप्रिल) टास्क फोर्सची बैठक बोलवली आहे. या बैठकीनंतर लॉकडाऊनबाबत निर्णय घेतला जाईल.

कोरोनाबाधितांची वाढणारी संख्या पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय नेत्यांची महत्त्वाची बैठक आज (10 एप्रिल) घेतली. या बैठकीत उपस्थित असलेल्या सूत्रांनी राज्यात पुन्हा एकदा कठोर लॉकडाऊन लावण्याचा विचार सुरू असल्याची माहिती बीबीसी मराठीला दिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीदेखील सोमवारी (12 एप्रिल) कॅबिनेटमधल्या महत्वाच्या मंत्र्यांची बैठक बोलवली आहे. या बैठकीत राज्यात लॉकडाऊन लावलं तर पुरेशी तयारी आहे का? याचा आढावा घेतला जाईल. मुबलक अन्नधान्य साठा, आरोग्य यंत्रणेची तयारी, मजुरांबाबतची व्यवस्था या गोष्टींचाही आढावा या बैठकीत घेतला जाईल.

महाराष्ट्रात कोरोनाचा झपाट्याने पसरणारा संसर्ग दिवसेंदिवस चिंतेचा विषय बनत चाललाय. कोरोनाला रोखण्याचं मोठं आव्हान राज्य सरकारसमोर आहे. त्यामुळे राज्यात संपूर्ण लॉकडाऊनची चाचपणी महाविकास आघाडी सरकारकडून केली जातेय. त्यासाठीच उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती.

या बैठकीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह आरोग्यमंत्री राजेश टोपे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, चंद्रकांत पाटील हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते.

मनसे नेते राज ठाकरे हे या बैठकीला उपस्थित राहणार होते. मात्र, त्यांच्या हातावर शस्त्रक्रिया झाल्याने ते बैठकीला उपस्थित राहिले नाहीत.

मुख्यमंत्र्यांनी काय भूमिका मांडली?

"कोरोनाचे अनर्थचक्र थांबवायचे असेल तर काही काळासाठी का होईना पण कडक निर्बंध लावावेच लागतील. आपल्याला प्रथम जीव वाचविण्याला प्राधान्य द्यावे लागेल. ही जर आरोग्याची आणीबाणी असेल तर प्राधान्य हे नागरिकांच्या आरोग्याला आणि जीवाला असले पाहिजे," अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मांडली.

कडक निर्बंध लावतांना गरीब, श्रमिक, हातावर पोट असणाऱ्या वर्गाला त्रास होऊ नये ही सर्वांचीच भूमिका आहे. त्यादृष्टीने विचार झाला पाहिजे आणि केला जाईल. पण दररोज झपाट्याने वाढणारा संसर्ग आणि रुग्णवाढ काहीही करून प्रथम रोखणे अतिशय गरजेचे आहे. सर्वानुमते एकमुखाने निर्णय घेऊन या संकटावर मात कशी करावी ते ठरविले पाहिजे. यासाठी लोकांमध्ये आपण सर्व पक्षांनी जागृती केली पाहिजे, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.

फोटो स्रोत, CMO

रुग्णसंख्या इतक्या वेगाने वाढते आहे की, आज आपण लॉकडाऊनबाबत निर्णय घेतला नाही तर उद्या आपोआपच लॉकडाऊनसारखी परिस्थिती उद्भवेल, अशी भीतीही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.

उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की, एका बाजूला जनभावना आहे पण दुसऱ्या बाजूला कोरोनाचा उद्रेक आहे. अशा परिस्थितीत ही लढाई जिंकायची असेल तर थोडी कळ तर काढावीच लागेल

विरोधी पक्ष नेत्यांनी दिलेल्या सूचनांवर निश्चितपणे गांभीर्याने विचार केला जाईल असं आश्वासनही त्यांनी दिलं.

'...तर लोक रस्त्यावर उतरतील'

निर्बंध असले पाहिजेत. पण, जनतेचा उद्रेकसुद्धा विचारात घ्यावा, असं मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीत व्यक्त केलं.

"छोटे व्यवसायिक, रिटेलर्स, केशकर्तनालय आणि इतरही व्यवसायिक यांची भावना विचारात घ्यावी लागेल. कारण, सातत्याच्या आर्थिक संकटाने ते आता खचले आहेत. त्यांच्या समस्यांचा, विविध घटकांच्या आर्थिक संकटाचा विचार आता झाला नाही आणि आपण निर्बंध लावले, तर ते लोक पुन्हा रस्त्यावर उतरतील आणि मग आपण काही करू शकणार नाही. त्यामुळे त्यांना काही तरी मदत तातडीने द्यावी लागेल," असं फडणवीस यांनी म्हटलं.

फोटो स्रोत, Getty Images

फडणवीस यांनी म्हटलं की, कोणते क्षेत्र चालू शकते आणि कोणते पर्यायांसह चालू शकते, याचे काही सूत्र ठरविले पाहिजे. जे बंदच करावे लागेल, त्यांना काय मदत देता येईल, याचा प्राधान्याने विचार करावा. राज्य म्हणून काही गोष्टी येणार्‍या काळात आपण सावरू शकतो. पण, हे घटक खचले तर ते पुन्हा कधीही बाहेर येऊ शकणार नाहीत.

कठोर पावलं उचलण्याबाबत एकमत

राजेश टोपे यांनीही पूर्वीसारखा कडक लॉकडाऊन लावला तर सामान्यांसाठी त्रासदायक ठरू शकतो असं मत मांडलं.

कठोर पावलं उचलण्याची गरज असेल, तर ती उचललीच पाहिजेत यावर सर्वांचं एकमत झाल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी दिली.

उद्या (11 एप्रिल) टास्क फोर्सच्या बैठकीनंतर अंतिम निर्णय घेतला जाईल, असंही नवाब मलिक यांनी सांगितलं.

महाराष्ट्रात लॉकडाऊन संदर्भात सर्व पक्षांचं एकमत झालं असल्याची माहिती भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी दिली.

भाजपचा लॉकडाऊनला विरोध नाही, पण वेगवेगळया घटकांसाठी काय मदत करणार याचा आराखडा ठरवावा, अशी आमची मागणी असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं.

फोटो स्रोत, TWITTER/@CHDADAPATI

या बैठकीत कोणताही निर्णय झाला नाही. अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतली, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं.

'कोरोना रोखण्यासाठी निर्बंध लावताना समतोल असावा. निर्बंध लागू करताना गरजू घटकांचाही विचार व्हावा,' अशी भूमिका अशोक चव्हाण यांनी या बैठकीत मांडली.

'कठोर लॉकडाऊन लागू होणार असेल तर बाहेरगावी असलेल्या नागरिकांना आपआपल्या घरी जाण्यासाठी म्हणून काही कालावधी देण्यात यावा. गतवर्षीप्रमाणे अचानक लॉकडाऊन लागू झाला तर त्यातून पुन्हा अनेक प्रश्न निर्माण होतील,' असं अशोक चव्हाण यांनी म्हटलं.

'सोमवारपासून दुकानं उघडा'

एकीकडे वाढत्या संसर्गाला आळा घालण्यासाठी राज्य सरकार कडकडीत लॉकडाऊनचा विचार करतंय. तर, दुसरीकडे राज्यभरातील व्यापारी संघटना दुकानं बंद ठेवण्याच्या आदेशाविरोधात रस्त्यावर उतरल्या आहेत. मुंबई, नागपूर आणि राज्यातील इतर शहरात व्यापारी संघटनांकडून आंदोलन केली जात आहेत.

दोन दिवसांपूर्वी व्यापारी संघटनांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी या विषयावर चर्चा केली होती.

फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष विरेन शाह म्हणतात, "मुख्यमंत्र्यांना आम्ही पत्र पाठवलं आहे. सोमवार ते शुक्रवार दुकानं उघडी ठेवण्यासाठी आम्ही परवानगी मागितली आहे. शनिवार-रविवारी पूर्ण लॉकडाऊन आम्हाला मान्य आहे. दुकानदार कोव्हिडच्या सर्व उपाययोजना पाळण्यासाठी तयार आहेत."

भाजप नेते या विरोध प्रदर्शनांचं नेतृत्व करताना दिसून येत आहेत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)