डॉ. के. के. अग्रवाल यांचा कोव्हिड-19 च्या लशीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही मृत्यू का झाला?

  • सरोज सिंह
  • बीबीसी प्रतिनिधी, दिल्ली
के. के. अगरवाल

फोटो स्रोत, kk agarwal facebook

पद्मश्री सन्मानाने गौरवण्यात आलेले देशातले सुप्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. के. के. अग्रवाल यांचं सोमवारी निधन झालं. त्यांना कोरोना संसर्ग झाला होता आणि दिल्लीतील एम्स हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते.

मात्र, कोरोनाविरोधातली ही लढाई ते हरले आणि सोमवारी त्यांचं निधन झालं. त्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतले होते आणि दुसरा डोस घेऊन 15 दिवसही झाले होते आणि तरीही त्यांना कोरोनाची बाधा झाली आणि त्याचा शेवट इतका दुःखद झाला.

देशात कोरोनावर सध्या कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लशी उपलब्ध आहेत. स्पुटनिक V लवकरच उपलब्ध होईल.

एकमेव उपाय - लस

चर्चा पुढे नेण्याआधी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी लसीकरण हा सध्या एकमेव प्रभावी उपाय असल्याचं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. लशीप्रती शंका निर्माण करणं, हा या रिपोर्टचा उद्देश नाही. तर लस घेतल्यानंतरही खबरदारीच्या सर्व उपायांचं पालन करणं गरजेचं आहे, हा या रिपोर्टचा हेतू आहे.

कोरोना लसीसंदर्भात केंद्र सरकार आणि लस निर्मात्यांनी आतापर्यंत दिलेल्या माहितीनुसार लसीचे दोन डोझ घेतल्यानंतर 15 दिवसांनी कोरोनाचा संसर्ग झाला तर हॉस्पिटलमध्ये जाण्याची, आयसीयू किंवा व्हेंटिलेटरची गरज भासत नाही.

फोटो स्रोत, ADRIANA DUDULEANU / EYEEM

गेल्या महिन्यापर्यंत सरकारसुद्धा मृत्यू टाळण्यासाठी लस हाच एकमेव उपाय असल्याचं सांगत होतं.

कोव्हिशिल्ड लस निर्मात्या अॅस्ट्राझेनकाच्या वेबसाईटवरही, "लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांमध्ये लस कोव्हिड-19 आजाराचा गंभीर संसर्ग, हॉस्पिटलमध्ये भर्ती होणे आणि मृत्यूपासून 100% बचाव करत असल्याचं आढळून आलं आहे", असा दावा करण्यात आला आहे.

आणि म्हणूनच लस घेतल्यानंतरही कोव्हिड संसर्ग होणारेही लसीचं समर्थन करत होते.

लस घेतल्यानंतर मृत्यू

लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही कोरोनामुळे मृत्यू झालेले डॉ. के. के. अग्रवाल एकटे नाहीत.

इंडियन मेडिकल असोसिएशनच्या आकडेवारीनुसार कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत 269 डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. मात्र, यापैकी किती डॉक्टर्सने कोरोनाचे दोन्ही डोस घेतले होते, याची माहिती देण्यात आलेली नाही.

फोटो स्रोत, Astrazenica

इथे आणखी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की केंद्र सरकारने 16 जानेवारी 2021 पासून लसीकरणाला सुरुवात केली. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्सना प्राधान्य देण्यात आलं.

त्यामुळे बहुतांश आरोग्य कर्मचाऱ्यांना आतापर्यंत लशीचे दोन्ही डोस दिले गेले असावे, असं मानूया.

केंद्र सरकारचं म्हणणं

त्यामुळे लशीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही मृत्यूची शक्यता आहे का, हा प्रश्न उपस्थित होतोय.

भारतात आतापर्यंत असे किती मृत्यू झाले आहेत? मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेतही हाच प्रश्न विचारण्यात आला.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं, "लस घेतल्यानंतर कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका खूप कमी होतो. लस इफिकसीच्या डेटावरूनही लक्षात येतं. देशात अशी प्रकरणं अगदी मोजकी आहेत. आयसीएमआरने यापूर्वी अशाप्रकारच्या संसर्गाचा डेटा जाहीर केला आहे."

पुढील पत्रकार परिषदेत याविषयी अधिक तपशीलवार माहिती देण्यात येईल, असं नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी सांगितलं.

बीबीसीने आयसीएमारची ती आकडेवारी शोधून काढली जिचा उल्लेख लव अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत केला होता. 21 एप्रिल 2021 रोजी आयसीएमआरचे महासंचालक बलराम भार्गव यांनी पत्रकार परिषद घेत लस घेतल्यानंतर होणाऱ्या संसर्गाची आकडेवारी सादर केली होती.

फोटो स्रोत, Pib

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

लसीकरणानंतरही संसर्ग होत असेल तर त्याला 'ब्रेकथ्रू इन्फेक्शन' म्हणतात.

पत्रकार परिषदेत बलराम भार्गव यांनी आकडेवारीच्या आधारावर सांगितलं होतं, "लसीकरण झालेल्या 10 हजार लोकांपैकी केवळ 2 ते 3 जणांना कोरोना संसर्ग झाल्याचं आढळून आलं आहे. कोव्हिशिल्ड लस घेणाऱ्यांच्या तुलनेत कोव्हॅक्सिन घेणाऱ्यांमध्ये अशी प्रकरणं थोडी जास्त दिसून आली आहेत. मात्र, एकंदरित विचार करता अशा प्रकरणांची संख्या खूप कमी आहे आणि त्यामुळे ती चिंतेची बाब नाही."

लशीचा पहिला डोस घेतल्यानंतर झालेला संसर्ग आणि दुसरा डोस घेतल्यानंतर झालेला संसर्ग अशा दोन्हींची एकत्रितपणे आकडेवारी देण्यात आली. आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्समध्ये ब्रेकथ्रू इन्फेक्शनचा धोका इतरांच्या तुलनेत अधिक असल्याचंही सांगण्यात आलं. मात्र, देशात लशीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर किती जणांचा मृत्यू झाला, याची आकडेवारी देण्यात आलेली नाही.

फोर्टिस हॉस्पिटलने देशातील 'ब्रेकथ्रू इन्फेक्शन'वर एक छोटासा सर्व्हे केला आहे. फोर्टिस हॉस्पिटलमधल्या 113 कर्मचाऱ्यांनी लशीचे दोन्ही डोस घेतले. यापैकी 15 कर्मचाऱ्यांना दोन्ही डोस घेतल्यानंतरही कोरोनाचा संसर्ग झाला. यापैकी केवळ एकाला हॉस्पिटलमध्ये दाखल करून उपचार द्यावे लागले.

अमेरिकेत ब्रेकथ्रू इन्फेक्शनचं प्रमाण

भारतातच ब्रेकथ्रू इन्फेक्शन होतंय, अशातला भाग नाही. 26 एप्रिल 2021 पर्यंत अमेरिकेत 95 लाख नागरिकांचं लसीकरण झालं होतं. सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) संस्थेनुसार यापैकी 9,045 लोकांना पुन्हा संसर्ग झाल्याचं आढळलं.

फोटो स्रोत, Ani

यापैकी 835 जणांना म्हणजे 9% लोकांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं. त्यातले 132 म्हणजे 1% रुग्ण गंभीर होते आणि त्यांचा मृत्यू झाला. हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेल्या एक तृतिआंश रुग्णांमध्ये कोरोनाची कुठलीच लक्षणं दिसली नाही.

उर्वरित ज्या 15 टक्के लोकांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूमागे कोव्हिड किंवा कोव्हिडसंबंधी कारण नव्हतं. याचा अर्थ त्यांचा मृत्यू इतर कारणांनी झाला.

कार्यक्षमता वि. परिणामकारकता

दिल्ली एम्सचे डॉक्टर संजय राय सांगतात, "केवळ अमेरिकाच नाही तर जगातल्या इतर देशांमध्येही लसीकरणानंतर 'ब्रेकथ्रू इन्फेक्शन' आढळून आले आहेत. त्यामुळे लसीचे दोन डोस आणि 15 दिवसांनंतर 100% मृत्यू रोखू शकतो, हे आता म्हणता येणार नाही."

फोटो स्रोत, Getty Images

मात्र, लसीच्या चाचणीत वेगळे परिणाम आणि प्रत्यक्ष वापरात वेगळे परिणाम का दिसतात?

यावर डॉ. संजय राय म्हणतात, "हा कार्यक्षमता आणि परिणामकारकता याचा परिणाम आहे. लस विषाणूपासून किती सुरक्षा देते याला लसीची एफिकसी म्हणजेच कार्यक्षमता म्हणतात. लस 100 टक्के सुरक्षा प्रदान करते, असा दावा कुणीही केलेला नाही. लसीची एफिकसी काढताना चाचण्यांमध्ये परिस्थिती नियंत्रित असते. चाचण्यांमध्ये सहभागी होणारे व्हॉलेंटिअर्स आणि लस देणारे दोघांनाही सर्व गोष्टी माहिती असतात."

"मात्र, लसीच्या परिणामकारकतेविषयी तेव्हाच कळतं जेव्हा ती मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. त्यावेळी लस देणारे आणि घेणारे यांच्यावर कुणाचंच नियंत्रण नसतं. इतकंच नाही तर चाचण्यांमध्ये सर्व परिस्थिती जशी कंट्रोल्स इन्व्हायरंमेंटमध्ये असते तशी लसीची वाहतूक, साठवण यावेळी नसते आणि याच सर्व कारणांमुळे लसीची परिणामकारकता ही लसीच्या कार्यक्षमतेपेक्षा कायमच कमी आढळते."

संभाव्य कारणं

लशीच्या दोन्ही डोसनंतर होणाऱ्या मृत्यूंवर आयसीएमआर लक्ष ठेवून असल्याचं केंद्र सरकारचं म्हणणं आहे.

देशात कोरोना संसर्गामुळे होणाऱ्या मृत्यूची आकडेवारीही आयसीएमआरकडेच संकलित होते. त्यातच ज्यांचा मृत्यू झाला त्यांनी लस घेतली होती की नाही, असा एक कॉलम असतो.

केंद्र सरकारने यावर संशोधन आणि अभ्यास करून लवकरात लवकर माहिती द्यावी, असं जाणकारांनाही वाटतं. अन्यथा लसीप्रती अविश्वास वाढून लसीकरणावर त्याचा परिणाम होऊ शकतो.

डॉ. संजय राय म्हणतात, "लसीकरणानंतरही ज्यांचा मृत्यू झाला त्यांना विषाणूच्या कोणत्या व्हॅरिएंटची लागण झाली होती? त्यांना संसर्गाआधीच सहव्याधी (इतर काही आजार) होती का? लसीकरणानंतर त्यांची दिनचर्या, इतरांना भेटणं या सगळ्या बाबी कशा होत्या? ते कुठला व्यवसाय करायचे? एक्सपोजर कुणाचं होतं?, या सर्वांची माहिती घ्यायला हवी."

कोव्हिशिल्ड लस विषाणूच्या 1.351 या व्हॅरिएंटची (याला दक्षिण आफ्रिका व्हेरिएंट म्हणूनही ओळखतात) कमी गंभीर लक्षणं असणाऱ्या रुग्णांवर परिणामकारक नसल्याचे वैज्ञानिक पुरावे आहेत, असं डॉ. राय सांगतात.

दक्षिण आफ्रिकेत 2000 तरुणांवर लसीच्या चाचण्या घेण्यात आल्या. मात्र, या चाचणीनंतर दक्षिण आफ्रिकेने अॅस्ट्राजेनकाच्या कोव्हिशिल्ड लसीचा वापर थांबवला.

भारतात असं का घडतंय, याचं कुठलंही स्पष्टीकरण सरकारने अजून दिलेलं नाही.

मात्र, याच आजाराच्या इतर रुग्णांवर उपाचर करणारे मेदांता हॉस्पिटलमधले डॉ. अरविंद कुमार यांच्या मते लसीकरणानंतरही होणाऱ्या मृत्यूंमागे तीन संभाव्य कारणं असू शकतात.

  • कदाचित लसीकरणानंतरही एखाद्याच्या शरीरात पुरेशा प्रमाणात अँटीबॉडीज तयार झाल्या नसाव्या
  • दुसरी शक्यता अशीही आहे की अँटीबॉडीज तयार झाल्या पण विषाणूचा मुकाबला करता येईल, एवढ्या त्या सक्षम नव्हत्या.
  • किंवा लस घेतल्यानंतर तयार झालेल्या अँटीबॉडीज ज्या व्हॅरिएंटचा संसर्ग झाला त्या व्हॅरिएंटवर परिणामकारक नसतील.

डॉ. अरविंद कुमार यांनी ही तीन कारणं सांगितली असली तरी संपूर्ण संशोधन होऊन निष्कर्ष येत नाही, तोवर काहीही ठोस सांगता येत नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

विषाणूपासून बचावासाठी अँटीबॉडीज एकमेव निकष नाही. त्यामुळे लसीकरणानंतर ताबडतोब अँटीबॉडी टेस्ट करावी, असंही मला सुचवायचं नसल्याचं डॉ. अरविंद कुमार सांगतात.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)