यास चक्रीवादळ: तौक्तेनंतर आता येणार यास, बंगाल ओडिशाला फटका बसण्याची शक्यता

ओडिशा, चक्रीवादळ, यास

फोटो स्रोत, ASIT KUMAR

फोटो कॅप्शन,

प्रातिनिधिक फोटो

तौक्ते चक्रीवादळानं भारताच्या पश्चिम किनारपट्टीला झोडपून काढल्यावर आता पूर्व किनारपट्टीवर चक्रीवादळाचं सावट आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून 24 मे पर्यंत त्याचं चक्रीवादळात रुपांतर होईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.

चक्रीवादळात रुपांतर झाल्यावर हे वादळ 'यास' या नावानं ओळखलं जाईल. ओमाननं दिलेलं हे नाव असून त्याचा अर्थ आहे यास्मिन किंवा चमेलीच्या प्रजातीचं एक फूल.

25 मे पर्यंत यास चक्रीवादळाची तीव्रता वाढून ते अतीतीव्र चक्रीवादळ बनेल म्हणजेच तिथे वारे ताशी 118-165 किमी वेगानं वाहण्याची शक्यता आहे.

हे वादळ 26 मेच्या संध्याकाळपर्यंत किनाऱ्याला भारताच्या मुख्य भूमीच्या पूर्व किनाऱ्याला धडकेल. बंगाल आणि उत्तर ओडिशासोबतच शेजारच्या बांगलादेशाला त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यात तौक्ते चक्रीवादळ गुजरातच्या किनाऱ्याला धडकलं होतं आणि वाटेत त्यानं केरळपासून अगदी उत्तर कोकणापर्यंत ठिकठिकाणी किनारी प्रदेशांत मोठं नुकसान केलं. किनाऱ्याला धडकल्यावरही तौक्तेचा प्रभाव राजस्थान, मध्यप्रदेशपर्यंत जाणवला होता.

फोटो स्रोत, Getty Images

त्यानंतर आठ दिवसांतच भारताला दुसऱ्या चक्रीवादळाचा सामना करावा लागणार आहे. गेल्या वर्षी बंगालमध्ये अंफन चक्रीवादळानं मोठं नुकसान केलं होतं. त्या पार्श्वभूमीवर या वादळाचा सामना करण्यासाठी तयारी केली जाते आहे. दरम्यान, नैऋत्य मोसमी वारे अंदमान आणि निकोबारमध्ये दाखल झाले असल्याचं भारतीय हवामान खात्यानं जाहीर केलं आहे. 31 मे पर्यंत मान्सून केरळमध्ये पोहोचणं अपेक्षित आहे. पाच जून पर्यंत तो गोव्यात दाखल होईल आणि पंधरा जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचेल असा अंदाज आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)