कोरोना: हिवरेबाजारचा कोरोनामुक्ती पॅटर्न आहे तरी काय?
- राहुल गायकवाड
- बीबीसी मराठीसाठी

हिवरे बाजारमधील उपाययोजना
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच देशातील 11 राज्यातील 60 जिल्हाधिकाऱ्यांशी व्हीडिओ कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून संवाद साधला. यात अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी हिवरेबाजारने कशा पद्धतीने गाव कोरोनामुक्त केले याची माहिती दिली.
अहमदनगर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचा वेगाने प्रसार होत असताना 1 मे पासून हिवरेबाजारमध्ये कोरोनाचा नवीन एकही रुग्ण आढळून आलेला नाही. त्यामुळे हिवरेबाजारचा कोरोनामुक्तीचा पॅटर्न कुठला आहे, ते जाणून घेऊयात.
हिवरेबाजारची लोकसंख्या साधारण 1700 च्या आसपास. दुसऱ्या लाटेत गावात 47 जणांना कोरोनाची लागण झाली. गेल्या लाटेत देखील काही जणांना कोरोनाची लागण झाली होती. परंतु त्यावेळी देखील गावाने कोरोनावर मात केली होती. दुसऱ्या लाटेत मार्चमध्ये पुन्हा कोरोनाचे रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली. गावाने चार पथके तयार केली.
या पथकांमार्फत घरोघरी जाऊन नागरिकांचे तापमान आणि ऑक्सिजन लेव्हल तपासण्यात आली. या सर्वेमध्ये 49 लोकं संशयित वाटली. त्यांची तातडीने अॅंटिजन टेस्ट करण्यात आली. त्यातील 20 लोक पॉझिटिव्ह आले. परंतु निगेटिव्ह आलेल्या काहींमध्ये लक्षणे होती. त्यामुळे इतर संशयितांना क्वारंटाईन करण्यात आले तसेच त्यांची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आली. त्यात ते पॉझिटिव्ह आले. 1 मे पर्यंत गावात एकूण 47 लोक कोरोना पॉझिटिव्ह आले. त्यातील दोघांच निधन झालं.
गावाने कसं रोखलं कोरोनाला ?
एखाद्यामध्ये कोरोनाची लक्षणे दिसताच त्याचे सक्तीचे विलगीकरण करण्यात आले. त्यांच्या कुटंबाची जबाबदारी पथकांकडून घेण्यात आली. वाहने तयार करुन रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
ज्यांना सौम्य लक्षणे आहेत त्यांना क्वारंटाईन करण्यात आलं. बाहेरुन गावात येणाऱ्या व्यक्तीला देखील क्वारंटाईन करुन त्याची कोरोना चाचणी करण्यात आली. या उपाययोजनांमुळे कोरोनाची साखळी तोडण्यास मदत झाली.
हिवरेबाजारमध्ये करण्यात आलेल्या उपाययोजनांबाबत उपसरपंच पोपटराव पवार सांगतात, ''गावात केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व नियमांचे पालन करण्यात आले. राज्याचं जशी माझं कुटुंब माझी जबाबदारी अशी मोहीम होती, तशीच आम्ही माझी सुरक्षितता माझी जबाबदारी ही मोहीम राबविली. कोरोनाविरुद्ध लढा देण्यासाठी स्वयंसेवकांची चार पथके तयार करण्यात आली. आरोग्य विभागाचं एक पथक मदतीला घेतलं आणि संपूर्ण गावाचा सर्वे करण्यात आला. गावाने तातडीने उपाययोजना राबविल्यामुळे एक मेपासून गावात एकही कोरोनाचा नवा रुग्ण आढळला नाही.''
हिवरे बाजार
गावात आत्तापर्यंत 149 लोकांच लसीकरण करण्यात आलं आहे. त्यातही 70 नागरिाकंना दोनही डोस देण्यात आले आहेत. लशीचे डोस देत असताना जी व्यक्ती कामानिमित्त बाहेर जात असते अशा व्यक्तीला प्राधान्य देण्यात आले आहे. गावात पुन्हा कोरोनाचा शिरकाव होऊ नये यासाठी बाहेरगावावरुन येणाऱ्या व्यक्तीला दोन दिवस क्वारंटाईन देखील केले जात आहे.
कोरोनाच्या लढाईत कोणी राजकारण केले नाही. सर्वांनी एकत्र येऊन काम केल्याने कोरोनाला अटकाव करण्यास मदत झाली, असंही पवारांनी सांगितलं.
अहमदनगरच्या ग्रामीण भागात कोरोनाचा प्रसार
एकीकडे हिवरेबाजारने कोरोनाला रोखून एक आदर्श घालून दिलेला असताना दुसरीकडे अहमदनगर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये कोरोनाचाप्रसार मोठ्या प्रमाणावर होत आहे.
एप्रिल महिन्यात आणि मे महिन्याच्या सुरुवातीला अहमदनगरच्या ग्रामीण भागामध्ये दररोज पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांची संख्या 3 हजारांच्या पुढे होती. सध्या या संख्येत घट होत असली तरी संख्या नियंत्रणात येण्यासाठी काही काळ लागणार आहे.
अॅम्ब्युलन्सची व्यवस्था
राज्याच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार 1 मे ला अहमदनगर ग्रामीणमध्ये 3192 नवीन रुग्ण आढळले होते, 7 मे रोजी ही एका दिवसाची संख्या 3357 इतकी होती तर 21 मे ला 2065 इतके नवीन कोरोनाचे रुग्ण आढळले. 21 मे या दिवशी 18479 इतके अॅक्टिव्ह रुग्ण अहमदनगर जिल्ह्यात होते.
अहमदनगरच्या ग्रामीण भागात कोरोना वाढीची कारणे कोणती ?
'लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यानंतर मोठ्याप्रमाणावर लोक घराबाहेर पडले. नागरिकांचा एकमेकांशी संपर्क वाढला. तसेच या काळात ग्रामीण भागात शेकडो लोकांच्या उपस्थितीत लग्नसोहळे आणि इतर समारंभ पार पडले. त्याचबरोबर ग्रामीण भागात कोरोनाला फारसे गांभिर्याने तसेच कोरोनाचे नियम योग्यरित्या न पाळल्यामुळे कोरोनाचा फैलाव झाल्याचे' पुढारीचे पत्रकार केदार भोपे सांगतात.
बीबीसी मराठीने अहमदनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांच्याशी संपर्क केला. क्षीरसागर म्हणाले, "नगरजिल्हा शेतीप्रधान जिल्हा आहे. मान्सूनपूर्व शेतीची कामे सुरु आहे. या कामांसाठी मजूर येत आहेत.
हिवरे बाजार गावाने कोणते पर्याय राबवले
"दुधाचा व्यवसाय देखील नगर जिल्ह्यात मोठ्याप्रमाणावर आहे. त्यामुळे या व्यवसायासाठी देखील लोकांची ये जा मोठ्याप्रमाणावर होते. इंडस्ट्रियल भागदेखील सुरु आहे. या सर्व कारणांमुळे कोरोनाचा शिरकाव नगरच्या ग्रामीण भागात झाला. त्याचबरोबर लग्न समारंभ देखील या काळात झाल्याने तसेच ग्रामपंचायत निवडणुका झाल्याने देखील कोरोना वाढल्याचे दिसून आले.''
''कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून विविध उपाययोजना राबविण्यात आल्या. जिल्ह्यात 200 हून अधिक क्वारंटाईन सुरु केली आहेत. होम आयसोलेशन बंद करुन आम्ही विलगीकरणात नेत आहोत. गरज पडली तर पोलिसांची देखील मदत घेण्यात येत आहे. टेस्टिंगचे प्रमाण वाढवण्यात आले आहे. साधारण दररोज 20 हजार चाचण्या करण्यात येत आहेत. तसेच गावांच्या कारभाऱ्यांशी व्हीडिओ कॉन्फरन्स घेऊन त्यांना उपाययोजना करण्यास सांगण्यात आले आहे. त्याचा चांगला फायदा होताना दिसत आहे '', असे देखील क्षीरसागर म्हणाले.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)