उद्धव ठाकरेंवर नारायण राणेंची टीका, 'राज्याला ड्रायव्हर नको, लोकांचं हित पाहणारा मुख्यमंत्री हवा'

ठाकरे-राणे

फोटो स्रोत, facebook

फोटो कॅप्शन,

कोकणातील पुरावरून उद्धव ठाकरे आणि नारायण राणे आमनेसामने आले आहेत.

आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटनी प्रसिद्ध केलेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...

1. राज्याला ड्रायव्हर नको, लोकांचं हित पाहणारा मुख्यमंत्री हवा - नारायण राणे

राज्यात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण आणि खेड येथील परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. यावरून केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

राज्याचे मुख्यमंत्री गाडी चालवत विठ्ठल दर्शनासाठी गेले, पण चेंबूर आणि भांडूपला मृत पावलेल्या कुटुंबीयांचं सांत्वन करायला गेले नाहीत. राज्याला ड्रायव्हर नको आहे, महाराष्ट्र शासनाकडे हजारो ड्रायव्हर आहेत, राज्याला लोकांचं हित पाहणारा मुख्यमंत्री हवा, असं राणे म्हणाले.

राज्य सरकारला कोणत्याही गोष्टीचं गांभीर्य नाही, कोकणात अतिवृष्टी झाली, लोकांचा जीव धोक्यात आला आहे, त्यांच्यासाठी तरतूद करुन ठेवायला हवी होती, याची माहिती नव्हती का? आजच पाऊस पडला का? असा सवाल नारायण राणे यांनी केला आहे. ही बातमी झी 24 तासने दिली.

2. नाशिकमधील आंतरधर्मीय विवाह अखेर संपन्न

गेल्या 2 महिन्यांपासून चर्चेत असलेला रसिका आडगावकर आणि आसिफ खान परिवारातील विवाह सोहळा अखेर गुरुवारी (22 जुलै) पार पडला.

फोटो कॅप्शन,

रसिका आडगावकर-आसिफ खान यांच्या न झालेल्या लग्नाची गोष्ट बीबीसी मराठीने दाखवली होती.

हिंदू-मुस्लीम दोन्ही पध्दतीने हा विवाह लावण्यात आला. यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समिती, प्रहार संघटना, राष्ट्र सेवा दल, छात्रभारती अशा सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते.

अनेक हिंदू संघटनांनी या विवाहाला लव्हजिहादचा रंग देण्याचा प्रयत्न करत विवाह होऊ न देण्याचा इशारा दिला होता. त्या विरोधामुळे आडगावकर-खान यांनी हा विवाह स्थगित केला होता.

रसिका आडगावकर-आसिफ खान यांच्या न झालेल्या लग्नाची गोष्ट बीबीसी मराठीने दाखवली होती.

पण अखेरीस, धर्मांध संघटनांच्या विरोधाला झुगारून अनेक सामाजिक संघटनांच्या पाठिंब्यासह हा विवाह संपन्न झाला.

या विवाह सोहळ्यात मुलाचे मामा म्हणून अंनिसचे पदाधिकारी कृष्णा चांदगुडे उभे राहिले. संविधानाला अभिप्रेत असणारी ही कृती असल्याची प्रतिक्रिया यावेळी कार्यकर्त्यांनी दिली. ही बातमी टीव्ही 9 मराठीने दिली आहे.

3. दिल्लीतील रोहिंग्यांच्या छावण्यांवर योगी सरकारचा बुलडोझर

राजधानी दिल्लीमधील मदनपूर खादर परिसरात उत्तर प्रदेश सरकारच्या मालकीच्या जागेवर रोहिंग्यांचा बेकायदेशीर कॅम्प उभारण्यात आला होता. या बांधकामाविरोधात उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने मोठी कारवाई केली आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने अनधिकृत बांधकामांविरुद्ध मोहीम हाती घेतली आहे.

उत्तर प्रदेशच्या जलसिंचन विभागाच्या मालकीच्या या जमिनीवर योगी सरकारने बुलडोझर फिरवून परिसर मोकळा केला.

उत्तर प्रदेशचे जलसिंचन मंत्री महेंद्र सिंग यांनीच यासंदर्भातील माहिती ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट करत दिलीय. दिल्ली मे फिर चला योगी का बुलडोझर असं म्हणत त्यांनी व्हिडीओ शेअर केला आहे.

एकूण 5.21 एकर जमीन ताब्यात मिळवण्यात योगी सरकारला यश आलं. ही जमीन सुमारे 150 कोटी रुपये किंमतीची असल्याचं समोर येत आहे. ही बातमी लोकसत्ताने दिली.

4. BDD चाळ पुनर्विकास कामाचं भूमिपूजन 27 जुलै रोजी

मुंबईतील BDD चाळ पुनर्निर्माण कामाचं भूमिपूजन येत्या 27 जुलै रोजी होणार असल्याची माहिती राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होईल, असं आव्हाड यांनी ट्विट करून सांगितलं.

या कार्यक्रमाची नोंद इतिहासात होईल, असंही आव्हाड यावेळी म्हणाले.

BDD चाळ पुनर्विकास कामाच्या माध्यमातून दिवंगत पोलीस कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना घरे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ही बातमी न्यूज 18 लोकमतने दिली आहे.

5. मनसे दहीहंडीला 100 टक्के नाचायला येणार - प्रवीण तरडे

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी सण-उत्सवांवरील निर्बंध कायम आहेत. पण हे निर्बंध झुगारून येत्या 31 ऑगस्ट रोजी विश्वविक्रमी दहीहंडी साजरी करणार असल्याची घोषणा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. मनसेच्या या निर्णयाला विविध प्रकारच्या प्रतिक्रिया मिळत असल्याचं दिसून येत आहे.

अभिनेते आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी तर या दहीहंडीवेळी 100 टक्के नाचायला येणार, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

विश्वविक्रमी दहीहंडी 31 ऑगस्टला होणार, अशी पोस्ट मनसे नेते अभिजित पानसे यांनी फेसबुकवर लिहिली होती. त्यावर कमेंट करताना तरडेंनी त्याला समर्थन दिलं.

पण तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर दहीहंडी किंवा गणेशोत्सव या सणांना राज्य सरकारकडून परवानगी किंवा सूट मिळेल किंवा नाही, याबाबत शंका असताना मनसेने आपला निर्णय जाहीर केल्याने आता यावरून उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. ही बातमी लोकसत्ताने दिली.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)