गडचिरोलीच्या जंगलात 'ड्रोन' कोण आणि का उडवतंय?

  • मयांक भागवत
  • बीबीसी मराठी प्रतिनिधी
ड्रोन

फोटो स्रोत, Getty Images /Richard Newstead

नक्षलवाद्यांचा गड मानल्या जाणाऱ्या गडचिरोलीच्या घनदाट जंगलात 'ड्रोन' उडताना आढळून आले आहेत. छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेवरील जंगलात ड्रोनचा वापर मोठ्या प्रमाणावर होत असल्याचं पोलिसांना आढळून आलंय.

गेल्या काही दिवसात, नक्षली कारवायांसाठी संवेदनशील मानल्या जाणाऱ्या, भागात 'ड्रोन' उडवण्याच्या 15 घटना आढळून आल्या आहेत. महाराष्ट्र पोलिसांच्या नक्षलवादविरोधी अभियानाचे प्रमुख, पोलीस उपमहानिरीक्षक (DIG) संदीप पाटील यांनी या वृत्ताला दुजोरा दिलाय.

जून महिन्यात जम्मू-काश्मीरमध्ये, भारतीय वायूसेनेच्या एअरबेसवर 'ड्रोन' हल्ला झाला होता. वायुसेनेच्या बेसवर 'ड्रोन'च्या मदतीने दोन बॉम्बस्फोट करण्यात आले होते. हा हल्ला लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांनी केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता.

गडचिरोलीच्या जंगलात 'ड्रोन' कोण उडवतंय? 'ड्रोन'चा वापर कशासाठी आणि कोणासाठी केला जातोय? याची उत्तरं आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

नक्षलींच्या हातात कसं पोहोचलं 'ड्रोन'?

नक्षल विरोधी अभियान पथकातील अधिकारी सांगतात, सप्टेंबर 2020 मध्ये गडचिरोलीत सर्वात पहिल्यांदा ड्रोन आढळून आलं. त्यानंतर, आता याचा वापर मोठ्या प्रमाणावर होताना दिसून येतोय.

बीबीसीशी बोलताना गडचिरोलीचे पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील म्हणाले, "गेल्या काही महिन्यांपासून गडचिरोलीतील, नक्षल प्रभावी क्षेत्रात 'ड्रोन'चा वापर वाढल्याचं आढळून आलंय. आत्तापर्यंत ड्रोन उडवल्याच्या 15 घटना नोंदवण्यात आल्यात."

दोन दिवसांपूर्वीच व्यंकटापूर आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये ड्रोन उडवल्याचं आढळून आल्याचं ते पुढे सांगतात.

डिजिटल युगात तंत्रज्ञानाचा वापर नक्षली मोठ्या प्रमाणावर करू लागले आहेत. नक्षल कमांडर लॅपटॉप, ई-मेल आणि पेनड्राइव्हचा वापर आपला संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी करत आहेत.

पण दहशतवादी आणि नक्षलींच्या हातात 'ड्रोन' पोहोचल्याने सुरक्षा यंत्रणांसमोर एक मोठं आव्हान उभं राहिलंय.

फोटो स्रोत, Getty Images / Richard Newstead

पोलिसांच्या माहितीनुसार, नक्षली कारवायांसाठी संवेदनशील मानल्या जाणाऱ्या एटापल्ली भागातील बुर्गी आणि गट्टा पोलीस स्टेशनच्या हद्दीतही अज्ञात ड्रोन उडताना पहायला मिळाले आहेत.

नक्षलविरोधी मोहिमेशी संलग्न अधिकारी सांगतात, "आम्ही ड्रोनवर लक्ष ठेऊन आहोत. ड्रोन किती उंचीवर उडतं, कोणत्यावेळी उडतं आणि कोणत्या ठिकाणी उडतं याचा अभ्यास करत आहोत. जेणेकरून ड्रोनविरोधात एक कायम रणनिती आखता येऊ शकेल."

तर नक्षलींचा बालेकिल्ला असलेल्या छत्तीसगडमध्येही सीआरपीएफवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात आल्याचं दिसून आलंय.

नक्षलवादी का वापरतायत 'ड्रोन'?

नक्षली कारवायांवर नियंत्रणासाठी गडचिरोली, तेलंगणा, छत्तीसगड आणि आंध्रप्रदेशमध्ये सीआरपीएफ आणि पोलिसांकडून नक्षलविरोधी अभियान सुरू असतं.

DIG संदीप पाटील पुढे म्हणाले, "नक्षलविरोधी अभियानासाठी पोलीस पार्टी बाहेर पडलीये का नाही. पोलिसांच्या किंवा सुरक्षादलांच्या आर्म आऊटपोस्ट कुठे आहेत. यावर सर्व्हेलन्ससाठी नक्षलींनी ड्रोनचा वापर सुरू केलाय."

जेणेकरून पोलिसांची तुकडी कुठे आहे, किती पोलीस आहेत याची माहिती मिळेल, आणि पोलिसांवर हल्ला करता येईल.

फोटो स्रोत, Getty Images /Yulia-Images

महाराष्ट्राच्या गडचिरोली जिल्ह्यात नक्षलींविरोधात कारवाईसाठी खास C-60 कमांडो फोर्स बनवण्यात आला आहे. "पोलीस पार्टी जंगलात ऑपरेशन करताना उंच डोंगरावर बसून पोलीस पथकावर लक्ष ठेवलं जातं," ते पुढे म्हणतात.

काही वर्षांपूर्वी बाजारात 'ड्रोन' सहज उपलब्ध होत होते. पण, 'ड्रोन'च्या वापराचा धोका लक्षात घेता, याच्या विक्रीवर निर्बंध घालण्यात आले आहेत.

मग नक्षलींकडे हे ड्रोन आले कुठून? पोलिसांना संशय आहे की नागपूर, हैद्राबादसारख्या मोठ्या शहरातून हे ड्रोन खरेदी करण्यात आले असावेत.

संदीप पाटील पुढे म्हणाले, "याचा वापर पोलिसांचं लक्ष हटवण्यासाठी देखील होत असण्याची शक्यता आहे. जेणेकरून, नक्षली कमांडर किंवा महत्त्वाच्या व्यक्तींना पळून जाण्यासाठी सुरक्षित रस्ता तयार करता येईल."

'ड्रोन' निकामी करण्यासाठी काय करतंय पोलीस दल?

'ड्रोन'चा संभाव्य धोका लक्षात घेता त्याला निक्रीय करण्यासाठी पोलिसांनी उपाययोजना करण्यास सुरूवात केलीये.

रडारच्या माध्यमातून त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जातोय. तर हाय एनर्जी सोर्स वापरून ड्रोनचं सर्किट निकामी केलं जात आहे. तर ड्रोन निकामी करण्यासाठी अॅन्टी ड्रोन गनचा वापर करण्यात येत आहे.

DIG संदीप पाटील पुढे सांगतात, "संशयास्पदरित्या ड्रोन उडताना दिसलं तर त्यावर फायरिंग केली जाते."

फोटो स्रोत, Getty Images

ते पुढे म्हणतात, "फायरिंग करताना खूप काळजी घ्यावी लागते. ड्रोन गावाच्या अत्यंत जवळ उडत असेल तर फायरिंग करण्यात मोठा धोका असतो. पण, ड्रोन पोलीस स्टेशनच्या जवळ आलं, तर, आम्ही त्यावर फायरिंग करतो."

त्याचसोबत पोलीसही त्यांच्याकडे असलेल्या ड्रोनच्या मदतीने ड्रोन उडवणारे नक्षली कुठे बसले आहेत याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतात.

गडचिरोलीतून नक्षल रिक्रूटमेंट बंद झाली?

गडचिरोली पोलिसांच्या माहितीनुसार 2019 पासून 2021 या दोन वर्षात 43 नक्षलींनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं आहे.

गेल्या काही वर्षांपासून गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांमधून नक्षलींसाठी रिक्रूटमेंट बंद झाली आहे. आता फक्त छत्तीसगडमधूनच नक्षली तयार होत असल्याचा महाराष्ट्र पोलिसांचा दावा आहे.

"कम्युनिटी पोलिसींग, रोजगार उपलब्ध करून दिल्यामुळे या दोन जिल्ह्यातून नक्षलींमध्ये भरती होत नाही. आत्तापर्यंत 1600 लोकांना वर्षभरात रोजगार उपलब्ध करून देण्यात आलाय," असं संदीप पाटील पुढे म्हणाले.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)