प्रसाद लाड- '... तर वेळ आल्यास शिवसेना भवनही फोडू' #5मोठ्याबातम्या

प्रसाद लाड, भाजप नेते

फोटो स्रोत, PrASAD LAD/FACEBOOK

आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा..

1. वेळ आल्यास शिवसेना भवनही फोडू - प्रसाद लाड

"आम्ही माहीममध्ये आलो तर त्यांना वाटतं की आम्ही शिवसेना भवन फोडायला आलो आहोत की काय. पण वेळ आली तर शिवसेना भवनही फोडू," असं वक्तव्य भाजपचे नेते प्रसाद लाड यांनी केलं आहे. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिलीय.

भाजपच्या माहीम कार्यालयाबाहेर पक्षाच्या ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी प्रसाद लाड यांनी आपल्या भाषणात हे वक्तव्य केलं.

भाजपची महाराष्ट्रातली ताकद दुप्पट झाल्याचं सांगत प्रसाद लाड पुढे म्हणाले, "भाजपची ताकद काय आहे, ही 2014 च्या विधानसभा निवडणुकीत दाखवून दिलं होतं. आता तर 'सोने पे सुहागा' झालाय. कारण नारायण राणे आणि त्यांना मानणारा मोठा गट भाजपात आलाय. त्यामुळे भाजपची ताकद दुप्पट झालीय."

मात्र, या वक्तव्यावरुन वाद झाल्यानंतर प्रसाद लाड यांनी स्पष्टीकरण दिलं. आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचं त्यांनी म्हटलंय.

याच कार्यक्रमात भाजप आमदार नितेश राणेही उपस्थित होते.

नितेश राणेंनी शिवसेनेवर टीका करताना म्हटलं, "मुंबईच्या प्रॉपर्टी कार्डवर शिवसेनेचं नाव लिहिलेलं नाही. मुंबई ही आमचीही आहे. त्यामुळे शिवसेना भवनासमोर कार्यालय उघडलं असेल तर बिघडलं कुठे?"

"बाळासाहेबांचं शिवसेना भवन आता राहिलं नाही. आताचं शिवसेना भवन हे कलेक्शन सेंटर आहे," असंही नितेश राणे म्हणाले. टीव्ही 9 मराठीनं ही बातमी दिलीय.

2. भाजप खासदार बाबुल सुप्रियो यांचा राजकारणातून संन्यास

माजी केंद्रीय मंत्री आणि पश्चिम बंगालमधील भाजपचे खासदार बाबुल सुप्रियो यांनी राजकारणातून संन्यास घेण्याचा निर्णय फेसबुक पोस्ट लिहित जाहीर केला आहे. टाइम्स ऑफ इंडियानं ही बातमी दिलीय.

फोटो स्रोत, Getty Images

"राजकारणात न राहता देखील समाजकार्य करत राहणार आहे. कुठल्याही पक्षात जाणार नाही," असं सुप्रियो यांनी म्हटलंय.

काँग्रेस, तृणमूल काँग्रेस किंवा सीपीएम यातल्या कोणत्याही पक्षानं बोलावलं नसल्याचंही सुप्रियोंनी स्पष्ट केलं.

"निवडणुकीअगोदरच पक्षाबरोबर माझे काही मतभेद होते, त्या गोष्टी निवडणुकीच्या अगोदरच सर्वांसमोर उघड झाल्या होत्या. पराभवाची जबाबदारी घेत आहे, परंतु दुसरे नेते देखील जबाबदार आहेत," असं बाबुल सुप्रियो यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

बाबुल सुप्रियो हे आपल्या खासदारकीचाही राजीनामा देणार आहेत.

3. GST भरायला नकार द्या, नरेंद्र मोदींच्या भावाचं व्यापाऱ्यांना आवाहन

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाऊ प्रल्हाद मोदी यांनी व्यापाऱ्यांना आवाहन करत म्हटलं की, "वस्तू व सेवा कर अर्थात जीएसटी भरायला नकार द्या, पंतप्रधानांसह मुख्यमंत्री तुमच्याकडे येतील."

लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.

फोटो कॅप्शन,

प्रल्हाद मोदी

मुंबईजवळील उल्हासनगर इथं व्यापाऱ्यांच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तिथं प्रल्हाद मोदी बोलत होते.

"रेफ्युजी म्हणून किती दिवस रडत बसणार आहात? एकीचं बळ दाखवा आणि आता लढायला शिका. सामूहिकरित्या जीएसटी भरायला नकार द्या, मग बघा उद्धव ठाकरेच नव्हे, तर नरेंद्र मोदीही तुमच्याकडे येतील," असं प्रल्हाद मोदी म्हणाले.

प्रल्हाद मोदी हे अखिल भारतीय रास्तभाव दुकान संघटनेचे उपाध्यक्षही आहेत.

4. OBC : केंद्रानं इंपिरिकल डेटा द्यावा, राज्य सरकारची सुप्रीम कोर्टात याचिका

ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण कायम राहावं, यासाठी सुप्रीम कोर्टानं सूचवलेला इंपिरिकल डेटा केंद्र सरकारनं द्यावा, अशी मागणी करणारी याचिका महाराष्ट्र सरकारनं सुप्रीम कोर्टात दाखल केलीय. एबीपी माझानं ही बातमी दिलीय.

फोटो स्रोत, CHAGAN BHUJBAL/TWITTER

"ओबीसींचं राजकीय आरक्षण पूर्ववत करण्यासाठी इंपिरिकल डेटा खूप गरजेचा आहे. त्यामुळे हा डेटा राज्य सरकारला प्राप्त व्हावा यासाठी आम्ही केंद्र सरकारशी पत्रव्यवहार सुद्धा केलाय. मात्र, योग्य प्रतिसाद न मिळाल्यास कोर्टात जाऊ," असं छगन भुजबळ यांनी आधीच सांगितलं होतं. त्यानुसार राज्य सरकार आता थेट सुप्रीम कोर्टात पोहोचलं आहे.

छगन भुजबळांच्या माहितीनुसार, "केंद्र शासनाने केंद्रीय ग्रामीण विकास व नागरी विकास खात्यांनी ओबीसींचा इंपिरिकल डेटा जमा केला. हे काम 2011 ते 2014 याकाळात हे काम चालले."

ओबीसींचा हा डेटा आधीच्या सरकारनंही मागितला होता, पण तेव्हाही केंद्रानं टोलवाटोलवी केल्याचं भुजबळांनी म्हटलं. मात्र, यावेळी हा डेटा न दिल्यास ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द होईल, अशी भीती भुजबळांनी व्यक्त केलीय.

5. कुठल्याही चौकशीला सामोरं जायला तयार - हिमंत बिस्वा सरमा

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांच्याविरोधात मिझोराम पोलिसांनी FIR दाखल केला आहे. यावर प्रतिक्रिया देताना हिमंत बिस्वा सरमा म्हणाले, "कुठल्याही चौकशीला आनंदानं सामोरं जाईन. पण एखाद्या तटस्थ यंत्रणेकडे चौकशीचं काम का सोपवलं गेलं नाहीय?"

हाच प्रश्न आपण मिझोरामचे मुख्यमंत्री जोरामथांगा यांच्यासमोरही उपस्थित केल्याचं हिमंत बिस्वा सरमा यांनी म्हटलं. झी न्यूजनं ही बातमी दिलीय.

फोटो स्रोत, ANI

आसाम आणि मिझोराममध्ये सध्या सीमावाद सुरू आहे. सोमवारी (26 जुलै) मिझोराम आणि आसाममधील सीमेवर झालेल्या संघर्षात आसाम पोलिसांचे पाच जवान आणि एका नागरिकाचा मृत्यू झाला होता.

याच प्रकरणी मिझोराम पोलिसांनी दाखल केलेल्या FIR मध्ये आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांचंही नाव आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)