टोकियो ऑलिम्पिक: चीनकडे पदकांचा ढीग कसा? भारताच्या हाती मात्र निराशा

 • जुबैर अहमद
 • बीबीसी हिंदी
चीनमधील लहान मुलं

फोटो स्रोत, Fang Dongxu/VCG via Getty Images

भारत आणि चीन हे शेजारील देश आहेत, दोन्ही देश क्षेत्रफळ आणि लोकसंख्येने मोठे आहेत. दोघंही वेगाने पुढे जात आहेत. पण ऑलिम्पिक स्पर्धेच्या बाबतीत मात्र चीनशी तुलना भारतीयांसाठी लाजिरवाणी ठरू शकते.

टोकियोमध्ये सध्या सुरू असलेल्या ऑलिम्पिक सामन्यांचा आतापर्यंतचा कल मागील ऑलिम्पिक सामन्यांसारखाच दिसतो, जिथे पदकांच्या संख्येत चीन पहिल्या पाच देशांमध्ये आहे तर भारत खालील पाच देशांमध्ये आहे.

रँकिंग

भारताच्या या हताश कामगिरीचे उत्तर कोण देणार? आणि चीन पुढे का आहे? बीबीसीने भारताच्या दिग्गज माजी खेळाडू पी. टी. उषा यांना यासंदर्भात विचारले.

भारत ऑलिम्पिकमध्ये चीनसारखी पदकं का आणत नाही? यावर त्या म्हणाल्या, "गेल्या 20 वर्षांपासून मी स्वत:ला हाच प्रश्न विचारत आले. पण माझ्याकडेही याचं उत्तर नाही."

आपल्या कारकिर्दीत देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये 103 पदकं जिंकणाऱ्या पी. टी. उषा पुढे म्हणतात, "मला सत्य सांगायचं आहे, माझ्या आई वडिलांनी मला नेहमीच सत्य बोलायला शिकवले आहे. पण जर मी खरं सांगितलं, तर ते एक कटू सत्य असेल, त्यामुळे मला या प्रकरणात काहीही बोलायचे नाही."

एक आघाडीवर तर दुसरा पिछाडीवर

खरं तर ते कटू सत्य काय असेल याचा अंदाज बांधणं कठीण नाही. खेळाशी संबंधित लोक सांगतात की, देशात क्रिकेट व्यतिरिक्त इतर खेळांमध्ये कोणालाही विशेष रस नाही हे वास्तव आहे.

टोकियो येथे सुरू असलेल्या ऑलिम्पिक खेळांआधी भारताने आपल्या 121 वर्षांच्या ऑलिम्पिक इतिहासात केवळ 28 पदकं जिंकली, त्यापैकी 9 सुवर्णपदकं आहेत. यापैकी आठ पदकं एकट्या हॉकीमध्ये जिंकली गेली आहेत.

भारताने प्रथम पॅरिसमध्ये 1900च्या ऑलिंपिक सामन्यांमध्ये भाग घेतला आणि दोन पदकं जिंकली. भारताप्रमाणे चीनने 1984 च्या लॉस एंजेलिस ऑलिंपिकमध्ये प्रथम भाग घेतला होता, पण टोकियोपूर्वी त्यांनी 525 हून अधिक पदकं जिंकली, ज्यात 217 सुवर्णपदकांचा समावेश होता.

टोकियोमध्ये आतापर्यंतची त्यांची कामगिरी ऑलिंपिक सुपर पॉवरसारखी आहे. त्यांनी बीजिंगमध्ये 2008 ऑलिम्पिक खेळही आयोजित केले आणि 100 पदकांसह प्रथम क्रमांक पटकावला.

मोठी लोकसंख्या असलेले देश

पाश्चिमात्य देशांनी नेहमीच ऑलिम्पिक आणि इतर आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांवर वर्चस्व राखले आहे.

एकट्या अमेरिकन जलतरणपटू मायकेल फेल्प्सने आपल्या कारकिर्दीत 28 ऑलिम्पिक पदकं जिंकली आहेत. जी टोकियोपूर्वी भारताच्या ऑलिम्पिक इतिहासात जिंकलेल्या एकूण पदकांइतकी आहेत.

खरं तर ऑलिम्पिकसंदर्भात चीन आणि भारताची परिस्थिती एकसमान नाही. चीनमध्ये सध्या केवळ पदकं जिंकणं सर्वकाही आहे की नाही याबाबत चर्चा सुरू आहे.

फोटो स्रोत, STR/AFP via Getty Images

अमेरिकेच्या सिमोन बाइल्सने तिच्या मानसिक आरोग्याला प्राधान्य दिल्यानंतर चीनमध्ये यासंदर्भातील चर्चा अधिक तीव्र झाली.

शेवटी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यामागे मुख्य कारण हे खेळांना प्रोत्साहन देणे आणि राष्ट्रिय अभिमान मिळवणे असल्याचं सांगितलं जातं.

चीनशी तुलना

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

पीटी उषाने ट्रॅक आणि फिल्डमध्ये जगभरात आपला ठसा उमटविला आहे परंतु ऑलिम्पिक पदक जिंकता न आल्याचं दु:ख त्यांना आहे.

इतक्या कमी कालावधीत चीन ऑलिम्पिक सुपर पॉवर कसा बनला? असा प्रश्न बीबीसीने त्यांना विचारला. त्यांनी याचे उत्तर इंग्रजीच्या एका शब्दानं दिलं. "डिझायर" म्हणजेच "इच्छा."

या शब्दाचा अर्थ खोल आहे असं त्या सांगतात. या एका शब्दाचे अनेक अर्थ आहेत. इच्छा, इच्छाशक्ती, हेतू, लोभ, महत्त्वाकांक्षा आणि चिकाटी.

पण कोणत्याही भारतीय खेळाडूने 'इच्छा' न बाळगता ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत भाग घेतला नसता? असाही प्रश्न उपस्थित होतो. यावर त्या म्हणतात, "चीनमध्ये सर्वांना मग ते सरकारी असो वा नसो. समाजातील सर्व घटकांमध्ये पदकं मिळवण्याची तीव्र इच्छा असते."

पीटी उषा यांची उत्कृष्ट वर्षं 80 च्या दशकात गेली. त्या सांगतात, "त्यावेळच्या दशकातील चिनी माध्यमांकडे पाहिले तर तुम्हाला असे आढळेल की, सुरुवातीच्या काळात पदकं जिंकण्याची केवळ इच्छा नव्हती, तर प्रत्यक्षात ते एक पॅशन होते, आवड होती एवढेच नाही तर देशाचा गौरव वाढवण्याची सुद्धा भावना होती.

फोटो स्रोत, EPA/RITCHIE B. TONGO

चीनची आजची पिढी आपले राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या एका व्यक्तव्याने प्रेरित होते. "खेळात राष्ट्र मजबूत बनणे हा चिनी स्वप्नाचा एक भाग आहे," राष्ट्राध्यक्ष जिनपींग यांचे हे विधान सुद्धा 'इच्छे'वर आधारित आहे.

भारतीय खेळाडूंसाठी प्रेरणा

सामान्यत: भारतातले लोक, नेते हे प्रत्येक क्षेत्रात आपली तुलना चीनशी करतात आणि चीनच्या तुलनेत आपलं अपयश झाकण्यासाठी चीनमध्ये कशी लोकशाही नाही हे कारण पुढे करताना दिसतात. परंतु अमेरिका, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियासारखे लोकशाही देशही ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेत मोठी कामगिरी बजावतात.

चीनशी एवढा स्पर्धात्मक दृष्टीकोन असूनही भारतीयांचा खेळ त्यांच्यासारखा का नाही? किंवा चीन भारतीय खेळाडूंसाठी प्रेरणा का नाही?

1970 च्या दशकात लोकसंख्या आणि अर्थव्यवस्थेच्या बाबतीत जवळपास एकाच पातळीवर असणाऱ्या दोन गरीब देशांमधला एक देश खेळात खूप आघाडीवर आहे आणि दुसरा मात्र खूप मागे?

एक पदकांसाठी अमेरिकेला आव्हान देतो आणि दुसरा उझबेकिस्तानसारख्या गरीब देशांपेक्षा मागे आहे?

चीन आणि भारत

महा सिंह राव हे भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे प्रसिद्ध कुस्ती प्रशिक्षक आणि द्रोणाचार्य पुरस्कार विजेते आहेत.

बीबीसीच्या प्रश्नांना उत्तर देताना ते म्हणतात, "चीन आणि भारताची लोकसंख्या जवळजवळ सारखीच आहे आणि आपल्या बहुतेक गोष्टी सारख्याच आहेत. चिनी खेळाडूंना वैज्ञानिक आणि वैद्यकीय विज्ञानाच्या आधारे अधिक जोमाने प्रशिक्षण दिले जाते,ज्यामुळे त्यांना पदके जिंकता आली आहेत."

व्ही. श्रीवत्स हे टाइम्स ऑफ इंडिया वृत्तपत्राचे माजी क्रीडा संपादक आहेत. अनेक ऑलिम्पिक आणि इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचा पराभव आणि अधूनमधून होणाऱ्या विजयाचे कव्हरेज करण्याचा त्यांना मोठा अनुभव आहे असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही.

बीबीसीशी बोलताना ते म्हणाले, "चीनमध्ये सर्व बंदोबस्त रेजिमेंटेड असतो आणि तो सर्वांना मान्य करावा लागतो. भारतात असं करणं कठीण आहे. त्यांच्या मते चीनमधील पालक आणि कुटुंबाला आपल्या मुलांना लहानपणापासूनच खेळाडू बनवायचे आहे, पण भारतात विशेषत: ग्रामीण भागात पालक मुलांचे शिक्षण आणि नोकरी याकडे प्राधान्याने लक्ष देतात."

चीनच्या यशाची कारणं काय आहेत?

सिंगापूरमध्ये राहणारे ज्येष्ठ चिनी पत्रकार सन शी यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं, खालील बाबींचे चीनच्या यशात योगदान आहे.

 • सरकारप्रणित सर्वसमावेशक योजना
 • लोकांचा व्यापक सहभाग
 • लक्ष्य ऑलिंपिक
 • हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर या दोन्हीचे सबलीकरण
 • कौशल्याचा शोध आणि प्रोत्साहन तंत्र
 • सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रांमधील समन्वय

सन शी म्हणतात, "प्रत्येक ऑलिम्पिक खेळांसाठी चीनमध्ये ठोस लक्ष्य निश्चित केले जाते. चीनने आपल्या खेळांच्या पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा केली आहे आणि विविध प्रकारची क्रीडा उपकरणं ते तयार करू शकतात."

भारतात चीनच्या ऑलिम्पिक यशाकडे जसे आवडीने आणि मत्सराने पाहिले जाते, तसेच चीनमध्ये भारताच्या अपयशावर बोलले जाते.

रिओ येथे 2016 मध्ये झालेल्या ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेत भारताने केवळ दोन पदकं आणि चीनने 70 पदकं जिंकली. यानंतर लगेचच 'चीन डेली'ने भारताच्या "खेळाकडे पाहण्याच्या वृत्तीला" जबाबदार धरले.

वृत्तपत्रात म्हटले, "चीन पदक गुणतालिकेत (70 पदकांसह) तिसऱ्या क्रमांकावर असला तरी देशात चर्चा ही लंडन 2012 च्या ऑलिंपिकमध्ये 88 पदकांची संख्या का सुधारू शकले नाहीत? याची होते.

"याउलट भारतात आपल्या बॅडमिंटन रौप्यपदक विजेत्या पी.व्ही.सिंधू आणि कुस्ती ब्राँझ विजेती साक्षी मलिक यांना मोठ्या प्रमाणात पैसा आणि प्रतिष्ठेचे राज्य पुरस्कार देऊन गौरवण्यात करण्यात येत आहे.

"पदकाला मुकलेल्या जिम्नॅस्ट दीपा कर्माकर आणि नेमबाज जितू राय यांचाही सन्मान करण्यात आला. ज्यांनी गेल्या दोन वर्षांत सुवर्ण आणि रौप्य अशी डझनभर पदकं जिंकली आहेत पण रिओमध्ये एकही पदक जिंकलेलं नाही," सन शी म्हणतात.

नैराश्य आणि पुन्हा 'जैसे थे'

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेला सुरुवात होऊन एका आठवड्यापेक्षा जास्त काळ लोटला आहे.

मागच्या स्पर्धेप्रमाणंच यंदाही ज्या भारतीय खेळाडुंकडून पदकांची अपेक्षा होती, ते सर्व रिकाम्या हातानं परतत आहेत. भारतानं आतापर्यंत केवळ एक पदक जिंकलं आहे. दुसरीकडं चीन मात्र पदकांचा पाऊस पाडतंय.

क्रीडा तज्ज्ञांच्या मते ऑलिम्पिक स्पर्धांनंतर भारतीय जनता या अपयशावर दुःख व्यक्त करत बसेल, माध्यमं याचं विश्लेषण करतील आणि काही दिवसांत सर्वकाही पूर्वीसारखं म्हणजे जैसे थे होईल.

क्रीडा क्षेत्राशी संबंधित लोकांशी केलेल्या चर्चेच्या आधारे भारताच्या अपयशासाठी पूर्णपणे खेळाडुंनाच दोषी ठरवता येणार नाही. त्यांच्यामते भारतीय क्रीडा क्षेत्रातील गंभीर त्रुटींबद्दल बहुतेक सर्वांना माहितीच आहे, त्यापैकी काही पुढीलप्रमाणे आहेत...

 • क्रीडा संस्कृतीचा अभाव
 • कौटुंबिक-सामाजिक भागीदारीचा अभाव
 • सरकारांकडून खेळाला प्राधान्य नाही
 • क्रीडा संघटनांत राजकारणाचा पगडा
 • पायाभूत सुविधा आणि डाएटमधील त्रुटी
 • भ्रष्टाचार आणि वंशवाद
 • गरिबी आणि खेळापेक्षा नोकरीला अधिक प्राधान्य
 • खासगी प्रायोजकत्वाची कमतरता

यापैकी काही त्रुटींवर आमीर खाननं दंगल चित्रपटात अगदी योग्य प्रकारे बोट ठेवलं आहे.

क्रीडा क्षेत्राच्या या अवस्थेसाठी जबाबदार कोण? सरकार, कुटुंब, समाज की सगळेच?

पीटी उषा यांच्या मते, यासाठी सगळेच जबाबदार आहेत, कारण खेळ हा कुणासाठीही प्राधान्याचा विषय नाही. "आपण आयटी आणि इतर क्षेत्रातील दिग्गज जन्माला घालत आहोत. अनेक क्षेत्रांमध्ये जगातील अनेक देशांच्या पुढं आहोत, मग खेळात का नाही? आपल्याकडे प्रतिभेची कमतरता नाही. पण इथं खेळ कुणाच्याही प्राधान्याचा भाग नाही."

टाइम्स ऑफ इंडियाचे माजी क्रीडा संपादक श्रीवत्स यांच्या मते, "खेळाडू तरुण असतात त्यावेळी त्यांना कुटुंब आणि समाजाकडून पाठिंबा मिळायला हवा."

व्हीडिओ कॅप्शन,

मीराबाई चानू टोकियो ऑलिम्पिक पदक जिंकून घरी परतल्यावर काय म्हणाली?

"एकदा रशियातील बास्केटबॉलशी संलग्न काही जण चांगल्या खेळाडुंच्या शोधात भारतात आले होते. त्यांनी 15-16 वर्षादरम्यान वय आणि सहा फुटापेक्षा जास्त उंची असलेल्या 126 मुलांची निवड केली. त्यांच्या प्रशिक्षणाबरोबरच त्यांच्या शिक्षणाचाही जबाबदारी स्वीकारली.

"दुसऱ्या दिवशी या मुलांच्या आई वडिलांना सह्या करण्यासाठी बोलावण्यात आलं. पण पालकांनी गोंधळ सुरू केला. शेतात काम कोण करेल, जनावरं चारायला कोण नेणार त्यांना नोकरी कोण देणार?" असे प्रश्न त्यांनी उपस्थित करायला सुरुवात केली,'' असं ते म्हणाले.

श्रीवत्स यांच्या मते, "50 वर्षांच्या कारकीर्दीत त्यांना आलेल्या अनुभवानुसार आई वडील मुलांना सरकारी नोकरीत पाठवणं पसंत करतात. पण सध्या तर सरकारी नोकरींचीही कमतरता आहे. खेळणं हा केवळ त्यांच्यासाठी मनोरंजनाचा भाग आहे."

"पण शहरात राहणारे कुटुंब त्यांच्या मुलांना क्रीडा क्षेत्रात पुढं जाण्यासाठी पूर्ण मदत करतात," असंही ते म्हणाले.

टेनिसपटू लिएंडर पेसचंही ते उदाहरण देतात. त्यांच्या वडिलांनी मुलाच्या करिअरसाठी सर्वकाही त्याग केला होता.

फोटो स्रोत, Getty Images

जगातील अनेक मोठ्या खेळाडुंच्या यशाचं श्रेय हे त्यांच्या पालकांना दिलं जातं. प्रसिद्ध टेनिसपटू आंद्रे आगासी यांनी त्यांच्या 'ओपन' नावाच्या आत्मचरित्रात यशाचं श्रेय इराणी असलेल्या त्यांच्या वडिलांना दिलं.

त्यांचे वडील रोज सकाळी त्यांना सरावासाठी घेऊन जात होते. त्यावेळी आंद्रे आगासी यांना टेनिसमध्ये रस नव्हता. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी वडील मोठ्या मुलाला आंद्रे आगासी विरोधात मुद्दाम हरायला सांगायचे. अनेक वर्षांनंतर जेव्हा त्यांनी विम्बलडनचं विजेतेपद पटकावलं, तेव्हा सर्वांत आधी वडिलांनाच फोन केला होता, असं त्यांनी पुस्तकात लिहिलं आहे.

कुस्तीचे ज्येष्ठ प्रशिक्षक महासिंह राव हे क्रीडा मंत्रालयाच्या भारतीय क्रीडा प्राधिकरण (SAI)शी संलग्न आहे.

SAI चं काम देशभरात क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्याचं आहे. या संस्थेनं देशभरात प्रचंड काम केलं आहे, पण स्थानिक पातळीवर परिस्थिती बदलेली पाहायला मिळत नाही.

देशात खेळाला प्राधान्य नसल्याचं राव हे बीबीसी हिंदीशी बोलताना अत्यंत दुःखानं म्हणाले, "भारतात खेळाला प्राधान्य दिलं जात नाही. त्यामुळंचं राज्य किंवा केंद्र सरकारही यासाठी पुरेशी आर्थिक तरतूद करत नाही. जवळपास सर्वच राज्यांमध्ये सरकारांची क्रीडा क्षेत्रासाठीची आर्थिक तरतूद प्रति व्यक्ती 10 पैसे एवढीदेखिल नाही."

क्रीडा क्षेत्र सरकारच्या प्राधान्यक्रमात तर नाहीच, पण खासगी उद्योगपती आणि कंपन्याही याला प्राधान्य देत नाहीत. श्रीवत्स हे 10 वर्ष कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीजच्या क्रीडा समितीचे सदस्य होते. त्यांनी अनेक खासगी कंपन्यांना क्रिकेटशिवाय इतर खेळांमध्येही रस घेण्याचा सल्ला दिला.

"आम्ही क्रीडा क्षेत्रावर अत्यंत गांभीर्यानं चर्चा करायचो. आम्ही उद्योगपतींना काही खेळांना दत्तक घेण्यास सांगायचो, तेव्हा ते आम्ही क्रिकेटला प्रायोजकत्व देऊ कारण त्याचा आम्हाला फायदा होईल, असं सांगायचे. एका उद्योगपतीनं मला म्हटलं होतं की, ते हॉकीत पैसे लावू इच्छित नाहीत कारण, ते पैसे हॉकीपटूंपर्यंत पोहोचत नाहीत."

यंत्रणा तयार करावी लागेल

बीबीसी हिंदीनं याबाबत अनेक क्रीडापटू आणि अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्या सर्वांनीच देशात प्रत्येक पातळीवर क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी काम करावं लागेल, असं मत व्यक्त केलं.

तसंच समाजातील सर्व वर्गांकडून याला प्राधान्य दिलं जाण्याची गरजही व्यक्त केली. यासाठी चीनसारखी एक यंत्रणा तयार करावी लागेल आणि अगदी तळापासून याच्या कामाला सुरुवात करावी लागेल, असंही मत त्या सर्वांनी मांडलं.

फोटो स्रोत, ADEK BERRY

फोटो कॅप्शन,

प्रवीण जाधव

"क्रीडा क्षेत्राला अगदी तळा-गाळापासून प्रोत्साहन देणं गरजेचं आहे," असं महासिंह राव सांगतात.

"भारतात हळू-हळू यात सुधारणा होत आहेत. त्याचाच परिणाम म्हणजे काही क्रीडापटुंना ऑलिम्पिकमध्ये पदकाची कामगिरी करता आली नसली, तरी त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय पदकं आणि किताब जिंकले आहेत," असंही ते म्हणाले.

त्यात माजी बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि प्रसिद्ध बिलियर्ड्स स्टार गीत सेठी शिवाय बुद्धीबळातील चॅम्पियन विश्वनाथन आनंद यांचा समावेश आहे.

त्यांनी एकत्रितपणे 'ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्ट' नावाचं एक प्रशिक्षण केंद्र सुरू केलं आहे. त्याठिकाणी जवळपास 10 खेळांचं प्रशिक्षण दिलं जातं. या केंद्रानं आतापर्यंत आठ ऑलिम्पिकपटू तयार केल्याचा दावा केला आहे.

पी. टी. उषा त्यांच्या केरळ राज्यातील महिला धावपटुंसाठी एक प्रशिक्षण केंद्र चालवत आहे. त्यात सध्या 20 मुली प्रशिक्षण घेत आहेत.

"राज्य सरकारनं सहकार्य करत या प्रशिक्षण केंद्रासाठी 30 वर्षांच्या लीजवर जमीन दिली आहे," असंही पीटी उषा म्हणाल्या.

राव यांच्या मते भारतात क्रीडा क्षेत्र आणि खेळाडूंचा दर्जा उंचावण्यासाठी त्यांना उच्च प्रतिचं प्रशिक्षण आणि रोजगार देणं गरजेचं आहे. वर्ष 2000 पासून चीनप्रमाणेच भारतातही खेळाडूंचं प्रशिक्षण वैज्ञानिक आणि शास्त्रीय पद्धतीनं होत असल्याचं, त्यांनी सांगितलं आहे.

"परिस्थिती दिवसेंदिवस सुधारत आहे," असं श्रीवत्स म्हणाले. मोदी सरकारनं गेल्या काही वर्षांत तीन क्रीडामंत्री बदलले. त्यांच्या मते यामुळं धोरणं लागू करण्यात अडचणी निर्माण होतात.

खासगी क्षेत्रानं पुढं यावं आणि क्रीडा क्षेत्राप्रती असलेली भूमिका पार पाडावी असा सल्लाही त्यांनी दिला.

भारतही आगामी 10-12 वर्षांमध्ये ऑलिम्पिक आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदकं मिळवायला लागेल, असा विश्सावस पीटी उषा यांनी व्यक्त केला. यामुळं अगदीच चीनशी स्पर्धा सुरू होईल असं नाही, पण संख्या निश्चितच वाढेल, असं त्या म्हणाल्या.

पुढची पीटी उषा त्यांच्याच प्रशिक्षण केंद्रातून तयार व्हावी, यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून परिश्रण घेत असल्याचंही, त्या म्हणाल्या. 

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)