मुघल-ए-आझम : अनारकलीच्या भूमिकेसाठी मधुबाला के. आसिफ यांची पहिली पसंती नव्हत्या?

  • वंदना
  • टीव्ही एडिटर, बीबीसी भारतीय भाषा
शहनाझ

फोटो स्रोत, sophia naz/ K Asif

प्रेमाच्या सुंदर भावनेत आकंठ बुडालेल्या प्रेमी युगुलाची प्रतिमा डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न केला तर मुघल-ए-आझम चित्रपटातील एक दृश्य नक्कीच डोळ्यासमोर उभं राहतं.

जगाचा विसर पडून एकमेकांत गुंग झालेले सलीम अनारकली आणि अत्यंत सहजपणे अनारकलीच्या चेहऱ्यावर पंख फिरवणारा सलीम आणि त्यानंतरचे अनारकलीच्या चेहऱ्यावरील भाव..

हा क्लासिक सीन आजही सिने चाहत्यांच्या मनात घर करून आहे.

5 ऑगस्ट 1960 रोजी प्रदर्शित झालेल्या मुघल-ए-आझम मध्ये अनारकलीची भूमिका मधुबालानं केली. पण के आसिफ यांनी आधी अनेक अभिनेत्रींमध्ये अनारकलीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला होता.

मधुबाला यांच्या पूर्वी के आसिफ यांनी या भूमिकेसाठी शहनाझ नावाच्या एका महिलेला निवडलं होतं.

शहनाझ यांचं दुहेरी आयुष्य

जर नशिबानं साथ दिली असती तर मुघल-ए-आझम मध्ये मधुबालाऐवजी अनारकली म्हणून शहनाझ असत्या.

ही कहाणी भोपाळच्या नवाबांच्या कुटुंबात जन्मलेल्या शहनाझ यांची आहे. अगदी कमी वयात मोठ्या राजकीय कुटुंबात त्यांचा विवाह झाला. त्यानंतर त्या मुंबईला (तेव्हाचे बॉम्बे) आल्या. तिथंच त्यांच्या दुहेरी जीवनाची सुरुवात झाली.

या दुहेरी जीवनापैकी एक म्हणजे त्यांचं सार्वजनिक जीवन होतं. त्यात पतीसह हाय सोसायटीत ग्लॅमरसह मोठमोठ्या सेलिब्रिटींसोबतच्या पार्टींचा समावेश होता. त्यांचं वैयक्तिक जीवन अपमान, पतीकडून शारीरिक आणि मानसिक अत्याचारांमुळं नरकासमान बनलं होतं, असं त्यांच्या मुलीनं सांगितलं होतं.

फोटो स्रोत, MUGHAL-E-AZAM

शहनाझ आता या जगात नाहीत. मात्र त्यांची मुलगी सोफी नाझ यांनी मुघल-ए-आझम पासून ते त्यांच्या खासगी जीवनातील अनेक किस्से त्यांच्या 'शहनाझ- अ ट्रॅजिक ट्रू स्टोरी ऑफ रॉयलिटी, ग्लॅमर अँड हार्टब्रेक' मध्ये मांडले आहेत.

के. आसिफ यांनी घेतली ऑडिशन

शहनाझ यांनी छंद म्हणून थिएटरमध्ये काम करायला सुरुवात केली होती. त्यांना नाटकात अनारकलीची भूमिका मिळाली.

''दिग्दर्शक आसिफ ते नाटक पाहण्यासाठी गेले होते. चित्रपटासाठी जणू याच अनारकलीचा शोध घेत होतो, असं त्यांना वाटलं. सौंदर्य, मधुर आवाज, भाषेचा लेहजा आणि उर्दू भाषेवरील प्रभूत्व सर्वकाही त्यांना हवं तसं होतं. ते आईला सेटवर घेऊन गेले.

आईकडं तिचे शाही कपडे आणि परिधान केलेले काही दागिने होते. त्यावरच त्यांनी ऑडिशन दिलं. त्यांचे जवळपास 200 फोटो काढण्यात आले होते. स्क्रीन टेस्टदरम्यान पंखाबरोबर फोटोही काढण्यात आला. दिलीप कुमारही होते,'' असं सोफिया सांगतात.

फोटो स्रोत, sophia naz/ K Asif

पण हे सुंदर स्वप्न एवढ्यापुरतंच मर्यादित राहिलं. शहनाझ नबावांच्या कुटुंबातील होत्या. त्या चित्रपटात काम करणार असल्याचं त्यांच्या भावाला समजलं तेव्हा त्यांनी आसिफ यांच्याकडून फोटो घेतले आणि फाडून टाकले.

''आईचे भाऊ म्हणाले की, आजवर त्यांच्या कुटुंबात कोणीही असं केलेलं नाही. नवाबांचं कुटुंब आणि चित्रपटक्षेत्र याचा ताळमेळच नाही, असं म्हणत त्यांनी आसिफ यांना पळवून लावलं. बिचारे के आसीफ,'' असं सोफी म्हणाल्या.

अनारकलीचा शोध सुरूच राहिला...

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

मुघल-ए-आझमच्या अनारकलीनं एकीकडे शहेनशाह अकबर आणि त्यांच्या आदेशांना आव्हान दिलं होतं. प्रत्यक्ष जीवनात मात्र शहनाझ पुरुषांनी बनवलेले कायदे आणि त्यांच्या आदेशांच्या आडकाठीमुळं अनारकली बनूच शकल्या नाहीत.

पण अनारकलीची ही कहाणी इथंच संपत नाही. कारण के आसिफ यांना त्यांच्या मुघल-ए-आझमची अनारकली शोधण्यासाठी अनेक वर्षं लागली.

आसीफ यांनी 1944 मध्ये इम्तियाज अली यांचं अनारकली नाटक वाचलं होतं. त्याचवेळी त्यांना ही कथा मोठ्या पडद्यावर उतरवण्याचा म्हणजेच मुघल-ए-आझमचा विचार आला होता.

12 ऑगस्ट 1945 मध्ये बॉम्बे टॉकिजमध्ये चित्रपटाचा मुहूर्त झाला. त्या काळातील उदयोन्मुख अभिनेत्री नर्गिस अनारकलीची भूमिका करत होत्या. अनारकलीच्या पोशाखातील त्यांचे अनेक फोटो आजही उपलब्ध आहेत.

चित्रपटाचं शुटिंग व्यवस्थितपणे सुरू होतं, पण त्याच दरम्यान देशाची फाळणी झाली. परिस्थिती अत्यंत नाजूक होती आणि चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी पाकिस्तानला जाण्याचा निर्णय घेतला.

परिणामी आसिफ यांना चित्रपट थांबवावा लागला. फाळणीनंतर सर्वकाही बदलून गेलं होतं. मात्र अनारकलीची गोष्ट मांडण्याचं जे स्वप्न आसिफ यांनी पाहिलं होतं, त्यात मात्र काहीही बदल झाला नाही.

वर्तमानपत्रात जाहिरात

1951 मध्ये चित्रपट पुन्हा सुरू झाला तेव्हा त्याच्या कथेमध्ये आणि इतरही अनेक बदल झाले होते. याबाबतचे अनेक किस्से सांगितले जातात, पण या सर्वाचा निष्कर्ष म्हणजे, नर्गिस आता अनारकली साकारणार नव्हती.

इतर जी नावं समोर आली त्यात आसिफ यांना त्यांची अनारकली गवसतच नव्हती. अखेर आसिफ यांनी नूतन यांना अनारकलीच्या भूमिकेसाठी निवडलं.

''नूतन यांच्याबरोबर सर्वकाही ठरलं होतं. पण त्यांनी अचानक नकार दिला. सर्वप्रकारे समजावूनही नूतन राजी झाल्या नाही. त्यानंतर अशी परिस्थिती आली की, आसिफ यांनी देशभरातील वृत्तपत्रांमध्ये जाहिरात छापली आणि नव्या मुलींना अनारकलीच्या भूमिकेसाठी आमंत्रित केलं. स्क्रीन मॅगझिन आणि फिल्म इंडियातही ही जाहिरात देण्यात आली होती,'' असं राजुकुमार केसवानी यांनी त्यांच्या दास्तन ए मुघल-ए-आझम मध्ये लिहिलं आहे.

केसवानी यांनी प्रचंड अभ्यास करून हे पुस्तक लिहिलं असून त्यांनी त्यात के आसिफ यांना आलेल्या अडचणी मांडल्या आहेत. ''नूतन तयार झाल्याच नाही. माझ्यापेक्षा नर्गिस किंवा मधुबालाच योग्य राहतील असा सल्ला त्यांनी दिला.

अनारकलीची कहाणी

के आसिफ यांच्या डोळ्यासमोर अनारकलीचा काल्पनिक चेहरा होता. तो चेहरा मधुबालाच्या प्रसिद्ध चेहऱ्याशी मिळता-जुळता होता. त्याच चेहऱ्यात त्यांना अनारकली दिसत होती. पण दुसऱ्या एका चित्रपटादरम्यान मधुबाला यांच्या वडिलांबरोबर त्यांना काहीसा वाईट अनुभव आला होता,'' असं केसवानी सांगतात.

फोटो स्रोत, MUGAL E AZAM TWITTER @FILM

''मधुबाला मला भेटायला आली आणि म्हणाली की, मला मुघल-ए-आझम मध्ये काम करायचं आहे. माझ्या वडिलांच्या ज्या अटी आहेत, त्या मान्य करा. कारण त्या माझ्यासाठी आहेत. त्या अटी तुमच्यासाठी नसतील,'' असं मधुबाला म्हणाल्याचं अनेक वर्षांपूर्वी 'माधुरी' या साप्ताहिकात दिलेल्या मुलाखतीत आसिफ यांनी म्हटलं होतं.

अशाप्रकारे शहनाझ, नूतन, नर्गिस आणि इतर काही नावांनंतर अखेर अनारकलीचा शोध मधुबालावर येऊन संपला आणि नंतर जे काही घडलं तो इतिहास होता, हे सर्वांनाच माहिती आहे.

अत्यंत आजारी असतानाही मधुबालानं मधुबालाचं पात्र असं काही साकारलं की, तिच्या अभिनयाचे किस्से आजही सांगितले जातात. प्रेम, निरागसता आणि दृढनिश्चय अशा विविध भावना दर्शवताना तिचं आजारपण कुणाला जाणवलंही नाही.

पण मधुबाला ही काही चित्रपटाच्या पडद्यावरील पहिली अनारकली नव्हती.

1922 मधील नाटकानंतर 1928 मध्ये 'द लव्हज ऑफ अ मुगल प्रिन्स' मध्ये अभिनेत्री सीता देवी अनारकलीच्या भूमिकेत होत्या. हा एक मूकपट होता आणि अनारकलीच्या प्रवासाची केवळ सुरुवात होती.

पण 1928 मध्येच दिग्दर्शक आर्देशीर इराणी यांनीही अनारकली नावाचा चित्रपट तयार केला होता. त्यात रूबी मार्यस यांच्या नावानं ओळखल्या जाणाऱ्या सुलोचना यांनी अनारकलीची भूमिका साकारली होती.

रूबी मार्यस बगदादी यहुदी समुदायाच्या होत्या. त्या काळातील आघाडीच्या अभिनेत्री होत्या आण त्यांना नंतर दादासाहेब फाळके पुरस्कारही मिळाला होता.

त्यांचाच मूकपट इराणी यांनी 1935 च्या आसपास थिएटरमध्येही प्रदर्शित केला होता.

त्यानंतर 40 चं दशक आलं तेव्हा अनारकलीच्या कथेवर प्रचंड प्रेम करणाऱ्या के आसिफ यांच्या प्रयत्नांना वेग आला होता.

फोटो स्रोत, sophia naz/ K Asif

के आसिफ यांना त्यांच्या अनारकलीमध्ये सौदर्य, प्रेम, धाडस, अभिमान, अदाकारी, आवाज, लहजा हे सर्वकाही अपेक्षित होतं.

अनारकलीसाठी अभिनेत्रींचा शोध शहनाझपासून सुरू झाला होता. त्यांच्यात आसिफ यांना अनेक गुण आढळले होते. मधुबालाच्याही आधी त्याच आसिफ यांना गवसल्या होत्या. पण इच्छा असूनही त्या अनारकलीची भूमिका करू शकल्या नाहीत.

मुघल-ए-आझम मध्ये अनारकली बनण्याची संधी असो किंवा विवाहानंतर अत्याचारांचा सामना करत जगलेलं प्रत्यक्ष जीवन असो, शहनाझ यांची कहाणी कधी समोर आलीच नाही. त्यांच्या मुलीनं पुस्तक लिहिल्यानंतर ही तथ्यं समोर आली.

शहनाझ आज या जगात नाहीत. पण त्यांच्या मुलीनं त्यांचं जीवन अत्यंत समर्पक शब्दांत मांडलं आहे. ''तू आयुष्यभर जी घुसमट सहन केली आहे, ती दूर करण्याचा प्रयत्न मी केला आहे. तुझी अर्धवट राहिलेली कथा मी जगासमोर आणली आहे, असं मी आईला सांगू इच्छिते,'' असं त्यांनी म्हटलं आहे.

पडद्यामागच्या अशा अनेक गोष्टी प्रत्येक अनारकलीबरोबरच कायमच्या इतिहासजमा झाल्या असतील.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)