नितीन गडकरी : तीन वर्षांत भारतात अमेरिकेच्या दर्जाचे रस्ते पाहायला मिळतील #5मोठ्याबातम्या

नितीन गडकरी

फोटो स्रोत, Getty Images

आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा :

1. तीन वर्षांत भारतात अमेरिकेच्या दर्जाचे रस्ते पाहायला मिळतील - नितीन गडकरी

तीन वर्षांत भारतात अमेरिकेच्या दर्जाचे रस्ते पाहयला मिळतील, असं वक्तव्य रस्ते व परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. टीव्ही 9 ने वृत्त दिलं आहे.

सध्या भारतात दर दिवशी 38 किमी लांबीचे रस्तेबांधणीचे काम होत आहे. यापूर्वी दिवसाला केवळ 2 किमी रस्तेबांधणी होत होती असा दावाही गडकरींनी केला. ते अहमदाबाद येथे एका कार्यक्रमात बोलत होते.

देशातील रस्तेनिर्मितीच्या कामासाठी 15 लाख कोटी रुपये खर्च करणार असल्याची घोषणा काही दिवसांपूर्वीच करण्यात आली. मेट्रो, रेल्वे, विमानतळ यांसारख्या पायाभूत सुविधांसाठी गुंतवणूक करण्याची संधी आहे असंही नितीन गडकरी यांनी म्हटलं.

त्यांनी इंधनांच्या वाढत्या किमतींमुळे इलेक्ट्रीक कारचे उत्पादन वाढवा अशी सूचना नुकतीच उत्पादकांना केली आहे.

2. पंतप्रधान नरेंद्र मोदी 'या' योजनेची घोषणा करणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी (10 ऑगस्ट) उज्वला 2.0 योजनेचा शुभारंभ करणार आहेत. यावेळी ते उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचच्या माध्यमातून चर्चा करणार आहेत. लोकमतने हे वृत्त दिलं आहे.

फोटो स्रोत, PIB

उज्ज्वला 2.0 योजनेत लाभार्थ्यांना यावेळी डिपोझिट न घेता एलपीजी कनेक्शन, पहिलं रिफिल मोफत आणि हॉटप्लेट देण्यात येणार आहे.

2021-22 अर्थसंल्पता पीएमयूवाय योजनेसाठी 1 कोटी अतिरिक्त एलपीजी कनेक्शन देण्याची तरतूद करण्यात आली आहे. गरीब कुटुंबांना एलपीजी कनेक्शन देण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

उज्ज्वला योजना 2016 मध्ये जाहीर करण्यात आली होती बीपीएल 5 कोटी कुटुंबांना एलपीजी कनेक्शन दिलं जाणार होतं.

3. 'या' जिल्ह्यांत डेल्टा प्लसच्या रुग्णसंख्येत वाढ

राज्यात डेल्टा प्लस कोरोना व्हेरियंटच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. डेल्टा पल्स रुग्णांची संख्या 21 वरुन 45 पर्यंत पोहचली आहे. महाराष्ट्र टाईम्ससने हे वृत्त दिलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images

मुंबई, ठाणे, रत्नागिरी, जळगाव आणि पुणे याठिकाणी रुग्णसंख्या अधिक असून औरंगाबाद आणि बीड जिल्ह्यात प्रत्येकी एक रुग्ण आहे.

या पार्श्वभूमीवर प्रत्येक जिल्ह्यातून 100 नमुने घेतले जात आहेत. प्रयोगशाळेत जिनोमिक सिक्वेंसिक माध्यमातून तपासणी करण्यात येणार आहे.

डेल्टा प्लसची लागण झालेल्या रुग्णांच्या प्रवासाची माहिती घेतली जात असून त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींचा शोध घेतला जात आहे असंही राजेश टोपे म्हणाले.

4. 'झुकती है दुनिया, झुकानेवाला चाहिये' - नितेश राणे

"झुकती है दुनिया, झुकानेवाला चाहिये," असं म्हणत भाजपचे आमदार नितेश राणे यांनी असा टोला ठाकरे सरकारला लगावला आहे.

फोटो स्रोत, FACEBOOK

रविवारी (8 ऑगस्ट) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना प्रतिबंधक लशीचे दोन डोस घेतलेल्यांसाठी रेल्वे लोकल सुरू करणार असल्याचं जाहीर केलं. या घोषणेनंतर नितेश राणे यांनी ट्वीट केलं. लोकमतने हे वृत्त दिलं आहे.

ते म्हणाले, "ये लगा सिक्सर. भाजपचे मोठे यश. लोकल ट्रेन 15 ऑगस्टपासून सुरू होणार. झुकती है दुनिया, झुकानेवाला चाहीये."

भाजपने 6 ऑगस्ट रोजी मुंबईतील विविध रेल्वे स्थानकांवर लोकल रेल्वे सुरू करण्यासाठी आंदोलन केलं होतं. भाजपचे नेते, कार्यकर्त्यांनी यावेळी रेल्वेतून प्रवास केला.

5. मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारची भूमिका काय?

मराठा आरक्षणासाठी केंद्र सरकारने 50% मर्यादेची अट शिथिल करावी अशी मागणी महाविकास आघाडी सरकारने केली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत नुकतीच एक बैठक पार पडली. एबीपी माझाने हे वृत्त दिलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images

या बैठकीला राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खरगे, सार्वजनिक बांधकाम मंत्री, मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत, राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार सुप्रिया सुळे, वरिष्ठ काँग्रेस नेते खा. पी. चिदंबरम, काँग्रेसचे राज्यसभा खासदार डॉ. अभिषेक मनू सिंघवी, खासदार संजय राऊत, मुख्य सचिव सिताराम कुंटे, महाराष्ट्राचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोनी उपस्थित होते.

आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास निश्चित करण्याचे अधिकार राज्य सरकारांना देण्यासंदर्भातील विधेयक नुकतेच केंद्रीय मंत्रिमंडळात मंजूर करण्यात आले. केंद्राने 50% आरक्षण मर्यादेची अट शिथिल करण्याची मागणी ठाकरे सरकारने केली आहे.

यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी 8 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. तसंच 5 जुलै रोजी या मागणीसाठी शिफारस करणारा ठराव विधानसभा आणि विधानपरिषदेत मंजूर करण्यात आला होता.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)