मानसिक आरोग्य : घरातील व्यक्तीला 'मानसिक आजार' झाला आहे हे कसं ओळखाल? त्याला कसा आधार द्याल?

  • ओंकार करंबेळकर
  • बीबीसी मराठी प्रतिनिधी
मानसिक आरोग्यः घरातील व्यक्तीला 'मानसिक आजार' झाला आहे हे कसं ओळखाल? त्याला कसा आधार द्याल?

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

प्रातिनिधिक छायाचित्र

55 वर्षांच्या शांताबाई. घरात सगळ्या गोष्टी चांगल्या घडत आहेत. नवऱ्याला चांगला पगार, मुलांचं शिक्षण पूर्ण होऊन ती योग्य मार्गाला लागलेली वगैरे वगैरे.

पण गेले काही दिवस बाईंचं काही कामात लक्ष लागत नाहीये. काही करावसं वाटत नाहीये. रोजच्या आयुष्यात आनंद वाटेनासा झालाय, झोप नं होणं, पोट साफ न होणं अशा तक्रारीही वाढल्या आहेत.

त्यांच्या घरच्या लोकांच्या हे लक्षात आलंच. काही लोकांना वाटलं हे सगळं त्या लक्ष वेधून घ्यायला करत आहेत. तर काही जण त्यांना थेट तुला 'सुख बोचतंय' असं म्हणून मोकळे झाले.

नाही म्हणायला त्यांच्या नवऱ्याला हे काहीतरी वेगळं आहे हे जाणवलं पण खरंच तसं काही असलं तर आपल्यावर जबाबदारी येईल असं वाटून त्यांनी 'सगळं ठीक होईल', असं सांगून शांताबाईंना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.

पण आपल्याला काहीतरी वेगळं होतंय, आपल्या 'मनाला दुखापत' झाली आहे हे शांताबाईंच्याही लक्षात आलं नाही आणि त्यांच्या कुटुंबीयांनाही ते समजलं नाही.

शांताबाई हे काल्पनिक उदाहरण असलं तरी अशा प्रकारची उदाहरणं अनेक घरांमध्ये दिसत असतात.

शरीराला इजा होते, आजार होतो तसा मनालाही आजार होतो हे बहुतांशवेळा लोकांना माहितीही नसतं. घरातल्या सर्व वयोगटातल्या लोकांना शारीरिक आजाराप्रमाणे मानसिक त्रासालाही सामोरं जावं लागत असतं.

फोटो स्रोत, Getty Images

अर्थात आपल्या रोजच्या आयुष्यात थोडे चढ-उतार, चांगल्या वाईट भावना मनात येतातच. पण आपल्याला आधाराची गरज कधी आहे हे ओळखण्यासाठी मात्र काही मार्गांचा वापर केला पाहिजे. त्याबद्दल येथे माहिती घेऊ-

मानसिक आजारांसंदर्भातील गैरसमजांमुळे यावर विचार करण्याचं दार नेहमी बंद ठेवलं जातं. यावर न बोललेलंच चांगलं असं म्हणून तो विचार दूर ढकलला जातो. पण दुर्दैवाने असा विचार करणाऱ्या व्यक्तीचा किंवा त्याच्या कुटुंबातील व्यक्तीचा मानसिक आजार कमी होण्याऐवजी वाढीला लागतो.

कुटुंबातल्या व्यक्तीच्या 'मनाला दुखापत' झालीय हे कसं ओळखायचं?

आपल्या सर्वांच्या आयुष्यात एका मर्यादेपर्यंत ताण आणि प्रश्न असतातच परंतु ते एका मर्यादेच्या पलिकडे जात असतील त्याचा आपल्या आयुष्यावर परिणाम होत असेल तर त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

आपल्या मनात सुरू असलेली खदखद मानसोपचारतज्ज्ञ किंवा समुपदेशकांना सांगण्यात कोणताच कमीपणा नसतो.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

मनाला अस्वस्थ वाटत असेल तर मदत घेण्यात काहीच कमीपणा मानू नये.

प्रत्येकवेळेस डॉक्टर आपल्याला औषधेच देतात असे नाही. अनेक समस्या सुरुवातीच्या पातळीवर असतील तर समुपदेशन आणि वर्तनदोष सुधारून त्यांच्यावर मात करता येते.

मानसिक आरोग्यातील चढ-उतार वेळीच लक्षात घेऊन मदत घेतली तर बरं होण्यासाठी फारच कमी वेळ लागतो.

मदत घेण्यास टाळाटाळ केल्यामुळे मनस्थितीमध्ये आणखी नकारात्मक, खोलवर बदल घडू शकतात. अशावेळेस मनस्थिती नीट होण्यासाठी प्रयत्न आणि वेळही भरपूर लागू शकतो.

फोटो स्रोत, Getty Images

त्यामुळे वेळेवर उपचारासांठी मदतीचं दार ठोठावणं हे सर्वांत चांगलं. किंबहुना उत्तम मानसिक आरोग्यासाठी टाकलेलं ते सजगतेचं पहिलं पाऊल म्हणता येईल.

कुटुंबीयांमध्ये एखाद्या व्यक्तीला मानसिक आधाराची गरज आहे, त्याला काही त्रास होत आहे हे ओळखण्यासाठी त्याच्या दिनक्रमाकडे लक्ष द्यावं, असं मत मनोविकारतज्ज्ञ डॉ. राजेंद्र बर्वे सांगतात.

रोजचं घरकाम, घरातील कामासाठी बाहेर जाणं, अंघोळ-शौच अशा रोजच्या गोष्टी करताना अडथळा येत असेल किंवा एखाद्या व्यक्तीचं हा क्रम बिघडला असेल तर त्याची नोंद घेता येईल असं डॉ. बर्वे सांगतात.

फोटो स्रोत, Getty Images

बीबीसी मराठीशी बोलताना डॉ. बर्वे म्हणाले, "केवळ या दिनक्रमात अडथळा येणं इतकंच नव्हे तर त्यापुढे जाऊनही निरीक्षण करण्याची गरज आहे. त्या व्यक्तीला रोजच्या कामातला आनंद गेल्यासारखं वाटत आहे का? त्याच्या हालचाली फक्त यंत्रिक झाल्या आहेत का? भूक, शौच, झोप, मैथुन या क्रिया विस्कळीत झाल्या आहेत का? याचं निरीक्षण करता येईल असं ते सांगतात."

संवाद कसा साधायचा?

एकदा कुटुंबातील व्यक्तीला काही त्रास आहे हे समजलं की त्याला काही प्रश्न विचारता येतील. हे प्रश्नसुद्धा काळजीने, प्रेमाने विचारायचे असतात.

या त्रासामागे काही कारण आहे का? होणारा त्रास किती तीव्रतेचा आहे? तो सारखा होत राहातो की कधीतरी डोकं वर काढतो? तो कितीवेळा होतो असे प्रश्न विचारता येतील. अशा प्रश्नांमधून ढोबळ अंदाज येऊ शकतो.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

काउन्सिलिंगमध्ये नकारात्मक विचार शोधण्यास मदत केली जाते.

मात्र या विचारण्यात आधार देण्याची, त्या व्यक्तीच्या वेदना जाणून घेण्याची भावना असली पाहिजे. काय धाड भरलीय? कशाला तोंड पाडून बसला आहेस? अशाप्रकारे हा संवाद होऊ नये.

बहुतांशवेळा या प्रश्नांना नकारात्मक उत्तर येण्याची शक्यता असते. 'काही नाही सगळं ठीक आहे', असं उत्तर दिलं जातं. परंतु अशावेळेस कुटुंबीयांनी थोडं थांबून त्या व्यक्तीकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे.

आपल्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या मनात एखादी नैराश्य, चिंता, खंत, राग, द्वेष यासारखी एखादी नकारात्मक भावना वारंवार येत असेल. ती भावना चिवटपणे मनातच राहात असेल तर त्यावर विचार केला पाहिजे.

या विचाराचा आपल्या जीवनात अडथळा येत आहे असं दिसल्यास त्याकडे लक्ष दिलं पाहिजे. या नकारात्मक विचारांचा वर्तनावरही परिणाम दिसून येत असतो.

गैरसमजांकडे दुर्लक्ष कसं करायचं?

साधारणपणे मनाच्या कोणत्याही आजाराला वेड लागणं, किंवा डिप्रेशन अशाप्रकारची लेबलं लावली जातात.

वास्तविक ओव्हरथिंकिंग, अँग्झायटी, ओसीडी, डिप्रेशन वगैरे त्रासाच्या असंख्य प्रकारच्या टप्प्यावर माणसं असू शकतात.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

तुमच्या मनाची स्थिती नक्की कशी आहे? तुमच्यावर कोणते उपचार करायचे हे डॉक्टरांना ठरवू द्या.

समुपदेशक, मनोविकारतज्ज्ञांकडे जाणं म्हणजे वेड लागलेलं असणं अशी समजूत काढून टाकणं गरजेचं आहे. आपल्या कुटुंबीयाच्या आरोग्यासाठी तशी चर्चाही टाळणं आवश्यक आहे.

डॉक्टरांकडे गेलं की ते 'शॉक' देतात वगैरे... शॉक ट्रिटमेंट असा शब्दप्रयोग केला जात असला तरी त्या उपचाराचं खरं नाव इलेक्ट्रो कनक्लुझिव्ह थेरपी असं आहे. त्याला ECT असंही म्हटलं जातं.

हे उपचार प्रत्येक रुग्णावर केले जात नाहीत. ज्या रुग्णावर ते केले जातात ते रुग्णही व्यवस्थित चालत घरी जातात. त्यामुळे काय उपचार करायचे हे डॉक्टरांवर सोपवलं पाहिजे. ही उपचारपद्धती सरसकट वापरली जात नाही.

पुढं काय करायचं?

मनाला होणाऱ्या त्रासाची जाणिव झाल्यावर आपण स्वतःच त्या गोष्टीचं निदान करू नये. आपल्याला किंवा कुटुंबातील व्यक्तीला काय झालं आहे हे ठरवण्याची जबाबदारी आपण समुपदेशक, मानसोपचारतज्ज्ञ, मनोविकारतज्ज्ञ यांच्याकडे सोपवावी.

गूगलवर लक्षणं टाइप करुन निदान करण्यात तसंच परस्पर औषधं घेण्यात मोठा धोका असतो.

फोटो स्रोत, Getty Images

डॉ. राजेंद्र बर्वे सांगतात, "गूगलवर जाऊन कधीही आपण औषधं शोधण्याचा प्रयत्न करू नये. डॉक्टर तुमचे सर्व प्रश्न ऐकून मग उपचारपद्धती ठरवत असतात. कोणाला समुपदेशनाद्वारे, कोणाला औषधाद्वारे बरं करायचं किंवा दोन्हीचा वापर करायचा हे सर्व माहिती घेतल्यावरच ठरवता येतं. गूगलवर मात्र हे शक्य नाही."

कुटुंबीय आणि आधारगट

मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी कोणत्याही रुग्णाच्या किंवा व्यक्तीच्या प्रवासात तिच्या कुटुंबीयांचा मोठा वाटा असतो, असं मत मनोविकास आणि मैत्र संवादक (आयपीएच) वैदेही भिडे नोंदवतात.

बीबीसी मराठीशी बोलताना वैदेही भिडे म्हणाल्या, "एखाद्या व्यक्तीच्या मानसिक आरोग्याला सुधारण्यासाठी संवादक, समुपदेशक, डॉक्टरांची मदत घेण्यास काहीच हरकत नसते. औषधं घ्यावी लागतील, त्यांची सवय लागते वगैरे गैरसमज कुटुंबीयांनी दूर केले पाहिजेत. उपचार स्वतःच ठरवण्याऐवजी ते मनोविकारतज्ज्ञांना ठरवू द्यावेत. व्यक्तीशी बोलून, काही चाचण्या करून कोणते उपाय करायचे हे डॉक्टर ठरवू शकतात."

फोटो स्रोत, Getty Images

कुटुंबीयांप्रमाणे आधारगटांचाही उपयोग चांगल्या पद्धतीने होतो असं वैदेही भिडे सांगतात. "आपल्यासारखेच अनेक रुग्ण आहेत, त्यांनी आजारावर कशी मात केली याचे अनुभव लोकांना आधारगटात समजतात. 'असा त्रास होणारा' मी एकटाच नाही याचीही जाणिव होते तसंच आपल्या अनुभवाच्या मदतीने इतरांनाही आधार देण्याचा आनंद मिळतो", असं भिडे यांनी सांगितलं.

काय टाळायचं?

आपल्याला किंवा आपल्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला मानसिक आजार झाल्यास काही गोष्टी आवर्जून टाळण्याची आवश्यकता आहे. त्यातली सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोष देण्याची पद्धत टाळली पाहिजे.

आपलं नशीबच वाईट आहे, पत्रिकेतच हा योग होता, मागच्या जन्मीचं पाप होतं, वंशपरंपरागत त्रास भोगावाच लागणार वगैरे चर्चा घरामध्ये करू नयेत. रुग्णाला आधार देण्याचा प्रयत्न करा. आम्ही तुझ्याबरोबर आहोत, तुला जो त्रास होतोय तो आम्हाला समजतोय याची जाणिव करून द्या.

तो (रुग्ण) तुम्हाला त्रास देत नसून त्याला स्वतःला त्रास होतोय हे लक्षात घेतलं पाहिजे. रुग्ण हेतुपुरस्सर काहीही करत नसून त्याला होणाऱ्या त्रासामुळे तो थोडासा वेगळा वागतोय हे समजून घेतलं पाहिजे. त्याला प्रश्न विचारुन हैराण करू नका.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)