संजय राऊत: '8 महिने झाले, पाळणा कधी हलणार, राज्यपाल महोदय' #5मोठ्याबातम्या

राज्यपाल, सामना, महाविकास आघाडी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा

1. राज्यपाल महोदय, आठवा महिना लागला- सामनाची टीका

भगतसिंह कोश्यारी यांच्याविषयी महाराष्ट्राच्या मनात व्यक्तिगत कटुता असायचे कारण नाही मात्र राज्यपाल म्हणून त्यांचे वर्तन घटनाविरोधी आणि राजकीय बोटचेपेपणाचं आहे.

राज्यपाल त्यांच्या पितृपक्षाच्या दबावाखाली काम करत असतील तर पंतप्रधान मोदी यांनी घटनेची घसरगुंडी रोखायला हवी. राजभवनांचा वापर करून सत्तापरिवर्तन वगैरे होत नाही.

'सामनाच्या अग्रलेखातून' राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीका करण्यात आली आहे.

अफगाणिस्तानच्या अफगाण घनी यांच्याप्रमाणे कोणी सरेंडरही होत नाही हे महाराष्ट्र आणि बंगालमध्ये दिसून आलं. येथे जातीचेच आहेत हे येरागबाळ्यांनी समजून जावे. राज्यपालांनी 80वर्षी सिंहगड सर केला याचे कौतुक कुणाला नाही पण लोकशाही आणि घटनेचा किल्ला ते पाडू पाहत आहेत.

राज्यपाल पदाचे अवमूल्यन आणि घसरगुंडी राज्यपाल साहेबांनी करून ठेवली आहे. बारा आमदारांच्या नियुक्त्या फक्त राजकीय कारणांसाठीच रखडवून ठेवल्या आहेत हे राजभवनातलं शेंबडं पोरही सांगेल. मुंबई उच्च न्यायालयेही सौम्य शब्दात टोपी उडवून विचारले की, निर्णयासाठी आठ महिने घेणं हे जरा जास्तच झालं.

राज्यपाल हे केंद्राचे पॉलिटिकल एजंट म्हणजे गृहखात्याचे वतनदार आहेत ही सोपी व्याख्या आम्ही सांगतो. सरकारने बारा आमदारांच्या नावाची शिफारस करून आठ महिने झाले. आठवा महिना लागला.

राज्यपालांच्या निर्णयाचा पाळणा नक्की कितव्या महिन्यात हलणार आहे? हे राजभवनातील सुईणीने स्पष्ट करावं. राज्यपालांनी घटनेची चौकट मोडली तर त्यांची इज्जत राहणार नाही.

2. पुणेकरांनी उभारलं पंतप्रधान मोदींचं मंदिर

पुण्याजवळच्या औंध इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मंदिर उभारण्यात आलं आहे. मोदींच्या कार्यावर आधारित काव्याची रचना करून तीही मोठ्या फलकावर लावण्यात आली आहे.

औंध गावातील अॅड. मधुकर मुसळे यांच्या संकल्पनेतून मयुर मुंडे आणि अन्य कार्यकर्त्यांनी मोदी यांच्या कार्याचा गौरव म्हणून हे मंदिर उभारलं आहे. 'लोकमत'ने ही बातमी दिली आहे.

या मंदिरात मोदींचा अर्धाकृती पुतळा आहे. नरेंद्र मोदी यांचं देशाप्रती योगदान मोठं आहे. त्यांनी घेतलेल्या निर्णयांमुळे जागतिक पातळीवर भारताला चांगले स्थान प्राप्त झाले आहे. या आदर्श व्यक्तिमत्वाचे विचार जोपासले जावेत यासाठी मंदिराची उभारणी केल्याचं मधुकर मुसळे यांनी सांगितलं.

3. चंद्रकांतदादा तुमचं जेवढं वय तेवढी पवारांची संसदीय कारकीर्द- रुपाली चाकणकर

"चंद्रकांत दादा आपल जितकं वय आहे तितक आदरणीय साहेबांची संसदीय कारकीर्द आहे," असं राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली चाकणकर यांनी चंद्रकांतदादांना म्हटलं आहे.

राज्यपाल यांचं वय झालं म्हणतात, तर पवार साहेब यांचं वय कुठे कमी आहे? असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यश्र चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना काल केला होता. 'एबीपी माझा'ने ही बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, SHARAD PAWAR/FACEBOOK

फोटो कॅप्शन,

शरद पवार

चंद्रकांत पाटील प्रदेशाध्यक्ष आहेत. चार दिवस दिल्लीत थांबूनही अमित शाह यांनी त्यांना भेट नाकारली. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी जरा आत्मचिंतन करावे, असा सल्ला रूपाली चाकणकर यांनी दिला.

"राज्यपाल हे भाजपचे पदाधिकारी नाहीत. त्यामुळे त्यांची बाजू घेण्याचा प्रश्नच नाही. गेल्या दीड वर्षापासून राज्यपाल नियुक्त बारा आमदारांची निवड रखडली आहे. ही नियुक्ती का रखडली आहे हे महाराष्ट्र पाहत आहे. राज्य सरकार आपल्या अधिकारात काही नावं राज्यपालांना देतात. राजकीय शिष्टाचारानुसार राज्यपाल ही नावं मान्य करतात. पण राज्यात आपली सत्ता नाही म्हणून राज्यपालांना हाताशी धरून अडवणूक करण्याचा कार्यक्रम केंद्राकडून सुरू आहे", असंही चाकणकर यांनी म्हटलं आहे.

4. लशीचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सीरमने घेतला हा निर्णय

भारतात सर्वाधिक लसींचा पुरवठा करणाऱ्या सीरम इन्स्टिट्युटनं लसींचा हाच पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. देशातील आघाडीच्या शॉट कायशा या कंपनीची 50 टक्के मालकी अर्थात 50 टक्के शेअर्स सिरम इन्स्टिट्युटनं खरेदी केले आहेत.

फोटो कॅप्शन,

अदर पूनावाला

सीरम इन्स्टिट्युटचे सीईओ अदार पूनावाला यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर यासंदर्भातली माहिती दिली असून दोन्ही कंपन्यांकडून जारी करण्यात आलेलं पत्रकच अदर पूनावाला यांनी आपल्या ट्वीटसोबत शेअर केलं आहे. 'लोकसत्ता'ने ही बातमी दिली आहे.

देशातील लस उत्पादक उद्योगांसाठी कच्च्या मालाच्या बाबतीत आत्मनिर्भर होणं फार आवश्यक आहे. हेच साध्य करण्यासाठी सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियानं शॉट कायशामधील 50 टक्के समभाग खरेदी केले आहेत. भारतीय लस उद्योग विश्वासाठी औषध पॅकेजिंग उत्पादनांचा अखंड पुरवठा होणं यामुळे शक्य होणार आहे", असं अदर पूनावाला यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

5. शिवसेनेच्या आमदार यामिनी जाधव यांची आमदारकी धोक्यात

शिवसेनेच्या भायखळ्याच्या आमदार यामिनी यशवंत जाधव या अडचणीत आल्या आहेत. याचे कारण म्हणजे आयकर विभागाने त्यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी केली आहे. यामिनी यशवंत जाधव यांनी सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत एआयएमआयएमचे उमेदवार वारीस पठाण यांची पराभव केला होता. 'महाराष्ट्र टाईम्स'नं ही बातमी दिली आहे.

सन 2019 च्या विधानसभा निवडणूक लढवत असताना यामिनी यशवंत जाधव यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात आपल्या संपत्तीबाबत चुकीची माहिती दिली असे आयकर विभागाचे म्हणणे आहे. जाधव यांच्या प्रतिज्ञापत्राची तपासणी केली असता ही बाब उघड झाली आहे.

आयकर विभागाने केलेल्या तपासात कोलकाता येथील शेल कंपन्यांद्वारे झालेल्या आर्थिक व्यवहारांमध्ये यामिनी जाधव, त्यांचे पती यशवंत जाधव आणि त्यांच्या कुटुंबीयांनी पैसे कमावल्याचे स्पष्ट झाले आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)