भाजप जनआशीर्वाद यात्रा: राणे-कराडांसह नव्या मंत्र्यांचं नेतृत्व रुजवण्यासाठी ही यात्रा आहे का?

  • प्राजक्ता पोळ
  • बीबीसी मराठीसाठी
नारायण राणे

फोटो स्रोत, Getty Images

महाराष्ट्रातून केंद्रात मंत्रिपदी वर्णी लागलेले नारायण राणे, डॉ. भारती पवार, भागवत कराड आणि कपिल पाटील या मंत्र्यांची जनआशीर्वाद यात्रा भाजपने सुरू केली आहे.

या यात्रेमधून मुंबई, कोकण, बीड, औरंगाबाद, नांदेड, ठाणे, पालघर, वसई-विरार, नाशिक, नंदुरबार या जिल्ह्यात केंद्रीय मंत्री दौरा करत आहेत.

पण या यात्रेचा उद्देश काय आहे? भाजपचं 'मिशन महापालिका' यातून साध्य होणार का? नवी नेतृत्व यातून रूजली जाणार का? या प्रश्नांची उत्तरं शोधणारा हा आढावा...

कोणाची यात्रा कुठे?

16 ऑगस्टपासून या यात्रांना सुरुवात झाली आहे. विविध जिल्ह्यात चारही केंद्रीय मंत्री या यात्रेच्या माध्यमातून दौरा करणार आहेत.

25 ऑगस्टला शेवटची म्हणजे नारायण राणे यांच्या यात्रेतून या जनआशीर्वाद यात्रेचा महाराष्ट्रात समारोप होईल.

या यात्रेमध्ये अर्थराज्यमंत्री भागवत कराड हे 17 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट या दरम्यान मराठवाड्यात यात्रा करत आहेत. परळीतून सुरू केलेल्या या यात्रेचा समारोप औरंगाबादमध्ये होईल.

फोटो स्रोत, Getty Images

आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार या पालघर, नाशिक, धुळे, नंदूरबारचा जिल्ह्यात दौरा करत आहेत.

राज्यमंत्री कपिल पाटील यांनी ठाणे शहरातून या यात्रेला सुरुवात केली आहे. संपूर्ण ठाणे जिल्ह्यात ते यात्रा करणार आहेत.

केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे मुंबईतून 19 ऑगस्टला यात्रा सुरू करतील. मुंबई शहर, उपनगर आणि त्यानंतर रायगड, सिंधुदुर्गपर्यंत ही यात्रा असेल आणि 25 ऑगस्टला त्याचा समारोप करतील.

नवे नेतृत्व रूजवण्याचा भाजपचा प्रयत्न?

केंद्रीय मंत्र्यांचा नव्याने प्रचार करण्यासाठी ही यात्रा प्रत्येक राज्यात काढण्यात आली आहे.

यामध्ये 'भाजपची जातीय, प्रांतीय समीकरणं निश्चित आहेत' असं जेष्ठ पत्रकार सुनिल चावके सांगतात.

सुनील चावके पुढे सांगतात, "केंद्रीय मंत्र्यांचा गाजावाजा करण्याची भाजपची जुनी पद्धत आहे. पण त्यांना काम करण्याचं स्वातंत्र्य किती आहे? लोकांची किती कामं या मंत्र्याकडून केली जातात? हे प्रश्न आहेत. नेतृत्व रूजवण्याचा हा जरी प्रयत्न असला तरी लोकांची कामं करणं हे महत्त्वाचं आहे. फक्त गाजावाजा करून नेतृत्व रूजवता येत नाही."

फोटो स्रोत, Getty Images

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

"याआधी संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांचाही असाच गाजावाजा केला. पण पुढे त्यांचा मतदारसंघात किती फायदा झाला हे उघड आहे. त्यामुळे नेतृत्व हे प्रादेशिक पातळीवर लोकांनी स्वीकारल्याशिवाय रूजवता येणं शक्य नसतं. त्यात चार मंत्र्यांपैकी भागवत कराड सोडले तर तीन मंत्री हे बाहेरून आलेले आहेत. त्यामुळे त्यांचा नव्याने प्रचार केल्याने फार फायदा होईल असं वाटतं नाही," असंही चावके म्हणतात.

राज्यात भाजपचं नेतृत्व देवेंद्र फडणवीसांकडे आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, सुधीर मुनगंटीवार, प्रविण दरेकर हे नेते सोडले तर इतर नेते फार सक्रिय दिसत नसल्याचं अनेकदा बोललं जातं.

त्यात भाजपचे अंतर्गत मतभेद अनेकदा माध्यमांसमोर आले आहेत. त्यामुळे अंतर्गत वादामुळे पोखरलेली संघटना मजबूत करण्याचा हा प्रयत्न आहे का?

याबाबत जेष्ठ पत्रकार मृणालिनी नानिवडेकर सांगतात, "देवेंद्र फडणवीस हा भाजपचा चेहरा आहे. पण प्रादेशिक पातळीवर नवे नेते निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे असं म्हणता येईल."

"केंद्रीय मंत्री झालेले हे नेते काही नवीन नाहीत. भागवत कराड हे मुंडेंच्या काळापासून आहेत. नारायण राणे यांना मानणारा कोकणात एक वर्ग आहे. भारती पवार या मूळ भाजपच्या नसल्या तरी आदिवासी भागात त्यांचं काम आहे. कपिल पाटील हे कल्याण ग्रामीणचे कित्येक वर्षे खासदार आहेत. त्यामुळे हे नेते जुनेचं आहेत. फक्त नव्या जबाबदार्‍यांसह त्यांचा प्रचार करण्याचा हा प्रयत्न आहे," असं नानिवडेकर म्हणतात.

'मिशन' महापालिका?

राज्यात 10 महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत.

जनआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून भाजपने महापालिका निवडणुकांची मोर्चेबांधणी सुरू केली आहे हे उघड आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर मुंबई आणि उपनगराची जबाबदारी देण्यात आली आहे. आगामी महापालिका निवडणुकीसाठी आणि महाविकास आघाडी सरकारला शह देण्यासाठी भाजपने यात्रेच्या माध्यमातून प्रचाराला सुरुवात केली आहे, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

पालघर, वसई - विरार नाशिकसाठी डॉक्टर भारती पवार, ठाणे आणि कल्याण डोंबिवलीसाठी कपिल पाटील आणि औरंगाबादसाठी भागवत कराड यांच्याकडून नव्याने प्रचार केला जात आहे.

भाजपमध्ये पदयात्रा, रथयात्रा अशा विविध यात्रांचा इतिहास आहे.

लोकमतचे सहायक संपादक संदीप प्रधान सांगतात, "या अशा यात्रांचा अनेक नेत्यांना फायदाही झाला आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार आहे. भाजपचं सरकार नसल्यामुळे या जनआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण करणे, लोकांमध्ये जाऊन महाविकास आघाडी विरूद्ध मतप्रवाह तयार करणे यासाठी ही यात्रा काढली आहे असं वाटतं. त्याचा फायदा होईल की नाही नंतरचा भाग आहे. पण प्रचाराला सुरुवात झाली असं म्हणता येईल."

तर "भाजप या यात्रेतून फक्त महापालिका निवडणूका नाही तर सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून प्रचार करतंय. यातून किती फायदा होतोय हे निवडणूकांनंतरच कळेल," असं जेष्ठ पत्रकार मृणालिनी नानिवडेकर सांगतात.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)