तालिबानचं सोशल मीडियावर समर्थन करणाऱ्या 14 जणांना अटक

असम पोलिस

फोटो स्रोत, ANI

सोशल मीडियावर तालिबानच्या अफगाणिस्तानावरील नियंत्रणाचं समर्थन करणाऱ्या 14 जणांना आसाममध्ये अटक करण्यात आली आहे.

पीटीआयने स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांच्या हवाल्याने हे वृत्त दिलं आहे. शुक्रवारी संध्याकाळी ही अटक झाल्याचं पोलिसांनी पीटीआयला सांगतिलं आहे. अटक करण्यात आलेल्यांवर यूएपीए तसंच आयटी आणि इतर कायद्यांअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

"आम्ही सध्या अलर्ट आहोत आणि सोशल मीडियावर येणाऱ्या भडखाऊ टिपण्णींवर लक्ष ठेवून आहोत," असं पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं आहे.

कामरूप मेट्रोपोलिटन, बारपेटा, धुबरी आणि करीमगंज जिल्ह्यातून प्रत्येकी 2 लोकांना अटक करण्यात आली आहे. त्याशिवाय दरांग, चाचर, हैलाकांडी, दक्षिण सलमारा, गोआलपारा आणि होजाइ जिल्ह्यातून प्रत्येकी एकाला अटक करण्यात आली आहे.

डीआयजी वॉयलेट बरुआ यांनी दिलेल्या माहितीनुसार, आसाम पोलीस राष्ट्रीय सुरक्षेला धोका असलेल्या अशा प्रकारच्या सोशल मीडिया कमेंट्सवर कठोर कारवाई करत आहेत.

त्यांनी सांगितलं की, "आम्ही अशा लोकांवर गुन्हे दाखल करत आहोत. तुमच्या लक्षात असं कुणी आलं तर लगेच त्याची माहिती पोलिसांना द्या."

तालिबानची भारतीय स्वातंत्र्यसैनिकांशी तुलना

उत्तर प्रदेशच्या संभलमधील समाजवादी पक्षाचे लोकसभा खासदार शफीकुर रेहमान बर्क यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका भाजपच्या कार्यकर्त्याच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बर्क यांनी अफगाणिस्तानात सत्ता काबिज केलेल्या तालिबानची तुलना भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या स्वातंत्र्य सैनिकांबरोबर केली होती.

फोटो स्रोत, @SRahmanBarq

फोटो कॅप्शन,

शफीकुर्रहमान बर्क

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

संभलचे पोलीस अधीक्षक चक्रेश मिश्र यांनी याबाबत माध्यमांना माहिती दिली. "खासदार शफीकुर रेहमान बर्क यांनी तालिबानची तुलना भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात लढलेल्या सैनिकांशी केल्याची तक्रार संभलमध्ये दाखल करण्यात आली होती.

अशी वक्तव्यं राजद्रोहाच्या श्रेणीमध्ये येतात. त्यामुळं त्यांच्या विरोधात 124अ म्हणजे देशद्रोहाच्या कलमाखाली एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तसंच 153अ आणि 295 कलमदेखील लावण्यात आलं आहे. त्यांच्याबरोबर आणखी दोन जणांनीदेखील सोशल मीडियावर एका व्हीडिओत असं वक्तव्य केलं आहे. त्यांच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे."

शफीकुर रेहमान बर्क यांनी अफगाणिस्तानवर तालिबाननं ताबा मिळवल्यानंतर त्याची तुलना भारताच्या स्वातंत्र्य लढ्याशी केली होती. पण नंतर त्यांनी या वक्तव्यावर स्पष्टीकरणही दिलं होतं.

"भारत इंग्रजांच्या ताब्यात होता, तेव्हा देशानं स्वातंत्र्यासाठी लढा दिला होता. आता तालिबानही देशाला स्वातंत्र्य मिळवून देऊन स्वतः देश चालवू इच्छित आहेत. आधी रशिया आणि नंतर अमेरिकेनं अफगाणिस्तानवर ताबा मिळवला होता. पण त्यांनी स्वातंत्र्यासाठी लढा दिला. हे त्यांचं खासगी प्रकरण आहे. यात कुणी दखल द्यायला नको," असं संभलमध्ये माध्यमांशी बोलताना बर्क म्हणाले होते.

उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांनी बर्क यांच्या या वक्तव्यावर टीका केली होती. तसंच भाजपनं त्यांना माफी मागण्यासही सांगितलं होतं.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही शफीकुर रेहमान बर्क यांच्या या वक्तव्यावर टीका केली आहे.

गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणी शफीकुर रेहमान बर्क यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही केला, पण त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

दोन वर्षांपूर्वी संसदेत वंदे मातरम् संदर्भात केलेल्या एका वक्तव्यावरूनही शफीकुर रेहमान बर्क वादात अडकले होते.

संसदेत ऊर्दूमध्ये शपथ घेतल्यानंतर ते म्हणाले होते, "भारताचे संविधान जिंदाबाद, पण वंदे मातरम् इस्लामच्या विरोधी असून आम्ही त्याचं पालन करू शकत नाही."

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)