प्रमोद जठारः नारायण राणेंना तुम्ही महाड दाखवलं, आता आम्ही मुख्यमंत्र्यांना उत्तर प्रदेश दाखवू #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, Getty Images
उद्धव ठाकरे, योगी आदित्यनाथ
आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा..
1. राणेंना महाड दाखवलंच, आम्ही मुख्यमंत्र्यांना उत्तर प्रदेश दाखवू - प्रमोद जठार
उद्धव ठाकरे सरकारने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना महाड पोलीस ठाण्यात आणून कारवाई केली.
आता आम्ही मुख्यमंत्र्यांना उत्तर प्रदेश दाखवणार आहोत, असा इशारा भारतीय जनता पक्षाचे प्रदेश चिटणीस प्रमोद जठार यांनी दिला आहे.
सिंधुदूर्ग येथील भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत जठार बोलत होते. दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध उत्तर प्रदेशात गुन्हे दाखल होतील.
राणेंना त्यांनी महाडला आणलं, तर आम्ही त्यांना उत्तर प्रदेश दाखवू, असं जठार यांनी म्हटलं.
शिवाय, परिवहन मंत्री अनिल परब यांच्या व्हायरल व्हीडिओसंदर्भातही जठार यांनी प्रतिक्रिया दिली. परब यांच्या सहकाऱ्यांनीच त्यांच्यासमोरील माईक चालू ठेवून त्यांच्यावर डाव साधला, असं ते म्हणाले. ही बातमी ई-सकाळने दिली.
2. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची नवी कार्यकारिणी जाहीर
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. उपाध्यक्ष, सरचिटणीस, चिटणीस यांच्यासह अनेक नवे पदाधिकारी जाहीर झाले आहेत.
फोटो स्रोत, facebook
नाना पटोले
राज्यातील उपाध्यक्षांच्या यादीत काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी डॉक्टर प्रज्ञा सातव यांचाही समावेश आहे.
शिस्तपालन कमिटीचे अध्यक्ष म्हणून पृथ्वीराज चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे. तर अमरजित मनहास यांच्याकडे खजिनदार पद देण्यात आलं आहे.
कार्यकारणी सोबतच 14 जिल्हाध्यक्षांच्या निवडीदेखील काँग्रेसने जाहीर केलेल्या आहेत. धवलसिंह मोहिते पाटील सोलापूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष तर विक्रमसिंह सावंत सांगली ग्रामीणचे अध्यक्ष असणार आहेत. ही बातमी एबीपी माझाने दिली.
3. 'कोरोना कालावधीत राज्याला उद्धव ठाकरेंसारखं नेतृत्व लाभणं ही नियतीची इच्छा'
कोरोना कालावधीत महाराष्ट्राला उद्धव ठाकरे यांच्यासारखं नेतृत्व लाभावं, ही नियतीची इच्छा म्हणावी लागेल, अशा शब्दांत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं आहे.
लोकसत्तातर्फे आयोजित इंडस्ट्रियल कॉन्क्लेव्ह 2021 मध्ये सुभाष देसाई बोलत होते.
सुभाष देसाई
कोरोना काळात राज्यात गुंतवणूक वाढवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी केलेल्या प्रयत्नांची माहिती यावेळी देसाई यांनी दिली.
मुख्यमंत्री ठाकरे यांनी कोरोना टास्क फोर्ससोबतच उद्योगसंदर्भातील निर्णय आणि समन्वयासाठी एक वेगळी टास्क फोर्स बनवली होती.
या माध्यमातून उद्योजकांच्या अपेक्षा जाणून घेण्यात आल्या. या सर्व गोष्टींमुळे कामाचा उत्साह वाढला आणि अर्थचक्र सुरू राहण्यात मोलाची भूमिका बजावली, असं देसाई यांनी म्हटलं.
4. ढिम्म सरकारला जागं करण्यासाठी 2 सप्टेंबरपासून आंदोलन- मेटे
फडणवीस सरकारच्या काळात मराठा आरक्षणाच्या संघर्षाला यश आलं होतं. पण, ठाकरे सरकार सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण टिकवण्यात अपयशी ठरले.
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी ठाकरे सरकार काहीच पावले उचलत नाही. या ढिम्म सरकारला जागं करण्यासाठी 2 सप्टेंबरपासून राज्यव्यापी आंदोलन छेडणार असल्याचा इशारा शिवसंग्राम संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विनायक मेटे यांनी दिला आहे.
फोटो स्रोत, facebook
विनायक मेटे
जळगाव येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत मेटे बोलत होते.
राज्य सरकार आरक्षणाच्या बाबतीत कोणताही निर्णय घेत नाही. पाण्यात बसलेल्या म्हशीप्रमाणे सरकार ढिम्म आहे. त्यांना टोचण्यासाठी शिवसंग्राम संघटनेसह मराठा समाजाला आक्रमक भूमिका घ्यावी लागणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेऊन शिवसेना सरकारमध्ये आली. मात्र, छत्रपतींच्या स्मारकाबाबत गेल्या 2 वर्षात मुख्यमंत्री ठाकरे यांनी 2 मिनिटंही वेळ दिला नसल्याचा आरोप मेटे यांनी केला. ही बातमी टीव्ही 9 मराठीने दिली.
5. काँग्रेस पक्षच सक्षम पर्याय - नाना पटोले
काँग्रेस पक्ष हा सर्वात जुना आणि मोठा पक्ष आहे. राज्यातील परिस्थिती सध्या काँग्रेसला अनुकूल आहे. काँग्रेसला मानणारा वर्ग मोठा असून आगामी काळात काँग्रेसच सक्षम पर्याय म्हणून पुढे येईल, असं प्रतिपादन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं.
मुंबई येथील टिळक भवन येथे 2019 लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या पराभूत उमेदवारांची बैठक आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी नाना पटोले बोलत होते.
2019 च्या निवडणुकीत काँग्रेसचे जवळपास 14 ते 15 उमेदवार अत्यंत कमी फरकाने पराभूत झाले. आता आगामी निवडणुकीत जास्तीत जास्त उमेदवार कसे निवडून येतील, यासाठी आपण प्रयत्न करू, असं पटोले म्हणाले. ही बातमी लोकमतने दिली.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)