लहान मुलांना कोरोना लस ऑक्टोबरपासून, NTAGI ची परवानगी, ZyCoV-D लशीचं असं आहे वेगळेपण

फोटो स्रोत, Getty Images
प्रातिनिधिक छायाचित्र
देशातील 12 ते 17 वर्षं वयोगटातील लहान मुलांना कोरोनाविरोधी लस ऑक्टोबर महिन्यापासून मिळणार आहे.
लहान मुलांच्या लसीकरणाबाबत केंद्राला मार्गदर्शन करणाऱ्या नॅशनल टेक्निकल अॅडव्हायसरी ग्रूपचे (NTAGI) प्रमुख डॉ. एन.के.अरोरा यांनी ANI या वृत्तसंस्थेशी बोलताना ही माहिती दिलीये.
गेल्याच आठवड्यात केंद्र सरकारने Zydus Cadila च्या, ZyCoV-D या कोरोनाविरोधी लशीच्या भारतात आपात्कालीन वापराची परवानगी दिली होती.
भारतात जानेवारी महिन्यापासून कोव्हिडविरोधी लसीकरणास सुरूवात झालीये. मात्र, उपलब्ध असलेल्या लशी 18 वर्षावरील लोकांसाठी आहेत. Zydus Cadila ची ZyCoV-D ही पहिलीच लस आहे जी 12 ते 17 वर्षं वयोगटातसुद्धा दिली जाऊ शकते.
ऑक्टोबरपासून लहान मुलांचं लसीकरण
Zydus Cadila च्या ZyCoV-D या कोरोनाविरोधी लशीला भारताच्या औषध महानियंत्रकांनी गेल्या आठवड्यात आपात्कालीन वापराची परवानगी दिली होती.
औषध निर्मिती करणारी कंपनी Zydus Cadila ने ऑक्टोबर महिन्यापासून लस भारतात उपलब्ध होईल अशी माहिती दिली होती.
लहान मुलांच्या लसीकरणाबाबत बोलताना नॅशनल टेक्निकल अॅडव्हायसरी ग्रूपचे (NTAGI) प्रमुख डॉ. एन. के. अरोरा म्हणाले, "12 ते 17 वर्ष वयोगटातील मुलांना ही लस ऑक्टोबरपासून उपलब्ध होण्यास सुरू होईल. त्याचसोबत प्रौढ व्यक्तीदेखील ही लस घेऊ शकतात."
फोटो स्रोत, Getty Images
केंद्र सरकारच्या माहितीनुसार, भारतात 12 ते 17 वर्षं वयोगटातील मुलांची संख्या 12 कोटींच्या आसपास आहे.
डॉ. अरोरा पुढे म्हणतात, "मुलांना ही लस उपलब्ध करून देण्याआधी, जी मुलं आजारी आहेत. ज्या मुलांना सहव्याधी आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी लिस्ट आणि प्लान बनवण्याची तयारी सुरू आहे."
भारतात 1 टक्क्याच्या आसपास लहान मुलं सहव्याधी किंवा गंभीर आजाराने ग्रस्त असल्याची माहिती मिळतेय.
"पण, सहव्याधी नसलेल्या निरोगी मुलांना प्रौढांचं लसीकरण पूर्ण झाल्यानंतर लस देण्यात येईल," असं डॉ. अरोरा ANI शी बोलताना म्हणाले.
तर, एनडीटीव्हीने दिलेल्या बातमीनुसार, डॉ. अरोरा पुढे म्हणाले, "12 ते 17 वर्षं वयोगटातील मुलांना कोरोनामुळे गंभीर आजार किंवा मृत्यू होण्याची शक्यता कमी आहे. मात्र, 18-45 वयोगटातील पालकांना गंभीर आजार होण्याचा धोका 10-15 टक्के आहे. त्यामुळे, मुलांचं लसीकरण करण्याआधी प्राथमिकता या लोकांच्या लसीकरणाची आहे."
गेली दिड वर्षं शाळा बंद आहेत. मुलं घरी असल्याने त्यांच्यात एकटेपणा वाढतोय. मुलांचं मानसिक आरोग्य धोक्यात आलंय. स्मार्टफोन नसल्याने मुलं शिक्षणापासून वंचित रहात आहेत. त्यामुळे शाळा सुरू करण्यात याव्यात अशी मागणी जोर धरू लागली आहेत.
जागतिक आरोग्य संघटनेच्या शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामिनाथन यांनीदेखील शाळा कशा पद्धतीने सुरू करता येतील यावर विचार करण्याची सूचना केली होती.
त्यावर डॉ. अरोरा ANI शी बोलताना सांगतात, "शाळा टप्या-टप्याने सुरू करण्याची आता वेळ आलीये. पण, त्याआधी प्रौढ व्यक्ती, पालक किंवा कुटुंबातील इतरांचं लसीकरण होणं गरजेचं आहे."
फोटो स्रोत, Getty Images
प्रातिनिधिक छायाचित्र
कोरोनासंसर्गाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांमध्ये संसर्गाचं प्रमाण जास्त असण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.
"शाळांमध्ये शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, बस ड्रायव्हर अशा व्यक्ती ज्या मुलांच्या संपर्कात येतात. त्यांचं लसीकरण करणं महत्त्वाचं आहे. शाळा सुरू करण्यापूर्वी मुलांच्या भोवती सुरक्षाकवच निर्माण केलं पाहिजे," ते पुढे सांगतात.
Zydus Cadila च्या ZyCoV-D लशीबाबत माहिती
झायडस कॅडिलाच्या ZyCoV-D लशीच्या तीन टप्प्यात चाचण्या झाल्या असून ही लस 66.6 टक्के प्रभावी आहे. एकूण 28 हजार स्वयंसेवकांवर या लशीची चाचणी घेण्यात आली आहे.
DNA वर आधारित असलेली जगभरातील ही पहिली लस असून, DBT-BIRAC च्या मदतीनं झायडस कॅडिलानं ही लस तयार केलीय.
या लशीचे दोन डोस घ्यावे लागतील. लस दिल्यानंतर कोव्हिड-19 चे स्पाईक प्रोटीन शरीरात तयार होतील, असं कंपनीनं म्हटलंय. तसंच, या लशीच्या चाचणीदरम्यान पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात रोगप्रतिकारकशक्ती निर्माण झाल्याचंही कंपनीनं म्हटलंय.
या लशीचं वेगळेपण काय आहे?
ही दुसरी स्वदेशी लस आहे जी पूर्णपणे भारतात तयार करण्यात आली आहे. कंपनीचे संचालक डॉ. शरविल पटेल यांनी काही दिवसांपूर्वी एका खाजगी टेलिव्हिजन चॅनेलशी संवाद साधताना म्हटलं-
- या लशीची क्लिनिकल ट्रायल 28 हजार स्वयंसेवकांवर करण्यात आली आहे. ही देशातील सर्वांत मोठी क्लिनिकल ट्रायल आहे.
- क्लिनिकल ट्रायलमध्ये 12 ते 18 वर्षं वयाच्या मुलांसह सर्व वयोगटातील लोक सहभागी झाले होते.
- ही लस घेण्यासाठी इंजेक्शनची आवश्यकता नाहीये. ही एक इंट्रा-डर्मल व्हॅक्सिन आहे. ही लस घेताना स्नायूंमध्ये इंजेक्शन घ्यावं लागत नाही. हीच गोष्ट वितरणासाठी खूप महत्त्वाची ठरू शकते.
- ही लस 2 ते 8 डिग्री सेल्सियस तापमानामध्ये खूप काळासाठी ठेवता येऊ शकते. त्याचबरोबर ही लस 25 डिग्री सेल्सियस तापमानात चार महिन्यांपर्यंत ठेवली जाऊ शकते.
- ही लस नवीन व्हेरियंट्ससाठी पण अपडेट करता येऊ शकते.
- सुरूवातीच्या दिवसांमध्ये आम्ही महिन्याला या लशीचे 1 कोटी डोस तयार करणार आहोत.
डीएनए आधारित लस म्हणजे काय?
ZyCoV-D ही एक डीएनए आधारित लस आहे. जगभरात लस बनविण्याचा हा सिद्ध झालेला फॉर्म्युला आहे.
राजीव गांधी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसोबत काम करणारे डॉक्टर बीएल शेरवाल लस बनविण्याच्या या पद्धतीबद्दल अधिक माहिती देतात.
फोटो स्रोत, Getty Images
ते सांगतात, "आपल्या शरीरात दोन पद्धतीच्या विषाणूंचा-डीएनए आणि आरएनए संसर्ग होत असल्याचं सांगितलं जातं. कोरोना विषाणू हा एक आरएनए विषाणू आहे, जो सिंगल स्ट्रेंडेड असतो. डीएनए डबल स्ट्रेंडेड असतो आणि आपल्या कोशिकांमध्ये आढळतो.
जेव्हा आपण या विषाणूला आरएनएमधून डीएनएमध्ये परिवर्तित करतो, तेव्हा त्याची एक कॉपी बनवतो. त्यानंतर हा व्हायरस डबल स्ट्रेंडेड बनतो आणि त्यानंतर तो डीएनएमध्ये परिवर्तित होतो."
डीएनए व्हॅक्सिन जास्त प्रभावी आणि शक्तिशाली समजली जाते. देवी, नागिणसारख्या समस्यांवरही डीएनए लस वापरली गेली होती.
दोनऐवजी तीन डोस का?
कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार या लशीचे तीन डोस प्रत्येकी 28 दिवसांच्या कालावधीनं दिले जातील. आतापर्यंत ज्या लशी उपलब्ध आहेत, त्याचे दोनच डोस दिले जात आहेत.
त्यामुळे या लशीचे तीन डोस का दिले जात आहेत, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दोन डोसमध्ये पुरेशा अँटीबॉडी तयार करण्याची या लशीची क्षमता नाहीये का, असा मुद्दा उपस्थित होत आहे.
पण डॉ. शेरवाल यांच्या मते तीन डोस द्यावे लागणं म्हणजे लशीची क्षमता कमी आहे असा विचार करायला नको.
ते सांगतात, "लशीचा पहिला डोस दिल्यानंतर त्या व्यक्तिमध्ये किती रोगप्रतिकारक क्षमता विकसित झाली आहे, हे पाहिलं जातं. जर ती योग्य प्रमाणात विकसित झाली नसेल तर दुसरा आणि तिसरा डोस दिला जातो.
डोस कमी मात्रेत असला तरीसुद्धा अँटीबॉडीज कमी प्रमाणात बनतात. नंतर दुसरा आणि तिसरा डोस दिला जातो. त्यामुळे लस कमी परिणामकारक आहे, असा अर्थ होत नाही. पहिल्या डोसनंतर दुसरा आणि तिसरा डोस बूस्टरचं काम करतो. अँटी-बॉडीज पण जास्त प्रमाणात तयार होतात. माझ्या मते यामुळे मिळणारं संरक्षणसुद्धा दीर्घकाळ टिकणार असतं."
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)