उद्धव ठाकरेंचा नारायण राणेंना टोला, 'काही जुने व्हायरस परत आलेत, त्यांचा बंदोबस्त करायचाय'

राणे-उद्धव

फोटो स्रोत, Getty Images

"काही जुने व्हायरस परत आले आहेत. त्यांचा बंदोबस्त करायचा आहे," असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना टोला लगावला आहे.

'लोकसत्ता'च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 'इंडस्ट्रियल कॉन्क्लेव्ह 2021' या कार्यक्रमात ते बोलत होते.

उद्धव ठाकरे यांनी म्हटलं, "कोरोनाचं संकट पूर्णपणे गेलेलं नाहीये, थोडंस आहे. काही काही तर जुने व्हायरस परत येत आलेत. हे जुने व्हायरस कारण नसताना साइड इफेक्ट आणत आहेत. त्या व्हायरसचा बंदोबस्त करायचा आहे आणि या व्हायरसचाही बंदोबस्त करायचा आहे."

गेले दोन दिवस राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उद्धव यांनी प्रथमच नारायण राणेंवर टीका केली आहे, अर्थात त्यांनी नारायण राणेंचं नाव घेतलं नाही.

नारायण राणे यांनी जनआशीर्वाद यात्रेदरम्यान रायगडमधील महाड येथे एका पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधा वादग्रस्त विधान केलं होतं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मंत्रालयातील ध्वजारोहण पार पडल्यानंतर त्यांनी उपस्थितांसमोर भाषण केलं. त्यावेळी त्यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच 75व्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. भाषणाच्या दरम्यान मात्र हा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव की हिरकमहोत्सव? यावरून मुख्यमंत्री गोंधळलेले दिसले. तसा प्रश्न त्यांनी विचारला.

याबद्दल बोलताना नारायण राणेंनी म्हटलं, "बाजूला एखादा सेक्रेटरी ठेव आणि विचारून बोल. त्या दिवशी नाही का? किती वर्षं झाली देशाला स्वातंत्र्य मिळून, अरे हिरक महोत्सव काय? मी असतो तर कानाखालीच चढवली असतं."

"देशाच्या स्वातंत्र्य दिनाविषयी तुम्हाला माहिती नसावी? मला सांगा किती चीड येणारी गोष्ट आहे," असंही राणे म्हणाले होते.

फोटो स्रोत, Getty Images

राणेंच्या या वक्तव्यानंतर त्यांच्याविरोधात नाशिक, महाड, पुणे इथं गुन्हे दाखल झाले. मंगळवारी (24 ऑगस्ट) राणेंना अटक करण्यात आली आणि नंतर त्यांना जामीनही मिळाला. दरम्यान, भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते अनेक ठिकाणी रस्त्यावरही उतरले.

राणेंची पत्रकार परिषद

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

मंगळवारी (24 ऑगस्ट) झालेली अटक आणि नंतर मिळालेला जामीन या राजकीय नाट्यानंतर नारायण राणे यांनी बुधवारी (25 ऑगस्ट) पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत राणे यांनी शिवसेनेवर टीका केली. पण त्यांनीही उद्धव यांचं नाव घेतलं नव्हतं.

"तुम्ही कोणीही माझं काही करू शकत नाही. तुमच्या प्रतिक्रियेला मी घाबरत नाही. तुम्हाला सगळ्यांना मी पुरुन उरलो आहे," असं म्हणत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेला आव्हान दिलं.

"मी असं काय बोललो होतो ज्याचा राग आला? ते वाक्य पुन्हा बोलणार नाही. भूतकाळात एखादं वाक्य बोललो तर गुन्हा कसा झाला?" असं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी म्हटलं.

राणेंनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबद्दल केलेल्या विधानांचा दाखले दिले.

"सेनाभवनबद्दल जे बोलतील त्याचे थोबाड फोडा, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले तो क्राईम नाही का? मुख्यमंत्र्यांनी यूपीच्या मुख्यमंत्र्यांबाबत अपशब्द वापरले. योगी आदित्यनाथांबद्दल बोलले होते की हा योगी आहे की ढोंगी... ते पण मुख्यमंत्री आहेत. पवारसाहेबांनी या सुसंस्कृत व्यक्तीला मुख्यमंत्री केले आहे," असं नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना म्हटलं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)