नारायणराव पेशव्यांची हत्या : आनंदीबाईंनी खरंच 'ध' चा 'मा' केला होता का?

  • मयुरेश कोण्णूर
  • बीबीसी मराठी
नारायणराव पेशवे

फोटो स्रोत, Wellcome Collection, London

फोटो कॅप्शन,

नारायणराव पेशवे

30 ऑगस्ट 1773 ला, भाद्रपद शुद्ध त्रयोदशीला, पुण्यात शनिवारवाड्यात भर दुपारी जे घडलं त्यानं संपूर्ण मराठेशाही हादरली. अधिकारावर असलेल्या पेशव्यांची हत्या झाली. वयाच्या अठराव्या वर्षी नारायणराव पेशव्यांना गारद्यांनी मारलं.

इतिहासात ही नोंद आहे की कृत्याची जबाबदारी ही नारायणर पेशव्यांचे काका रघुनाथराव, म्हणजेच राघोबादादा, यांच्याकडे जाते. न्यायमूर्ती रामशास्त्र्यांनी त्यांना दोषी धरलंही. त्यांनी सुनावलेलं देहांत प्रायश्चित्त रघुनाथरावांनी घेतलं नाही, पण कालांतरानं अन्य प्रायश्चित्त घेतलं.

या कृत्यात सहभागी झालेल्या अन्यांना शिक्षाही झाल्या. पण इतिहासानं या प्रकरणाचं खलनायकत्व आणखी एका व्यक्तीकडे दिलं, जे आजही जनमानसात रुजलेलं आहे, ती म्हणजे रघुनाथरावांच्या पत्नी आनंदीबाई.

याचं कारण आहे 'ध चा मा' होणं. राघोबादादांनी गारद्यांना नारायणराव पेशव्यांना 'मारण्या'चे नव्हे तर 'धरण्या'चे आदेश दिले होते, पण त्यांनी लिहिलेल्या पत्रात ऐनवेळेस 'ध'च्या जागी 'मा' असं केलं गेलं. त्यामुळे गारद्यांनी नारायणरावांना न धरता मारून टाकले आणि हा पत्रातला 'ध चा मा' आनंदीबाईंनी केला होता, असं कायम सांगितलं गेलं आहे.

जवळपास अडीच शतकं अनेक कथा, कादंबऱ्या, नाटक, चित्रपट, मालिका यांच्यातून ते अधोरिखित झालं आणि खलनायिका म्हणून आनंदीबाईंची प्रतिमा गडद होत गेली. ते एवढं, की, 'ध चा मा' होणं हे केवळ आनंदीबाईंपाशी न थांबता, कपट वा कटकारस्थान करणं यासाठी मराठीतला नवा वाक्प्रचार म्हणून प्रचलित झाला.

पण आनंदीबाईंनी ध चा मा केला, या समजाला पुराव्यांचा, तथ्यांचा, तर्काचा काय आधार आहे? ऐतिहासिक सत्य म्हणून मान्य झालेल्या या समजाबद्दल कागदपत्रांचा, पुराव्यांचा अभ्यास करणाऱ्या इतिहास संशोधकांचं याबद्दल मत काय आहे?

आणि जर आनंदीबाईंनी हे केलंच नसेल तर मग त्यांच्याविरोधात एवढा मोठा बदनामीचा कट कुणी रचला? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी इतिहासातल्या अनेक ग्रंथांमधून जावं लागलं आणि अनेक जाणकारांशी बोलावं लागलं. हा प्रवास तुमच्यासमोर मांडत आहे.

'काका मला वाचवा'

आनंदीबाईंवर झालेल्या या आरोपाच्या मीमांसेत शिरण्याअगोदर आपण ज्यामुळे हा आरोप ती पूर्वपीठिकाही माहीत करून घेतली पाहिजे.

रघुनाथराव म्हणजेच राघोबादादा यांच्या युद्धकौशल्याच्या बाबतीत पराक्रमी असाच उल्लेख होतो. अटकेपार मराठा साम्राज्याचा झेंडा नेण्याची मोहीम त्यांची होती. पण सर्वोच्च सत्तास्थानाची, म्हणजे पेशव्यांच्या गादीवर बसण्याची त्यांची ईर्षाही हीसुद्धा कधी लपली नाही.

फोटो स्रोत, Getty Images

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

पानिपताच्या युद्धानंतर काही काळात नानासाहेब पेशवेंचं निधन झालं, तेव्हा त्यांचा धाकटा भाऊ म्हणून पेशवाईची सूत्रं आपल्याकडे येतील असा रघुनाथरावांचा कयास होता. पण तसं झालं नाही. नानासाहेब पेशव्यांचे थोरले पुत्र माधवरावांना पेशवाईची वस्त्रं मिळाली.

माधवरावांच्या छोट्या, पण महत्त्वपूर्ण कालखंडात त्यांना काका रघुनाथरावांच्या विरोधी कृतींना कायम तोंड द्यावं लागलं. दोघांतला हा संघर्ष या टोकाला गेला की, माधवरावांना कठोर पाऊल उचलून रघुनाथरावांना कैदेतही ठेवावं लागलं.

1772 मध्ये माधवराव पेशव्यांचा वयाच्या 27व्या वर्षी मृत्यू झाला. त्यावेळी त्यांचे लहान बंधू नारायणराव पेशवे हे अवघे 17 वर्षांचे होते. पण तोवर काका रघुनाथरावांबद्दल कमालीचं अविश्वासाचं वातावरण होतं. त्यामुळे 17 वर्षांचे नारायणराव अधिकारपदावर आले.

रघुनाथराव आणि आनंदीबाई यांचे नारायणरावांवर वडिलकीच्या नात्यानं प्रेम होतं असं काही ठिकाणी लिहिलं गेलं आहे. पण नंतर ईर्ष्या आणि त्यासोबतच नारायणरावांच्या काही निर्णयांबद्दल नाराजी, त्यांनी धुडकावलेल्या सल्ल्यांबद्दल राग यांनी उचल खालली.

रघुनाथरावांनी स्वतःचे पुतणे असलेल्या 17 वर्षांच्या नारायणराव पेशव्यांविरोधात कट रचला. असं म्हटलं गेलं की नारायणरावांना पकडून, कैदेत टाकून, रघुनाथरावांना पेशवा करायचे असे कारस्थान होते. पण प्रत्यक्षात वेगळे घडले.

30 ऑगस्ट 1773 या दिवशी गणेशोत्सवाचा शनिवारवाड्यात उत्सवाचा कालावधी असतांना दुपारच्या प्रहरी गारद्यांनी वाड्यात घुसून नारायणरावांची हत्या केली. गारदी हे तेव्हा पैसे देऊन सुरक्षा पुरवायचे. अनेक ठिकाणी वर्णन केलं गेलं की नारायणराव पळत होते, मागे गारदी लागले होते. वाचवण्यासाठी त्यांनी रघुनाथरावांकडे 'काका मला वाचवा' अशी धावही घेतली, पण मदत मिळाली नाही.

इथे प्रश्न आला की कट जर पकडण्याचा होता तर मारले का? तर गारद्यांना जो लेखी हुकूम देण्यात आला होता त्यात 'धरावे' च्या जागी 'मारावे' असा बदल कोणी केल्याचे समोर आलं.

फोटो स्रोत, Wellcome Collection, London

फोटो कॅप्शन,

नारायणराव पेशवे

त्या बदलाचा आणि कटात सहभागी असण्याच्या संशयाची सुई आनंदीबाईंकडे गेली. न्यायाधीश रामशास्त्री प्रभुणे यांनी या प्रकरणाचा तपास केला, जबान्या घेतल्या आणि या कटामागे रघुनाथरावच असल्याचा निष्कर्ष काढला आणि देहांत प्रायश्चित्त फर्मावले. रघुनाथराव अत्यल्प काळ पेशवेपदावर राहिले, पण पुढे नाना फडणवीस आणि 'बारभाई' यांच्या कारस्थानानंतर त्यांना जावे लागले.

नारायणरावांचा मुलगा 'सवाई माधवराव' याला वयाच्या अवघ्या चाळीसाव्या दिवशी पेशवेपदावर बसवले गेले. म्हणजे दीड महिन्यांचा हा नामधारी पेशवा होता आणि त्यांच्या वतीन बारभाई कारभार पाहत होते. त्यानंतर नारायणरावांच्या हत्येमध्ये आणि कटात सामील असणाऱ्यांना शिक्षा झाल्या. काही पकडले गेले, काहींना मृत्युदंड झाला आणि काहींच्या दौलती जप्त करण्यात आल्या.

'आनंदीबाईच दोषी' असं म्हणणारे लोक

मराठी जनमानसात रुजलेला समज अथवा काहींच्या मते तथ्य हे आहे की रघुनाथरावांच्या पत्नी आनंदीबाईंनी तो केला. पण आजपर्यंत आनंदीबाईंनी हा नारायणरावांच्या जिवावर बेतलेला अक्षरबदल केला असा कोणताही ऐतिहासिक आणि स्पष्ट पुरावा मिळाला नाही आणि ते सिद्ध झालेले नाही. त्यामुळे इतिहास संशोधकांच्या मते 'ध चा मा' कुणी केला हे आजही इतिहासाला पडलेलं कोडंच आहे.

आधी आपण आनंदीबाईंविरोधात काय पुरावे पुढे येतात ते पाहूया. हे स्पष्ट की आनंदीबाईंच्या 'ध चा मा' प्रकरणाशी संबंध त्यांच्या हयातीतच जोडला गेला होता आणि त्यांनी तो नाकारलाही होता. पण तरीही इतिहासाच्या अनेक साधनांमध्ये त्याचा उल्लेखही होतो. काही इतिहासकारांनी त्यांना उपलब्ध साधनांवरून ते मानलं, काहींनी नाही. तसे उल्लेख आपल्याला विविध लेखनामध्ये सापडतात.

वासुदेवशास्त्री खरे हे इतिहास संशोधनामधलं एक महत्त्वाचं नाव मानलं जातं. 1858 मध्ये जन्मलेल्या खरे यांचा पुण्यात आणि मिरजेला त्यांच्या कार्याचा मोठा काळ गेला आणि त्यात त्यांनी अनेक मूळ कागदपत्रं मिळवून, अभ्यास करून त्यांचं संशोधन प्रसिद्ध केलं.

इतिहास अभ्यासक मंदार लवाटे सांगतात, "मिरजकर पटवर्धनांच्या पुण्यातल्या वकिलांनी पुण्यातनं रोजच्या घडामोडीची जो पत्रं पाठवली त्याला 'मिरजमळा दफ्तर' म्हणतात. त्यातली काही लाख कागद खरे यांना अभ्यासासाठी मिळाली. त्यातली निवडक पत्र त्यांनी 'ऐतिहासिक लेखसंग्रह' म्हणून 15 खंड 1896 ते 1927 या काळात छापले.

उत्तर पेशवाईचं सखोल आणि विश्वसनीय लिखाण मानलं हे जातं. त्यातल्या चौथ्या खंडात खरे यांनी 'आनंदीबाईंनी किंवा त्यांच्या आज्ञेनं' पत्रात बदल केला असं म्हटलं आहे."

फोटो स्रोत, Getty Images

नारायणराव पेशव्यांच्या प्रकरणाबद्दल खरे नोंदवतात: 'सर्व गोष्टी फार जलद व अत्यंत गुप्तपणे झाल्या असाव्या असे दिसते. हा कट तयार होतो तो काही दुष्ट लोकांनी राज्यप्राप्तीसाठी हपापलेल्या आनंदीबाईंच्या संमतीने वा कदाचित आज्ञेने या कटाच्या आत आणखी एक कट केला. तो कट असा की नारायणरावसाहेबास कैद करण्याच्या भरीस न पडता त्यास ठार मारून टाकावे. हा कटाच्या आतला कट खुद्द दादासाहेबांस किंवा सखारामबापूस किंवा वर ज्यांची नावे लिहिली आहेत त्यापैकी कोणास माहीत असावा असे आम्हास अगदी वाटत नाही.

'नारायणसाहेबास धरण्याचे काम पेशव्यांच्या नोकरीस गारदी लोक असत, त्यांच्या सुमेरसिंग, खरगसिंग व महंमद इसब या तीन जमातदारांवर सोपविण्यात आले होते. गारद्यांमध्ये मराठी माणूस कोणी नसावयाचेच. रोहिले, हबशी, पुरभय्ये, आरब वगैरे परदेशी लोकांचा गारद्यांत भरणा असे. त्यांचे येथे घर ना दार. पैक्यासाठी कोणाचीही मान कापावयास ते तयारच. त्यांस दादासाहेबांचा हुकूम स्वदस्तुरचा गेला त्यांत 'नारायणराव यांस धरावे' असे वाक्य होते. परंतु पूर्वी ठरल्याप्रमाणे आनंदीबाईने तो हुकूम मागून घेऊन दादासाहेबांस न कळत त्यातील 'ध' चा 'मा' केला.'

ज्येष्ठ लेखक आणि चरित्रकार अरविंद ताटके यांनी 1964 सालच्या 'दीपावली' या दिवाळी अंकात 'दुर्दैवी आनंदीबाई' असा एक दीर्घ लेख लिहिला आहे. त्यात ते आनंदीबाईविषयी 'ध चा मा' असा प्रवाद कसा तयार होत गेला याचा उपलब्ध पुरावे आणि नोदींच्या मदतीनं शोध घेतला आहे. हा लेख 'बहुविध डॉट कॉम' या वेबसाईटवर पुनर्प्रकाशित करण्यात आला आहे. त्यात ताटके यांनी आनंदीबाईवरच्या आरोपांबाबत इतिहासाच्या साधनांमध्ये कुठे लिहिलं आहे त्याचा उल्लेख केला आहे.

ताटके लिहितात: 'हरिवंशाच्या बखरीत (पटवर्धनकृत) मात्र हा 'ध चा मा' आनंदीबाईने केला असे म्हटले असून तोच प्रवाद सर्वजण खरा मानू लागले. नाना फडणीसाने कटाची कसून चौकशी केली तेव्हा तिच्या विरुद्ध कसलाही पुरावा त्याला आढळला नाही ही गोष्टही ध्यानात ठेवण्यासारखी आहे. तरीही नारायणराव पेशव्यांची बखर, मराठी साम्राज्याची छोटी बखर, शेडगावकर बखर व ग्रांट डफ कृत इतिहास वगैरे ग्रंथात खुनाचे सर्व खापर आनंदीबाईच्या माथी मारले आहे.'

सोहोनीकृत पेशवे बखरीत या विषयी पुढीलप्रमाणे मजकूर आहे: 'नंतर दादासाहेब यांणी गारदी यांजकडे फितूर मांडला. नऊ लाख रुपये गारद्यांस देऊ म्हणून कागद लिहून दिला आणि नारायणराव यास कैद करावे, आणखी एक दोन असामी यांचा सल्ला त्यात होता. हा मजकूर सारा आनंदीबाई यांणी केला. तेव्हा जे कागदपत्र केले, ते आनंदीबाई यांणी पाहून, 'धरावे' असे जे होते, त्या 'ध' चा 'मा' केला.'

या लिखाणाचा उल्लेख करुन ताटके त्यांचं मत मांडतात की, 'बखरीत दंतकथा आणि आख्यायिकांचा भरणा वैपुल्याने असल्यामुळे त्यातील मजकुराला द्यावे तसे प्रामाण्य देता येत नाही. ग्रांट डफने आपल्या पंचांत नाना फडणीसाबद्दलही वाईटसाईट लिहून ठेवले आहे. आनंदीबाईंची कथाही त्याने तिखटमीठ लावून वर्णिली असल्यास नवल नाही. परंतु या सर्व ग्रंथांना अस्सल ऐतिहासिक कागदपत्रांचा आधार नसल्यामुळे एतद् ग्रंथांतली आनंदीबाईंसंबंधीची विधाने ग्राह्य मानता येणार नाहीत.'

अरविंद ताटकेंनी त्यांच्या दीर्घ लेखात विविध प्रश्न उपस्थित करत, रियासतकार सरदेसायांसारख्या लेखकांची उधृते देत आनंदीबाई या कशा लोकापदावाच्या बळी ठरल्या असं म्हटलं आहे.

ते लिहितात: ''ध चा मा' अन्य व्यक्तीने केल्याचा संभवही काही कमी नाही. मात्र नारायणरावांचा वध झाल्याने त्याविषयीचा लोकापवाद आनंदीबाईला चिकटला नि तो अनेक वर्षं कायम टिकला. त्यामुळे नाटककार, कादंबरीकार आणि बखरकारांना खमंग विषयाचे खाद्य आयते मिळाले.'

या संबंधी सरदेसायानांनी समारोप केला आहे तो असा: 'तथापि, आनंदीबाईच्या कृष्णकारस्थानाचा किंवा दुष्ट स्वभावाचा प्रत्यक्ष पुरावा मला यत्किंचित आढळत नाही. ती सुस्वरूप असून नवऱ्यावर भुरळ पाडून त्यांजकडून वाटेल कृत्य करवी असा सामान्य समज त्यावेळी होता, त्याचाच अनुवाद पूर्वी डफने व अलिकडे इतिहास संग्रहाचे संपादक रा.ब.पारसनीस व त्यांच्या सहाय्याने इतिहास लिहिणारे ना किंकेड यांनी ठिकठिकाणी केलेला आढळतो. पण त्याचा पुरावा मात्र कोणत्याही प्रकारच्या एवढ्या मोठ्या वाड्मयात ते देत नाहीत. सारांश 'ध' चा 'मा' आनंदीबाईने केला या काडीमात्रही पुरावा सापडत नाही. मात्र या प्रवादामुळे तिचे जीवन मात्र होरपळून निघाले.'

आनंदीबाईंविरोधात पुरावा कुठे?

डॉ उदय कुलकर्णी हे मराठा साम्राज्याच्या इतिहासाचे अभ्यासक आहेत आणि त्यांची आजवर सहा पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. नुकतंच त्यांचं 'The Maratha Century: Vignettes and anecdotes of the Maratha Empire' हे इंग्रजी पुस्तक प्रकाशित झालं आहे ज्यात त्यांनी 1646 ते 1829 अशा विस्तीर्ण कालखंडाचा परामर्श घेतला आहे.

त्यात त्यांनी या 'ध चा मा' प्रकरणावर स्वतंत्र लेख लिहिला आहे. त्यात डॉ. कुलकर्णी नोंदवतात: 'पत्रात झालेल्या बदलाच्या कर्त्या या आनंदीबाई मानल्या गेल्या. हे पत्र रामशास्त्र्यांना मिळालं आणि त्या आधारावर त्यांनी रघुनाथरावांना दोषी ठरवलं. तथापि, मूळ पत्र जाऊन आता बराच काळ झाला आहे आणि त्याकाळातही कोणीही बदल केल्याचं मान्य केलं नव्हतं. आनंदीबाईंनीच हे केलं असं समाजमनात खोलवर रुजलं आहे. पण आनंदीबाईंनीही यामध्ये त्यांचा सहभाग असल्याचे नाकारले आहे.'

"'धरावे' जे लिहिलं होतं आणि ते रघुनाथरावांच्या नावावर तुम्ही मांडू शकता, पण 'मारावे' कुणी केलं हा संभ्रमाचा प्रश्न राहतो. कोणी 'मारावे' केलं याचं निष्कर्षाप्रत जाणारा पुरावा नाही आहे," असं सांगत डॉ उदय कुलकर्णी 'बीबीसी मराठी'शी बोलतांना म्हणतात.

"'ध चा मा' हे झालं हे नक्की. याचा उल्लेख आनंदीबाईंनी स्वत: एका पत्रात केला आहे आणि ते पत्र आहे. त्यात त्या म्हणतात की 'ध चा मा' कोणी केला याची तुम्ही चौकशी का नाही केली? असा प्रश्न त्या नाना फडणीसांना विचारतात. त्यामुळे हे झालेलं आहे याचा पुरावा मूळ पत्रात मिळतो. पण तो कोणी केला याचा पुरावा मिळत नाही कारण ज्यांच्यावर हा आरोप होतो त्या आनंदीबाई स्वत:च हा प्रश्न विचारतात की याची चौकशी का नाही केली? हयात असतांना त्या हा प्रश्न फडणीसांना विचारताहेत. तेव्हा कागदपत्रं अजूनही उपलब्ध होती," डॉ कुलकर्णी म्हणतात.

हे पत्र कृष्णा जनार्दन यांनी नाना फडणीसांना लिहिलं आहे ज्यात आनंदीबाईंचं म्हणणं येतं आणि डॉ. कुलकर्णी यांनी ते त्यांच्या पुस्तकात दिलं आहे . त्यावेळेस रघुनाथरावांचा मृत्यू झाला आहे आणि फडणीसांनी आनंदीबाईंना स्थानबद्धतेत ठेवलं आहे.

यात आनंदीबाईंचं म्हणणं असं आहे : 'मागे जेव्हा साहेबांनी (रघुनाथरावांनी) प्रायश्चित्त घेतलं, तेव्हाच मला का बोलावण्यात आलं नाही? याचा अर्थ काय आहे? मी विसाजीपंतांना विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की त्याचा माझ्याशी संबंध नाही. सांगायचं हे की मी त्या कारस्थानात सहभागी नव्हते. याची नोंद करुन ठेवण्यात आली आहे. त्यानंतरही मला त्रास दिला जातो आहे.

माझं नारायणरावांवर विशेष प्रेम होतं आणि यासाठीच त्यांच्या विरुद्धच्या या कारस्थानाबद्दल मला काहीही सांगण्यात आलं नाही. त्यांनी (नाना फडणीसांनी) याबद्दल काही चौकशी का केली नाही? पत्रामध्ये अक्षरं 'ध' जाऊन 'मा' अशी बदलण्यात आली. हे कोणी केलं याची चौकशी का करण्यात आली नाही? त्यांना माझ्याकडून गेलेला कागद वा निरोप मिळू शकला असता. पण ते न करता मला केवळ संशयाखाली ठेवण्यात आलं आहे.'

फोटो स्रोत, Twitter/Uday Kulkarni

फोटो कॅप्शन,

उदय कुलकर्णी यांच्या पुस्तकाचे मुखपृष्ठ

याचा अर्थ, त्यांच्यावर होणाऱ्या या आरोपांबाबत स्वत: आनंदीबाईंना ज्ञात होतं आणि त्यांच्या काळातही त्या स्वत: चौकशी करण्याची मागणी करत होत्या.

मुक्ता केणेकर यांच्या 'कॉन्टिनेंटल' प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या 'पेशवेकालीन स्त्रिया' या पुस्तकातील आनंदीबाईंवरच्या प्रकरणात त्या लिहितात: 'रघुनाथरावांच्या हातच्या 'नारायणरावास धरावे' या हुकुमात 'ध' चा 'मा' कोणी केला हे आजपर्यंत सिद्ध झालेले नाही. आनंदीबाई शिकलेल्या होत्या तेव्हा त्यांनीच 'ध' चा 'मा' केला असावा असा तर्क केला जातो. परंतु आनंदीबाईच्या विरुद्ध कोणत्याही प्रकारचा पुरावा मिळालेला नाही. न्यायाधीश रामशास्त्री प्रभुणे यांनी रघुनाथरावांना देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा सांगितली. परंतु आनंदीबाईंवर कोणताही आरोप केला नाही.'

केणेकर असंही नोंदवतात की, 'खून करणाऱ्या गारद्यांच्या पुढारी महंमद इसफ याच्या जबानीत आनंदीबाईंच्या ओझरताही उल्लेख नाही. खुनाच्या कटात पकडल्या गेलेल्या आणि शिक्षा झालेल्या कोणत्याच गुन्हेगाराने आनंदीबाईंचे नाव घेतलेले नाही. केवळ संशयावरुन त्यांचे नाव गोवले गेले आणि त्यामुळे त्यांचे पुढचे 21 वर्षांचे आयुष्य होरपळून निघाले.'

'ज्ञानकोशकार' श्री. व्यं. केतकर यांनी सातव्या खंडात आनंदीबाई पेशवे आणि 'ध' चा 'मा' प्रकरणाबद्दल लिहिले आहे. तेही नमूद करतात की हा अक्षरबदल कोणी केला वा आनंदीबाईंनी केला का हे सिद्ध झाले नाही.

ते लिहितात: 'नारायणरावाचा वध 'ध' चा 'मा' करून हिनेंच केला असा तत्कालीनांचा दृढ समज होता असें पांडुरंग नामक कवीचें नारायणरावाच्या वधावरील काव्य इतिहाससंग्रहांत (मार्च 1910) प्रसिद्ध झालें आहे त्यावरून स्पष्ट होतें. आपल्यावरील हा आरोप स्वतः आनंदीबाईहि जाणून होती असें इतिहासंग्रहांत छापलेल्या मेणवली दफ्तरांतील एका पत्रावरून कळतें.

तथापि त्याच पत्रावरून नाना फडणीस आदिकरून मंडळीस तिच्या अपराधाचें माप तिच्या पदरांत घालण्याइतका स्पष्ट पुरावा मिळाल नव्हता अशीहि शंका उत्पन्न होते. राघोबादादाचें अस्सल पत्र रामशास्त्र्यांच्या हातीं पडलें (ग्रांटडफ) त्यावरून 'ध' चा 'मा' झाला होता हें जरी सिद्ध झाले असलें तरी तो कोणीं केला हें त्यास गूढच राहिलें असावें. नाना फडणिसानें तुळ्या पवाराची जबानी घेतली तींतहि आनंदीबाईंचें नांव पुढें आलें नव्हतें.'

आरोप आनंदीबाईंवरच का?

आनंदीबाई पेशव्यांनी 'ध' चा 'मा' केला का याबद्दल विविध अभ्यासक आणि संशोधकांची मतं काय आहेत ते आपण पाहिलं आणि त्यातली बहुतांश ही हा एक पुराव्याशिवाय समज होता असं म्हणणारी आहेत. पण त्यानंतरही अजून एक प्रश्न उरतो की हे आरोप आनंदीबाईंवरच का व्हावेत?

आनंदीबाई या महत्त्वाकांक्षी होत्या, त्यांना राजकारणात-व्यवहारात रस होता, त्यांचा विविध विषयांवर सतत पत्रव्यवहार होता. रघुनाथरावांच्या अनेक निर्णयांवर त्यांच्या प्रभाव होता. जेव्हा माधवराव पेशव्यांच्या मृत्यूनंतर नारायणराव पेशव्यांसाठी पेशवाईची वस्त्रं आणायला रघुनाथराव तयार नव्हते, तेव्हा आनंदीबाईंनी मध्यस्थी केली. त्या स्वत:ही सोबत साताऱ्याला गेल्या, असंही लिहिलं आहे.

रघुनाथराव आनंदीबाईंच्या प्रभावाखाली होते असंही त्यांच्याबद्दल मत त्या काळात तयार झालं होतं आणि म्हणून त्यांच्या कृत्यांची जबाबदारी आनंदीबाईंवर या मताद्वारे येत गेली असं दिसतं. नारायणरावांच्या प्रकरणात पण असंच झालं का?

आनंदीबाईंची तत्कालीन राजकारणात असलेली जी जाण होती त्याचं एक उदाहरण डॉ. उदय कुलकर्णी यांच्या पुस्तकात त्यांनी उल्लेख केलेल्या पत्रात दिसतो.

1779 मध्ये इंग्रज राघोबादादांसोबत येऊन पुण्याजवळची लढाई हरण्याअगोदर आनंदीबाईंनी 1778 मध्ये सखारामबापूंना एक पत्र लिहिलं आहे. त्यात त्या म्हणतात, "इंग्रज आपल्या घरामध्ये घुसण्याचा प्रयत्न करत आहेत. ते येतील आणि त्यांचं सत्ता प्रस्थापित करतील. त्यांनी शुजा उद्-दौला आणि महंमद अली यांच्यासोबत हेच केलं आहे. ते (इंग्रज) त्यांना केवळ गरजेपुरतं देतात, पण राज्याचे खरे स्वामी तेच (इंग्रज) झाले आहेत. तुम्ही हे जाणता. असं काही आपल्यासोबतही होईल." असं म्हणून त्या रघुनाथरावांचं मन वळविण्यास सांगतात.

फोटो स्रोत, Getty Images

"आनंदीबाई या महत्त्वाकांक्षी होत्या, हे मात्र खरं आहे. पण त्यासाठी त्या 'मारावे' पर्यंत त्या गेल्या असाव्यात का?

डॉ. उदय कुलकर्णी म्हणतात, "जेव्हा ते गारदी नारायणरावांना मारायला येत होते, तेव्हा त्यांची बायको गरोदर आहे हे आनंदीबाईंना माहीत होतं. ती बायको जेव्हा बाहेर जायला लागली तेव्हा आनंदीबाईंनी खोलीत कोंडलं असं म्हणत की तुला दिवस गेले आहेत. त्यामुळे तिला त्या संरक्षण देतात. त्यातूनच सवाई माधवरावांचा जन्म आहे आणि तो पेशवा झाल्यावर रघुनाथरावांना पुन्हा एकदा पेशवा बनता येत नाही. त्यामुळेच हे सगळं एकांगी आहे की आनंदीबाईंनी हे केलं असेल. केलं असतं, तर मग ही नारायणरावांची बायको जी गरोदर आहे तिला वाचवायचा प्रयत्न केला नसता आणि नंतर आपणहून नाना फडणीसांना पत्र लिहून विचारलं नसतं की याची चौकशी का केली नाही."

'पेशवेकालीन स्त्रिया' या पुस्तकात मुक्ता केणेकर लिहितात: 'आनंदीबाईंनी अखेरपर्यंत नवऱ्याला निष्ठेनं साथ दिली. नारायणरावांच्या हत्येचं पाप मात्र कायम माथी बसले. मुलांच्या बाबतीत कर्तव्यात त्यांनी कुठल्याही प्रकारे कमतरता ठेवली नाही. पण दुर्दैवाने नियतीने अखेरपर्यंत साथ दिली नाही.

'रघुनाथरावांच्या अवगुणांमुळेच आनंदीबाईंच्या गुणांचे मातेरे झाले. म्हणूनच असे म्हणावेसे वाटते की आनंदीबाईंना जर उत्तम जोडीदार मिळाला असता तर खरोखरच पेशव्यांच्या कुळातल्या या शहाण्या आणि धूर्त स्त्रीने एक श्रेष्ठ देशाभिमानी कर्तबगार महिला अशी मान्यता मिळवली असती.'

पुरुषप्रधान व्यवस्थेच्या बळी?

निष्कर्षाप्रत जाणारा पुरावा अद्याप मिळालेला नसतांना आनंदीबाईंना 'ध चा मा' जोडलं गेलं हा त्यांच्यावर अन्याय झाला का? इतिहास हा पुराव्यांनी प्रवाही बनतो आणि नवे पुरावे आले की तो नव्याने लिहिला जातो. पण तोपर्यंत जे पुरावे हाती आहेत त्यातून विवेकानं, तारतम्य ठेवून मत बनवायचं असतं. आनंदीबाईंविषयी हे मत बनवतांना हे तारतम्य ठेवलं गेलं नाही का?

आनंदीबाईच का, या प्रश्नाचं उत्तर शोधतांना ज्येष्ठ स्त्रीवादी लेखिका मंगला सामंत एक वेगळं, पण विचार करायला लावणारं मत मांडतात. ते मत इतिहास संशोधकाचं नाही आहे.

त्यांच्या मते 'ध चा मा' हे केवळ आनंदीबाईंच्या बाबतीतला तपशील नाही तर ती एक संकल्पना आहे, जी पुरुषप्रधान संस्कृतीच्या अनेक टप्प्यांमध्ये आपल्याला दिसते. 'पुरुषप्रधान व्यवस्थेने आपल्या स्वार्थाकरता, आपली सत्ता अबाधित राखण्याकरता सत्याशी जाणीवपूर्वक केलेली प्रतारणा म्हणजे 'ध चा मा' असं मंगला सामंत यांनी काही काळापूर्वी 'मिळून साऱ्या जणी' मधील एका लेखात मांडणी केली होती. 'ध चा मा' ही एक मानसिकता असून इतिहासात अशी अनेक उदाहरणं आहे असं त्यांचं म्हणणं आहे.

या लेखात मंगला सामंत लिहितात: 'मिळेल तेव्हा संधी साधून 'स्त्रीच गुन्हेगार' अशी भूमिका घ्यायची, त्यातून कधी आपल्या अब्रूचा बचाव, तर कधी आपली सत्ता व प्रतिष्ठा टिकवणं, कधी आपल्या चुका किंवा कमजोरी झाकणं, तर कधी आपला बाहेरख्यालीपणा, खोटेपणा लपवणं असा प्रयत्न पुरुषप्रधान सत्तांनी वेळोवेळी केलेला दिसतो.

'सत्तेमधून अशा गोष्टी प्रस्थापित होणं नेहमीच सोपं असतं. शरीर बळ, आर्थिक बळ हे पुरुषांनी सत्तेवर येण्याचे मोठे दोरखंड आहेत. त्यातून कुठे नैतिक घसरण होते आहे असं वाटलं तर 'ध चा मा' या कारस्थानाचा आधार घेऊन, स्त्रीवर्गावर डाव उलटवून सत्तेचा खुंटा बळकट करण्याचे, आपली लोकप्रियता टिकवण्याचे पुरुषी प्रयत्न मानवी इतिहासात अनेकदा झाले आहेत.'

असं आनंदीबाईंसोबत झालं का? या प्रश्नाचं उत्तर देणं सोपं नाही. त्यांनी नारायणरावांना मारण्याचे आदेश दिले, याचा स्पष्ट पुरावा सध्या तरी सापडत नाही. जर त्यांनी 'ध चा मा' केला नसेल तर त्यांची बदनामी कुणी आणि कोणत्या हेतूने केली असावी, हा प्रश्न उरतोच.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)