चंद्रकांत पाटील : 'मी उद्धवजींसारखा डॉक्टर आणि संजय राऊतांसारखा कंपाउंडर नाही' #5मोठ्याबातम्या

चंद्रकांत पाटील

फोटो स्रोत, CHANDRAKANTPATIL

आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा :

1. चंद्रकांत पाटील- 'मी उद्धवजींसारखा डॉक्टर आणि संजय राऊतांसारखा कंपाउंडर नाही'

'कोरोनाची तिसरी लाट येईल की नाही, हे सांगायला मी उद्धवजींसारखा डॉक्टर आणि संजय राऊत यांच्यासारखा कंपाऊंडर नाही,' असं विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.

औरंगाबादमध्ये एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. एबीपी माझानं याबाबत वृत्त दिलं आहे.

'तिसरी लाट येऊही शकते. पण कोरोना फक्त उद्धवजींशीच बोलतो. आता दुसरी लाट बऱ्यापैकी आवाक्यात आली आहे. त्यामुळं जनजीवन सुरू करण्याशिवाय पर्याय नाही, असं देखील पाटील यावेळी म्हणाले.

शाळा लवकरात लवकर सुरू करण्याची मागणीही यावेळी पाटील यांनी केली आहे. शाळा सुरू नसल्यानं मुलांच्या जीवनावर परिणाम होत आहे. मुलं जणू शाळाच विसरली आहेत, अशी परिस्थिती असल्याचं पाटील म्हणाले.

दरम्यान, पाटील यांच्या या वक्तव्यावर औरंगाबादमधील शिवसेनेचे विधान परिषदेचे आमदार अंबादस दानवे यांनी लगेचच प्रत्युत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरे चांगले डॉक्टर आहेत म्हणूनच त्यांनी भाजपचं ऑपरेशन करून सेनेची सत्ता आणली असं दानवेंनी म्हटलं.

2. मंदिरं उघडण्याच्या मुद्द्यावरून शरद पवारांची भाजप नेत्यांवर टीका

केंद्र सरकारबरोबर समन्वय ठेवून त्यांच्या सूचनांनुसारच राज्य सरकार कोरोनाविषयीचे निर्णय घेत आहे. त्यामुळं मंदिरं उघडण्याची मागणी करणाऱ्यांनी तारतम्य बाळगावं अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी केली आहे.

लोकसत्तानं याबाबतचं वृत्त दिलं.

फोटो स्रोत, Getty Images

मंदिरं उघडण्यासठी भाजप आणि मनसेकडून आंदोलनं केली जात आहेत. त्यावर लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मतं मांडण्याचा अधिकार आहे असं पवार म्हणाले. पुण्यातील एका कार्यक्रमात शरद पवार बोलत होते.

केंद्र सरकार विरोधकांविरोधात ईडीचा वापर करत असल्याचा आरोप पवार यांनी यावेळी पुन्हा एकदा केला. महाराष्ट्रातच नव्हे तर पंजाब, राजस्थान, मध्य प्रदेश, दक्षिणेतही याचा वापर केला जात असल्याचं पवार म्हणाले.

शेतकऱ्यांकडं सरकारनं पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचंही पवार म्हणाले. शेतकरी चौदा महिन्यांपासून घरदार सोडून आंदोलन करित आहे. पण त्यांच्या आंदोलनाची नोंद घेतली नाही, अशी टीका पवारांनी केली.

राजू शेट्टींच्या आमदारकीच्या मुद्द्यावरही पवारांनी स्पष्टीकरण दिलं. आम्ही त्यांच्या नावाचा प्रस्ताव पाठवून शब्द पाळला आहे, आता राज्यपाल काय निर्णय घेतात याकडं लक्ष असल्याचं शरद पवार म्हणाले.

3. आमदारकीशी घेणं नाही; पवारांनी शेतकरी, पूरग्रस्तांबाबत बोलायचं होतं-राजू शेट्टी

राजू शेट्टींच्या मुद्द्यावर शरद पवार बोलताच काही वेळातच राजू शेट्टी यांचीही प्रतिक्रिया आली. आमदारकीच्या विषयापेक्षा शरद पवार शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी बोलले असते तर मला अधिक आनंद झाला असता, अशा शब्दांत शेट्टी यांनी पवारांवर टीका केली.

फोटो स्रोत, Getty Images

मला आमदारकीबाबत बोलायचंच नाही. या बातम्या नेमक्या कशा समोर आल्या? त्या कुणी आणि कशासाठी पेरल्या याचीही माहिती असल्याचं राजू शेट्टी म्हणाले. एबीपी माझाच्या वृत्तात ही माहिती देण्यात आली आहे.

पण पवार महाविकास आघाडीचे प्रमुख नेते आहेत. महाविकास आघाडी सरकारनं पूरग्रस्तांकडं दुर्लक्ष केलं आहे. नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे होऊन दोन आठवडे झाले तरीही अद्याप निर्णय झालेला नाही. पवारांनी त्यावर बोलायला हवं होतं, असं शेट्टी म्हणाले.

4. जागतिक स्तरावरील लोकप्रिय नेत्यांच्या यादीत नरेंद्र मोदी पुन्हा अव्वल

जागतिक स्तरावरील नेत्यांच्या तुलनेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता अधिक असल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे. एका आंतरराष्ट्रीय संस्थेनं केलेल्या सर्वेक्षणात मोदी सर्वाधिक लोकप्रिय नेते ठरल्याचं स्पष्ट झालं आहे.

फोटो स्रोत, Getty Images

'द मॉर्निंग कन्सल्ट' नावाच्या एका अमेरिकन संस्थेनं हे सर्वेक्षण केलं आहे. यात ग्लोबल लीडर अप्रुव्हल रेटिंगमध्ये मोदींना सर्वाधिक पसंती मिळाली आहे. अमेरिकेसह ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स, कॅनडामधील नेत्यांनाही मोदींनी यात पछाडलं आहे.

या सर्वेक्षणात 70 टक्के रेटिंगसह मोदी अव्वल स्थानी आहेत. तर दुसऱ्या स्थानी मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष अँड्रेस मॅन्युअल लोपेझ ओब्राडोर असून त्यांना 64 टक्के रेटिंग मिळालं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तुलनेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन हे पाचव्या स्थानी असून त्यांना 48 टक्के रेटिंग मिळालं आहे. सकाळनं याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

5. राज्यात एका दिवसात विक्रमी 12 लाखांपेक्षा अधिक नागरिकांचे लसीकरण

कोरोनाला आळा घालण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं शस्त्र असलेल्या लसीकरण मोहिमेत महाराष्ट्रानं आघाडी घेतली आहे. शनिवारी (4 सप्टेंबर) राज्यात विक्रमी 12 लाखांपेक्षा अधिक नागरिकांचं लसीकरण करण्यात आलं. लोकमतनं याबाबचं वृत्त दिलं आहे.

शनिवारी रात्री आठ वाजेपर्यंत महाराष्ट्रात 12 लाख 6 हजार 327 नागरिकांना कोरोनाचं लसीकरण करण्यात आलं. एका दिवसात सर्वाधिक लसीकरणाचा हा विक्रम आहे. अतिरिक्त मुख्य सचिव प्रदीप व्यास यांनी याबाबात माहिती दिली आहे.

फोटो स्रोत, Getty Images

यापूर्वी महाराष्ट्रात 21 ऑगस्टला सर्वाधिक 11 लाख 4 हजार डोस देण्यात आले होते. लसीकरणाच्या बाबतीत सध्या महाराष्ट्र आघाडीवर आहे. लसीचे दोन्ही डोस देण्याच्या बाबतीत राज्य पहिल्या क्रमांकावर आहे.

विशेष म्हणजे शनिवारी एका दिवसात मुंबईतही 1 लाख 3 हजार नागरिकांचं लसीकरण करण्यात आलं. मुंबई मनपा हद्दीतील पात्र असलेल्या नागरिकांपैकी 80 टक्के नागरिकांनी किमान लशीचा एक डोस घेतला असल्याचं, मुंबई मनपा आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी सांगितलं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)