धनंजय मुंडेंच्या परळीमध्ये येताच करुणा शर्मांविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं?#5मोठ्याबातम्या

धनंजय मुंडे

फोटो स्रोत, DHANANJAY MUNDE/FACEBOOK

आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा :

1. धनंजय मुंडेंच्या परळीमध्ये येताच करुणा शर्मांविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं?

सामाजिक कार्यमंत्री धनंजय मुंडे यांच्याशी संबंधित असलेल्या करुणा शर्मा यांना रविवारी (5 सप्टेंबर) परळी येथून अटक झाली आहे. त्यांच्यावर अॅ्ट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. सकाळने हे वृत्त दिलं आहे.

परळीत येऊन अनेकांचा भांडाफोड करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला होता. वैद्यनाथ मंदिरात पत्रकार परिषद घेणार असल्याची घोषणाही त्यांनी केली होती. यापार्श्वभूमीवर परळीत वैद्यनाथ मंदिराबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता.

परंतु याठिकाणी करुणा शर्मा यांची दोन महिलांशी बाचाबाची झाली. विशाखा घाडगे आणि गु्ड्डी तांबोळी असं या महिलांचं नाव असून तुम्ही पैसे घेऊन इथे आला आहात असा आरोप करुणा शर्मा यांनी केला.

दोन्ही महिलांनी करुणा शर्मा यांच्याविरोधात अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. 'या आरोपासह करुणा शर्मा यांनी आम्हाला मारहाण केली. जिवे मारण्याच्या उद्देश्याने गुड्डी तांबोळी हिला चाकूने मारलं.' अशा आशयाची तक्रार शर्मा यांच्याविरोधात करण्यात आली आहे.

अंबोजोगाई न्यायालयात त्यांना आज (6 सप्टेंबर) हजर करण्यात येणार आहे.

2. 'शरद पवार यांना अटक करा', गुणरत्न सदावर्ते यांची मागणी

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याविरोधात गुन्हा नोंदवून त्यांना अटक करा अशी मागणी वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी पत्र पुणे पोलीस आयुक्तांना पत्र पाठवलं आहे.

फोटो स्रोत, ANI

शरद पवार यांच्या उपस्थितीत जुन्नर आंबेगाव याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसची सभा पार पडली. या सभेला गर्दी जमली होती. यामुळे राज्यघटनेतील आर्टिकल 21 नुसार इतरांच्या जगण्यावर गदा येते आणि इतर लोक यामुळे संक्रमित होऊ शकतात असा दावा गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे. लोकमतने हे वृत्त दिलं आहे.

सभेला जमलेल्या गर्दीला शरद पवार दिलीप वळसे-पाटील जबाबदार असल्याचा आरोप सदावर्ते यांनी केला आहे. शरद पवार कायद्यापेक्षा मोठे नाहीत असंही ते म्हणाले.

ते म्हणाले, "शरद पवार, दिलीप वळसे-पाटील यांना कोरोनाचे नियम लागू नाहीत का? पुण्यात एवढी गर्दी जमवली याला जबाबदार कोण? सामान्य माणसांनी लग्नासाठी जास्त लोक बोलवले तर तिकडे धाड पडते. पण शरद पवार, वळसे पाटील एवढी गर्दी जमवतात, माध्यमांमध्ये त्याच्या बातम्या येतात तरी अधिकारी दखल घेत नाहीत."

3. 'राज कुंद्रा भाजपात गेले तर 'ते' व्हीडिओ रामायणाचे होतील का?' - नाना पटोले

भाजपच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या नेत्यांच्या मागे ईडी लावली जाते असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

फोटो स्रोत, NANA PATOLE FACEBOOK

भाजपमध्ये काय दुधाने धुतलेले लोक आहे का? त्यांच्यावर काही भ्रष्टाचाराचे आरोप नाहीत का? त्यांच्याकडे भ्रष्ट पैसा नाही का? असेही प्रश्न त्यांनी उपस्थित केले. एबीपी माझाने हे वृत्त दिलं आहे.

महाविकास आघाडीच्या नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांकडून होणाऱ्या कारवाईवरुन नाना पटोले यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. ही कारवाई सूडाने केली जात असल्याची टीका त्यांनी केलीय.

त्यांनी म्हटलं, की राज कुंद्रा यांनी जे व्हिडिओ बनवले त्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. राज कुंद्रा जर उद्या भाजपात गेले तर ते व्हिडिओ रामायणाचे होते असं भाजप म्हणणार आहे का? कायदा सर्वांसाठी समान असला पाहिजे.

4. काश्मीरमध्ये काही निर्बंध शिथिल, सुरक्षा दल तैनात

काश्मीरमध्ये काही प्रमाणात निर्बंध शिथिल करण्यात आले असले तरी रविवारी (5 सप्टेंबर) सलग चौथ्या दिवशी सुरक्षा दल तैनात होते. कट्टरतावादी आणि फुटीरवादी नेते सय्यद अली शाह गिलानी यांच्या निधनानंतर स्थानिक पातळीवर तणावाची परिस्थिती असल्याचे चित्र आहे.

या पार्श्वभूमीवर श्रीनगरच्या काही भागात जमावबंदी लागू करण्यात आली तर काही ठिकाणी मोबाईल आणि इंटरनेट बंद करण्यात आले.

फोटो स्रोत, Paula Bronstein/getty images

काश्मीर खोऱ्यात अद्याप सार्वजनिक वाहतूक बंद आहे. खासगी वाहतूक वाढली आहे. शहराच्या काही भागांत दुकानं उघडण्यात आली असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचं सांगण्यात येत आहे. लोकसत्ताने हे वृत्त दिलं आहे.

काश्मीरचे पोलीस उपमहानिरीक्षक विजय कुमार यांनी 3 सप्टेंबरला सांगितलं होतं की, 5 सप्टेंबरला इंटरनेट आणि इतर सेवांचा आढावा घेतल्यानंतर बंदी मागे घेण्यात येईल.

5. 'अलिकडच्या नेत्यांना टीका करताना मर्यादेचा विसर पडतो' - शरद पवार

अलिकडे नेत्यांना एकमेकांवर टीका करत असताना मर्यादेचा विसर पडत आहे. काही जणांवर वक्तव्य मागे घेण्याची किंवा दिलगिरी करण्याची वेळ येत आहे, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात एक संघर्ष उभा राहिल्याचं दिसतं असंही ते म्हणाले. महाराष्ट्र टाईम्सने हे वृत्त दिलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images

शरद पवार यांच्या हस्ते रविवारी (5 सप्टेंबर) दिवंगत खासदार किसनराव बाणखेले यांच्या पुतळ्याचं अनावरण कारण्यात आलं. या कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली. ते म्हणाले, "मी 10 वर्ष कृषीमंत्रिपद सांभाळलं पण शेतमाल रस्त्यवर फेकून देण्याची वेळ कधी शेतकऱ्यांवर येऊ दिली नाही.

या कार्यक्रमाला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, शिवसेना खासदार संजय राऊत आणि सहकारमंत्री बाळासाहेब पाटील उपस्थित होते.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)